मनाचे श्लोक २८

दीनानाथ हा राम कोदंडधारी।

पुढे देखता काळ पोटी थरारी।।
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।।२८।।
श्लोकार्थ :-

भगवंत खरोखरच दु:खी जनांचा कैवारी व रक्षक आहे. त्याला समोर पाहताच प्रत्यक्ष यमराजास देखील भयाने कापरे भरते. मना! पुढील वचन अगदी निश्चित्तपणे सत्य समज. भगवंत आपल्या भक्ताचा आपलेपणाने सांभाळ करतो, त्याची कधीही उपेक्षा करीत नाही.
विवेचन :-

‘दीनानाथ हा राम कोदंडधारी।’

श्री समर्थांना प्रभू श्रीरामांनी स्वत: दर्शन दिले असा उल्लेख त्यांच्या चरीत्रग्रंथात आहे. परमनियती अखिल विश्वाचे ‘कालचक्र’ फिरवीत असते. त्याला अनुसरून जगातील सर्व घडामोडी होत असतात. या सर्व घटना निसर्गत:च घडत असतात. फक्त काही लोकांना घडणाºया घटना या नुसत्या घटना आहेत असे वाटत नाही, तर त्यामागील गुढार्थ त्यांच्या ध्यानात येतो आणि हे लोक त्या संधीचे सोने करतात. जीवनात घडणाºया कोणत्याही घटनेची तीव्रता आपण त्या घटनेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो यावरच ठरत असते.
श्री समर्थांची आराध्य देवता कोदंडधारी श्रीराम आहे. समर्थांनी विशिष्ट हेतूने श्रीरामांना आपले आराध्य दैवत म्हणून निवडले असावे असे वाटते. याचे प्रमुख कारण म्हणजे तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थिती! तत्कालीन समाजाची अवस्था आणि मानसिकतेचे एकाच शब्दात वर्णन करता येईल ते म्हणजे ‘मोगलाई’!

आपल्याला सर्वांना रामचरित्र माहीत आहे. शरण आलेल्या प्रत्येकाचे रामाने रक्षण केले आहे, मग तो नर, वानर ऋषिमुनी, शत्रूचा भाऊ, कोणीही असो. समाजातील दीन दुर्बल जनांची सेवा केली की, आपसूक भगवंताची सेवा होते, असे स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे. पण आज दीन कोणाला म्हणायचे हा खरा प्रश्न आहे. एखाद्याकडे संपत्ती कमी आहे म्हणून तो गरीब असू शकेल, पण दीन असेलच असे नाही.
‘पुढे देखता काळ पोटी थरारी।’
मनुष्याला सर्वात जास्त भीती मरणाची असते, असे मानले जाते. रामाने आपल्या पराक्रमाने महाबलाढ्य अशा रावणाचा वध केला. त्यामुळे या त्रिभुवनातील दुष्ट शक्ती रामास घाबरतात. त्या सर्व शक्तींना रामाचा धाक वाटतो. आज आपले शत्रू आपल्यापासून दूर नाहीत तर ते आपल्या अंतरंगातच ठाण मांडून बसले आहेत. मनात दबा धरून बसलेल्या षड्रिपूंवर अर्थात काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर इ. यावर रामाने विजय मिळविला आणि मग तो ‘राम’ झाला. मनुष्यदेखील याच मार्गाने गेला, तर तोही ‘रामरूप’ होऊ शकतो. एकदा रामरूप झाले की, मरणाची भीती राहणारच नाही.

‘जना वाक्य नेमस्त हे सत्य मानी’

या आधीच्या श्लोकांमधून समर्थांनी निरनिराळ्या प्रकारे मनाची तयारी केलेली आहे. प्रत्येक मनुष्याला आपापल्या जीवनाची लढाई स्वत:लाच लढावी लागते. प्रारब्धकर्माने आलेली सुख-दु:ख मनुष्याने आपला पाठीराखा राम आहे हा विश्वास बाळगून आनंदाने भोगावीत.
‘नुपेक्षी कदा राम दासाभिमानी’।

व्यक्तिगत जीवनात जर आपण एखादे तत्व स्वीकारले असेल, तर त्याच्या नियमित आचरणामुळे आपले मनोधैर्य वाढत असते. एक विशिष्ट प्रकारची आत्मिक शक्तीची आपल्या मनात वाढ होत असते. आपण रोज व्यायाम केला तर शरीर बलवान होते. त्यामुळे कोणी आपल्या विरोधात जात नाही. एकप्रकारे रोज नियमितपणे केलेली साधनाच आपल्या कामी येते. राम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही.
जय जय रघुवीर समर्थ।

– संदीप रामचंद्र सुंकले\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …