भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, ‘जर मला संविधानाचा गैरवापर होत असल्याचे आढळले, तर मी ते जाळणारा पहिला असेन. त्यासाठी मनाची मशागत करणे हे मानवी अस्तित्वाचे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे.’ हे त्यांचे प्रेरणादायी विचार भारतीय नागरिकांमध्ये ‘भारतीय संविधान दिनी’ संविधान मूल्ये रुजवण्यासाठी सर्वांनी स्मरण करूया.
आज २६ नोव्हेंबर, अर्थात ‘भारतीय संविधान दिन’ होय. भारतीय राज्य घटना स्वीकारल्याचा ७२ वा वर्धापन दिन. आपल्या देशात भारतीय संविधान सभेने २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी भारताचे संविधान स्वीकारले आणि भारतीय राज्य घटना २६ जानेवारी, १९५० रोजी लागू करण्यात आले, म्हणून दरवर्षी आपल्या देशात संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून ओळखला जात होता, परंतु या दिवसाची पायाभरणी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंती दिनाचे औचित्य साधून ११ आॅक्टोबर, २०१५ रोजी मुंबईतील इंदू मिल कम्पाऊंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उद्घाटनाच्या वेळी करण्यात आली. तशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा आपल्या देशाचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी १८ आॅगस्ट, २०१२ रोजी केली होती.
भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने १९ नोव्हेंबर, २०१५ रोजी भारत सरकारच्या निर्णयाची अधिसूचना जाहीर केली की, नागरिकांमध्ये संविधान मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस ‘संविधान दिन’, म्हणून साजरा केला जातो. असे असले, तरी आपल्या महाराष्ट्र राज्यात २४ नोव्हेंबर, २००८ रोजी ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस ‘संविधान दिन’, म्हणून साजरा करण्यात यावा, असे सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढले होते. त्याप्रमाणे दरवर्षी विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा केला जात होता. याला अपवाद आहे, मागील व चालू वर्ष कारण सध्या कोरोना व्हायरसच्या विळख्यात देशातील जनता आहे. तेव्हा त्याचे नियम गृहीत धरून आपल्याला देशातील नागरिकांच्या मुलभूत हक्कांची जाणीव करण्यासाठी हा दिवस ‘संविधान दिन’, म्हणून साजरा करावा लागेल, कारण देशातील वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी देशात २६ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात येतो. यातून ‘स्वतंत्र भारत@७५:सचोतीतून आत्मनिर्भरतेकडे’ आपण खरच जाणार आहोत का? याचा विचार लोकशाही प्रधान देशातील सुजाण नागरिकांनी करणे आवश्यक आहे. जर भारतीय राज्य घटनेची प्रामाणिकपणे अंबलबजावणी केली गेली असती, तर देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात अशी सचोती राबविण्याची वेळ भारत सरकारच्या केंद्रीय दक्षता आयोगावर आली नसती.
आता जरी परराष्ट्र मंत्रालयाने सर्व परदेशातील भारतीय शाळांना २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आणि दूतावासांना त्या राष्ट्राच्या स्थानिक भाषेत संविधानाचे भाषांतर करून विविध अकादमी, ग्रंथालये इत्यादींना वितरित करण्याचे निर्देश दिले गेले, तरी भारतीय संविधान समजून घेणे ही काळाची गरज आहे, कारण भारतीय संविधान हे केवळ देशातील नव्हे, तर जगातील सर्वश्रेष्ठ एकमेव भारतीय संविधान आहे. त्यासाठी आता भारतीय संविधानाचे काटेकोरपणे कसे पालन केले जाईल, यासाठी भारतीय नागरिकांनी भारतीय राज्य घटनेच्या पाठिशी ठामपणे उभे रहावे ही आजच्या काळाची खरी गरज आहे. त्यासाठी भारतीयांनी गट-तट विसरून एकोप्याने राहिले पाहिजे. तेव्हा केवळ एक दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करून चालणार नाही, तर संविधानाचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयांचे आद्य कर्तव्य आहे.
आज जरी प्रत्येक राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयात, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्ह्यातील जिल्हा परिषद, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा इत्यादी ठिकाणी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात येईल. भारतीय संविधान या विषयावर आॅनलाइन किंवा आॅफलाइन परिसंवाद घेण्यात येतील. निबंध स्पर्धा, घोष वाक्य किंवा गौरव मोर्चा वाढून भारतीय संविधानाची जनजागृती केली, तरी एक दिवस असे विविध कार्यक्रम राबवून चालणार नाही, तर कार्यक्रम योग्य प्रकारे राबविले जात आहेत का? याची चाचपणी करावी लागेल. तसेच त्यावर जनतेने अंकुर ठेवणे गरजेचे आहे. आजही आपल्या देशात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी नागरिकांना आत्महत्या करण्याची वेळ येते. ही वेळ येऊ नये म्हणून, केवळ एक दिवस गाजावाजा न करता देशातील सुजाण नागरिकांच्या हितासाठी प्रत्येक दिवशी असे दिन साजरे करणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा आहे की, भारतीय संविधानाची योग्य प्रकारे अंबलबजावणी झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत’. तेव्हा आजपासून देशातील प्रत्येक भारतीयांनी भारतीय संविधानाचे वाचन करणे गरजेचे आहे. तरच, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत देश निर्माण होईल.
रवींद्र तांबे/झरोका