मनाचे श्लोक २७

भवाच्या भये काय भीतोस लंडी।

धरी रे मना धीर धाकासि सांडी।।
रघूनायकासारिखा स्वामि शीरी।

नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ।।२७।।
श्लोकार्थ :-

मना! एखाद्या नामर्दाप्रमाणे प्रपंचाच्या भयाने किती घाबरतोस? जरा धीर धर, धास्ती सोडून दे. भगवंतासारखा मालक तुझे रक्षण करणारा आहे. स्वत: यमराज जरी तुझ्यावर रागावला तरी भगवंत तुझी उपेक्षा करणार नाही.
विवेचन :-

‘भवाच्या भये काय भीतोस लंडी।’

‘भव’ या शब्दाचा अर्थ आहे होणे. या विश्वात सतत काही ना काही घडामोडी होत असतात. काही झाडांना पालवी फुटत असते, तर त्याचवेळी काही झाडांची पाने गळून पडत असतात. नद्यासारख्या समुद्राकडे वाहत असतात, तर समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होत असते. समुद्राच्या भरती-ओहोटीचे नृत्य सतत चालू असते. या चराचर सृष्टीत सतत काही ना काही बदल घडत असतो. मनुष्याच्या शरीरातील शेकडो पेशी मरत असतात आणि त्याचवेळी नवीन पेशी निर्माण होत असतात. हे सर्व इतके सहज घडत असते की, त्याची आपल्याला जाणीवदेखील होत नाही. कोणी जन्म घेत असतो, तर त्याचवेळी दुसºया ठिकाणी कोणी मृत्यू पावत असते. मनुष्याला जे सुख वाटते ते नित्य घडावे असे त्याला वाटत असते आणि ज्यापासून त्याला दु:ख होते ते त्याच्या बाबतीत कधीच घडू नये, असेही त्याला वाटत असते. झाडाची जुनी पिकलेली पाने गळल्याशिवाय नवीन पाने येऊ शकणार नाहीत, त्यांना येण्यास जागा राहणार नाही, इतकी साधी गोष्ट जी तो निसर्गात बघतो, पण ती त्याच्याही आयुष्याला लागू होते हे त्याच्या लक्षात येत नाही. त्यामुळे जर ‘सुख’ मिळाले, तर ते कधीही नष्ट होऊ शकते या भीतीने मनुष्य दु:ख करीत राहतो आणि समजा दु:खच त्याच्या वाट्याला आले, तर तो त्यास कधीच ‘पात्र’ नसतो आणि म्हणून तो अधिक ‘दु:खी’ होत असतो. मनुष्य ज्या नजरेने त्याकडे बघतो त्यावर त्याचे सुख-दु:ख अवलंबून असते. सुख-दु:खातीत होण्यासाठी अपेक्षित असलेली ‘नजर’ सामान्य मनुष्याकडे नसते म्हणून समर्थ त्यास ‘लंडी’ म्हणजे अपूर्ण असे म्हणतात.
‘धरी रे मना धीर धाकासि सांडी’।

सामान्य मनुष्याला दैनंदिन जीवनात भरपूर सुख-दु:खाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते. एक करायला गेलो, तर भलतेच होईल, असे त्यास वाटत असते. आपण ठरविलेले ध्येय पुरे होईल की नाही याची धास्ती कायम त्याच्या मनात असते. श्रीसमर्थ इथे आपल्याला धीर देत आहेत.

‘रघूनायकासारिखा स्वामि शीरी।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी।।’

जो मनुष्य श्रीरामाला स्मरून काम करेल, त्याचा होऊन काम करेल त्याला चिंता करण्याची बिलकुल गरज नाही. प्रपंच म्हटला म्हणजे समस्या, प्रश्न असणारच. ते सोडवताना आपण कोणत्या मार्गाने जातो, कसा विचार करतो ते महत्त्वाचे. सकारात्मक विचार आणि संस्कारात्मक आचार यांच्या सहाय्यानेच प्रश्न योग्य रीतीने सोडवणे शक्य होते असे अनुभवी लोक सांगतात. मनुष्याला पडणाºया सर्व प्रश्नांचे मूळ त्याला वाटणाºया भीतीत आहे. जेव्हा त्याला एखादी समस्या त्याच्या क्षमतेच्या बाहेरची वाटते, तेव्हा तो घाबरतो. त्याचवेळी ती समस्या रामाने पाठवली आहे आणि यातून रामच मला मार्ग दाखवील अशी खात्री असली किंवा निर्माण केली गेली तर त्याला धीर येतो आणि भीतीही कमी होऊ लागते. आपल्या आयुष्यात येणारी माणसे, समस्या, प्रश्न हे आपल्या सद्गुरूंच्या इच्छेने किंवा त्यांच्या परवानगीनेच येतात हे मनात पक्के केले की, येणाºया कोणत्याही संकटांची आपल्याला भीती वाटणार नाही. कारण सांभाळायला सद्गुरू समर्थ आहेत हा विश्वास आपल्या मनात कायम असेल.
– संदीप रामचंद्र सुंकले/ ८३८००१९६७६\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …