मतदारांना गृहीत धरू नका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाडवा मेळाव्याला राज ठाकरे यांच्या भाषणाने सगळेच चक्रावून गेले. त्यांनी ज्याप्रकारे महाविकास आघाडीला आपल्या भाषणातून डिवचले आणि मतदारांचे कान उपटले ते फार महत्त्वाचे होते. शिवाजी पार्कवरच्या भव्य मेळाव्यात हजारोंच्या जनसमुदायासमोर किंवा मनसैनिकांच्या समोर राज ठाकरे यांनी इतिहासावर म्हणजे दोन वर्षांत घडलेल्या घटनांवर फुंकर मारली आणि धुळीने झाकल्या गेलेल्या घटना पुन्हा जागृत केल्या. त्याने सगळे अंतर्मुख झाले खरे, पण हा निर्माण केलेला विरोधाभास मतांमध्ये परावर्तीत होईल की नाही, हे सांगता येणे कठीण आहे. जी खंत हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना वाटायची तीच खंत आता राज ठाकरे यांना वाटताना दिसत आहे. अनेक भाषणांमध्ये जनतेला समोरच्या गर्दीला शिवसेनाप्रमुख विचारायचे की, ही गर्दी मतदानाच्यावेळी कुठे जाते?, तोच प्रकार आज मनसेचा आहे; पण सगळे राजकीय पक्ष किंवा नेते मतदारांना गृहीत धरतात ना, ते त्यांनाच घातक आहे हे नक्की.

राज ठाकरेंचे भाषण हे पूर्णपणे करमणूक करणारे आणि श्रवणीय असते. त्यामुळे त्याला गर्दी होणे स्वाभाविक आहे. आज राज्यात राज ठाकरे सोडले, तर कोणत्याही नेत्याचे भाषण ऐकावे असे वाटत नाही. एक काळ होता की, महाराष्ट्रात भाषणे ऐकणे ही फार मोठी परंपरा होती. घरातली सगळी कामे टाकून सभांना माणसं जमत असत. आजकाल आणावी लागतात. त्यांना आकर्षण म्हणून कोणी तरी सेलिब्रेटी बोलवावा लागतो. त्यांच्या चहापाण्याचा खर्च करावा लागतो; पण पूर्वी तसे नव्हते. तहान-भूक विसरून आपल्या नेत्यांचीच नाही, तर विविध विद्वानांची भाषणे ऐकण्याची पर्वणी मिळावी, म्हणून जनता जमत होती; पण आता भाषण ऐकावे असे राजकीय नेते नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भाषणाला नेहमीच गर्दी असते; पण गर्दीचे रूपांतर मतदानात होईल, याची खात्री कोणीच देऊ शकत नाही.

पाडवा मेळाव्याला राज ठाकरे यांचा सूर महाविकास आघाडी सरकारवर होता. मतदारांनी कौल जर युतीला दिला होता, राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात दिला होता, तर ऐनवेळी बदल कसा काय झाला? ही फुंकर मारून उठवलेली धूळ आणि समोर आणलेल्या दोन वर्षांतील घटना मतदारांना विसरू न देणे हे यातले धोरण आहे. त्यांचा मुद्दा अगदी अचूक असला, तरी या भाषणाचा फायदा नेमका कोणाला होणार?, याचा फायदा अर्थातच भाजपला होणार हे नक्की. युतीला कौल मिळालेला असतानाही ऐनवेळी शिवसेनेनी युती तोडली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली हा पसरवलेला समज आणि नजरेत आणून दिलेली वस्तुस्थिती ही भाजपला सहानुभूती मिळवून देणारी ठरेल. त्याचा मनसेला नेमका किती फायदा होईल, हे सांगता येणार नाही, पण भाजपकडून त्याच्या बदल्यात मनसेला काही मिळणार का, याची गणिते आता या वर्षाच्या अखेरीस मिळतील असे दिसते.

केंद्रात सत्ता असली, तरी काहींचा जीव मुंबईत आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. तो त्यांचा वार भाजपवर होता; पण तसे त्या बोलण्याला काही अर्थ नव्हता. कारण काँग्रेसची केंद्रात सत्ता होती, तेव्हा महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, विकास सोसायट्या, सहकारी भांडारे, सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने अशा सगळीकडे काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळी त्यांना कोणी प्रश्न विचारत नव्हते की, केंद्रात सत्ता आहे मग महापालिकेत का?, नगरपालिकेत का?, ग्रामपंचायतीत का?, तेव्हा काँग्रेसच्या रावणाचा जीव मुंबईत नव्हता का?, पण आज गलीतगात्र झालेली काँग्रेस टेकू लावल्याने आपली सत्ता असल्याने त्यावर कोणी बोलायचे नाही; पण कोणी कितीही काहीही बोलले तरी मतदार आणि जनता सुज्ञ आहे. कोणी गद्दारी केली, कोणी कोणाचा केसाने गळा कापला?, कोणी पलटवार केला?, कोणी काय केले हे मतदार आता जाणतो. आपण एकदा बोलून गेलात की, त्याच्या यू ट्यूबपासून सगळ्या सोशल मीडियावर पोस्ट झळकत असतात. ती लाट थोपवणे अवघड असते. त्यामुळे राज ठाकरेंच्या शनिवारच्या भाषणानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर कडाडून टीका करत उत्तर जरी दिले असले, तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे काय ऐकायचे आणि राज ठाकरे यांचे काय ऐकायचे हे मतदारांनी पक्के केलेले असते हे पण लक्षात घेतले पाहिजे. पण, मतदारांना गृहीत धरू नये हे नक्की.

राज ठाकरे यांनी उचललेले मुद्दे हे निर्विवाद होते. शिक्षण, महागाई अशा विषयांवर कोणी बोलत नाही. विकासावर कोणी बोलत नाही. सामान्य माणसांच्या विसरण्याच्या स्वभावाचा राजकीय पक्ष कसे गैरफायदा घेतात हे त्यांनी अधोरेखित केलेले सत्य अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणाचीही नक्कल, मिमिक्री न करता केलेले हे भाषण अनेक वर्षांतील वैशिष्ठ्यपूर्ण भाषणांपैकी एक होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका आणि महापालिका निवडणुकांमधील मनसेचा नेमका दृष्टीकोन काय असू शकतो आणि कोणाला त्याचा फायदा होऊ शकतो हे निश्चित करणारे हे भाषण होते.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …