मध्यमवर्गीयांचा महामंत्र!

उगीच कशाला! कशाला उगीच!
पश्चिम द्रूतगती मार्गावर, दुपारचं रणरणतं ऊन, खांबाच्या जेमतेम शिडशिडीत सावलीत, पेपर डोक्यावर धरून घाम पुसत उभा, अर्धा तास झाला, बसचा पत्ता नाही. घशात कोरड, थोड्याच पावलांवर दोन रिक्षा उभ्या, बाकी रिकाम्या रिक्षा मुंगीच्या पावलांनी मध्ये-मध्ये समोर येतातच आहेत. स्वत: रिक्षावाला, आता हैं का? हा दुर्मीळ प्रश्न विचारतोय. खिशात मुलांनी दिलेली पाचशेची नोट, बजावलेलं ‘येताना रिक्षा करून या’ पण मनात द्वंद्व, दाखवावा का हात रिक्षाला? पण मन म्हणत‌ं कशाल्ला उगीच!

संध्याकाळी, भाजी आणायला गेलेलो, पोटात संध्याकाळी असते तशी संध्याभूक अगदी कडेलाच मोठ्या कढईत खळखळणाºया तेलातल्या कांदाभजांच्या दरवळ आसमंतात पसरलेला. पर्यावरणात माझं थबकणं, तोंडात कांदा भज्यांची चव दाटून आलेली. लेंग्याच्या खिशात हात टाकून भाजी घेऊन उरलेले घसघशीत, दहाच्या दोन नोटा आणि पाचचं पिवळ धम्मक नाणं, मी कुरवाळू लागताच मनात बोल उमटतातच, उगीच कशाला!
मुंबईतील उकडती संध्याकाळ, एटीएममधून पैसे काढून बाहेर पडता-पडता लक्षात येतं, लागूनच आईस्क्रीम पार्लर धाडसाने आईस्क्रीम पार्लरच्या काचेचं दार ढकलून आत गेलो, समोर आडव्या मोठ्या पेट्यातून वेगवेगळ्या आईस्क्रीमची रेलचेल, किलो किलोच्या पेट्यापासून बोटभर लांबीच्या आईसकँडीपर्यंत सर्व गारेगार. समोर डोळ्याखाली पसारा. एकदा वाटतं, चांगल्या मोठ्या कपातलं मिक्स ड्रायफ्रुट वाल आईस्क्रीम घेऊन चापाव; पण मग वाटतं, आईसकँडी आहे ना?

मग, कशाल्ला उगीच!
मी ज्या चाळीत राहतो, तेथे माझ्या शेजाºयांनी वैताग आणलाय. आपल्या गॅलरीतला केर कचरा, माझ्या दारात लोटून ठेवतो. या रविवारी त्याला चांगला खडसवायचे, एकदाच वन टू का फोर करून टाकायचे, म्हणून दरवाजाच्या बाजूला दबा धरून बसलो. तो हातात झाडू घेऊन कचरा काढू लागला. मी मनातल्या मनात भांडायच्या वाक्यांची जुळवाजुळव करून तयारीत राहिलो, मग आठवण झाली, कालच डॉक्टरकडे बीपी चेक केलाय आणि तो बºयापैकी वाढलाय आणि डॉक्टरांचा सल्ला आठवला. मग विचार केला, कशाला उगीच!

एका दिवशी सकाळचे नऊ वाजले होते, नाक्यावरील उडप्याच्या हॉटेलच्या व्हरांड्यात कोपरा गाठून सिंगल चहाची आॅर्डर देऊन चहाची वाट पाहत बसलो होतो. तिथून बाहेरची रहदारी निरखत बसलो असताना, आमच्या चाळीतला भेंडे लेंगा बंडी घालून हातातली रिकामी पिशवी गरगरा फिरवत चालला होता. मनात आलं, मारावी हाक, भेंड्याला वेगळा चहासुद्धा मागवावा लागला नसता, अर्धा कप चहा बशीत ओतून त्याच्या पुढे सरकवून चाललं असतं. कपातला गरम माझ्याचकडे, पण मनात विचार केला, कशाल्ला उगीच!
मोहन गद्रे/ कांदि‘वल्ली’\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …