मधुबाला

मधुबालाबद्दल बोलायचे झाल्यास मराठीतील एकच गाणे चपखल बसेल ‘अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली.’

पण ही अप्सरा शापित होती, त्यामुळे फारच अल्पायुषी होती; पण या नायिकेने तिच्या चाहत्यांना जो आनंद दिला आहे, त्याला तोडच नाही. मधुबालावरची अनेक गाणी ही अप्रतिम आहेत; पण आज आपण काही खास गाण्यांचा आढावा इथे घेणार आहोत. मधुबाला म्हटले की, आठवतो चित्रपट ‘महल’ व गाणे ‘आएगा आनेवाला’ याच गाण्यामुळे लता मंगेशकर या स्वरकोकिळेचा जमाना चालू झाला. लता मंगेशकर यांचा आवाज पातळ होता; त्या इतरांसारख्या नाकामधून गायच्या नाही; त्याकाळी असा आवाज फारसा प्रचलित नव्हता, त्यामुळे चित्रपटाशी निगडित निर्माता, दिग्दर्शक व संगीतकार या सर्वांनीच गाण्यांच्या तबकडीवर त्यांचे नाव लिहिण्याचे टाळले व त्याऐवजी गायिकाचे नाव म्हणून मधुबालाच्या याच चित्रपटातील नाव ‘कामिनी’ असे दिले गेले.
पण या गाण्याने लोकप्रियतेचे सर्व मापदंड ओलांडले व या गाण्याचे श्रेय कालांतराने लतादीदींना देण्यात आले. मधुबालासोबत या चित्रपटामध्ये अशोक कुमार होते. याच जोडीचा गाजलेला दुसरा एक चित्रपट म्हणजे ‘हावडा ब्रिज’. या चित्रपटामधील ‘आइये मेहरबान बैठिये जाने जान’ या गाण्यामध्ये मधुबालाने जी मादकता दाखविली आहे, त्यामुळे अनेकांच्या हृदयाची धडकन वाढली तरी होती किंवा क्षणभरासाठी बंदच झाली होती.

हावडा ब्रिजला संगीत दिले होते ओ. पी. नय्यर यांनी; त्यांच्या संगीतावर मधुबाला इतकी फिदा होती की, ओ. पीं.चे संगीत असेल, तर मधुबाला कमी मानधनामध्ये देखील काम करायला राजी असायची. ओ. पी. व मधुबालाचे कॉम्बिनेशन अजून एका चित्रपटामध्ये तुफान चालले व तो चित्रपट होता ‘फागुन’. ‘एक परदेसी मेरा दिल ले गया’ या गाण्यामध्ये मधुबालाचा नायक होता भारत भूषण.
याच भारत भूषणसोबत ‘गेट वे आॅफ इंडिया’ या चित्रपटामध्ये मधुबालाने काम केले होते. मदन मोहन, लता मंगेशकर असे स्वर्गीय कॉम्बिनेशन या चित्रपटाला लाभले होते; या चित्रपटामध्ये एक अप्रतिम गाणे होते जे मधुबालावर चित्रीत होणार होते; पण काही अनाकलनीय कारणामुळे ते चित्रपटामधून वगळण्यात आले; गाण्याचे बोल आहेत ‘सपने में सजन से दो बातें एक याद रही, एक भूल गए.’ हे गाणे ऐकायला आज ही अनेक कानसेन बेकरार असतात.

मधुबाला व दिलीप कुमार यांची असफल प्रेम कहाणी आजदेखील अजरामर आहे. अगदी देव -सुरैय्याप्रमाणे. या दोघांचा अजरामर चित्रपट म्हणजे ‘मोघल-ए-आजम’. या चित्रपटामध्ये शीशमहलमध्ये चित्रीत झालेले ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाणे म्हणजे त्याकाळी बंडखोर प्रेमिकांचे प्रतीक झाले होते. या गाण्यासाठी लतादीदींना संगीतकार नौशाद यांनी बाथरूममध्ये उभे करून गायला लावले होते, अशी वदंता आहे. गाण्यामध्ये इकोचा परिणाम आणण्यासाठी असे केले गेले, असे सांगितले गेले; पण हे अर्धसत्य होते. हे नौशाद यांच्या मुलाने म्हणजे राजू नौशादने मला त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितले. प्रत्यक्षात लतादीदी स्टुडीओमध्ये माइकसमोर उभ्या राहूनच गात होत्या; पण दोन एक्सट्रा माइक/स्पीकर बाथरूममध्ये फिट करण्यात आले होते ज्यायोगे त्यातून निघणारा आवाज बाथरूममध्ये घुमत होता. अशाप्रकारे इकोचा परिणाम साधण्यात आला होता.
पावसात चिंब न्हाऊन निघालेली नायिका म्हटले की, अनेक चित्रपटांमधील पाण्यात देखील आग लावणारे मादक प्रसंग आठवतात; त्यातीलच एक म्हणजे ‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटामधील चिंब भिजून गॅरेजमध्ये प्रवेशकर्ती झालेली मधुबाला व ती पदर सुकवत असल्याचे पाहून गाणारा किशोर कुमार; गाण्याचे बोल अर्थातच ‘एक लडकी भीगी भागी सी’ याच मधुबालासाठी किशोर प्रत्यक्ष जीवनामध्ये देखील पार खुळा झाला होता. तिच्याशी लग्न करण्यासाठी किशोरने धर्मपरिवर्तन केले; मधुबालाच्या वडिलांनी किशोरला ‘बिमार लड़की से क्यों शादी करना चाहते हो?’ असे विचारत मधुच्या आजारपणाची पुसटशी कल्पना देखील दिली होती; पण ऐकेल तो किशोर कसला.

किशोरसारखा उत्स्फूर्त अभिनेता असो की, अभिनयाच्या बाबतीत ठोकळा म्हणून हिणवला गेलेला प्रदीप कुमार असो; सगळ्यांसोबत मधुबालाने अप्रतिम गाण्यांचा नजराणा पेश केला आहे. प्रदीप कुमारसोबत केलेला ‘राजहठ’ चित्रपटदेखील मग याला अपवाद कसा ठरेल! यातील एक गाणे मला अतिशय आवडते; बोल आहेत – ‘ये वादा करो चाँद के सामने भुला तो न दोगे मेरे प्यार को.’ गीता दत्त व मधुबाला कॉम्बिनेशन म्हटले की, डोळ्यासमोर येते मिस्टर अँड मिसेस ५५ मधील स्विमिंग पूलवरील चुलबुले गीत, ‘ठंडी हवा, काली घटा, आ ही गयी झूम के प्यार लिये डोले हँसी, नाचे जिया घूम के.’ या चित्रपटाची उदासवाणी आठवण म्हणजे नायक गुरुदत्त व नायिका मधुबाला दोघेही प्रतिभावंत, पण दोघे ही अल्पायुषी.
‘गुजरा हुआ जमाना आता नहीं दोबारा, हाफिज खुदा तुम्हारा, खुशियाँ थी चार दिन की आंसू हैं उम्र भरके’ हे गाणे मधुबालावर चित्रीत झाले आहे; चित्रपटाचे नाव ‘शिरी फरहाद’ मधुबालाने आपल्या चाहत्यांचा कायमचा निरोप घेताना हेच तर शब्द स्वत:पाशी गुणगुणले तर नसतील ना! मधुबालाच्या आठवणींना इथेच आवर घालणे योग्य ठरेल.

प्रशांत दांडेकर/रुपेरी
9821947457\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …