बुलंद भारत की बुलंद तसबीर

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही, तर देशाला हमारा बजाज गेला याचे दु:ख झाले, यातच त्यांचे श्रेष्ठत्व दिसत आहे. २०२२ या वर्षाने वेगवेगळ्या क्षेत्रांतील दिग्गज पहिल्या दोन महिन्यांत गिळायला सुरुवात केलेली आहे. सिंधुताई सपकाळ, रमेश देव, लता मंगेशकर आणि आता राहुल बजाज. त्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक उद्योग अशा सर्वच क्षेत्रांची हानी होताना दिसत आहे. बजाज या नावाचं देशातील सर्वसामान्य व्यक्तीशी एक नातं आहे. त्यामुळे त्यांच्या निधनाचं खूप दु:ख आहे. बुलंद भारत की बुलंद तसबीर, अशी जाहिरात करत हमारा बजाज म्हणणारे आज आपल्यातून गेले आहेत; पण त्यांनी उभी केलेली ही तसबीर चिरंतर राहणार आहे.

दुचाकी किंवा स्कुटर हे चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी सर्वसामान्यांचं स्वप्न होतं. ज्या काळात साधी सायकलही घरात असणे दुर्मिळ होती, त्या काळात स्कुटरचे स्वप्न हे फार मोठे स्वप्न होते. पण, त्या काळात व्हेस्पा आणि लँम्रेटा या इटालियन मेकच्या गाड्या भारतात येत असत. अस्सल भारतीय बनावटीची स्कुटर देण्याचे फार मोठे काम बजाज यांनी केले. त्यामुळे सामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारे ते असामान्य व्यक्तिमत्व होते. सातारमध्ये उत्पादित होणारी प्रिया स्कुटर ही जगभरात प्रसिद्ध झाली. बजाज सुपर, बजाज चेतक आणि त्यानंतर बजाज कब, क्लासिक एसएल या स्कुटर खरोखर अफलातून अशा होत्या. आपल्याजवळ प्रिया स्कुटर आहे आणि त्यावर मागच्या बाजूला आपली प्रिया बसलेली आहे, याची जाणिव म्हणजे माझीया प्रियाला प्रित कळे, असे स्वर्गीय सुख त्या काळात युवापिढीचं असायचं. पाच-पाच वर्षे नंबर लावून प्रिया स्कुटर मिळायची. दणदणीत पत्रा असलेली ही स्कुटर दुरूस्तीचाही खर्च फारच कमी असायचा. कुठेही सहज त्याचे स्पेअरपार्ट मिळायचे. आपल्या वाहनांचे सहज स्पेअरपार्ट उपलब्ध असलेपाहिजेत ही बजाजची खासीयत होती. बजाजच्या शोरूमसमोरच एखादे स्पेअरपार्टचे ओरिजनल दुकान असायचे. त्यामुळे ही गाडी तहहयात आपली सोबती आहे, असा हमारा बजाजचा संदेश होता. बजाजची गाडी म्हणजे मेंटनन्स फ्री आणि कोणालाही परवडेल अशी गाडी. त्यामुळे वाहन क्षेत्रात या नावाचा दबदबा निर्माण झाला. हे नियोजन होते राहुल बजाज यांचे.
ज्या ठिकाणी जुन्या एमआयडीसीत साताºयात प्रियाचे उत्पादन होत होते, त्या कारखान्याचे नावही एमएसएल म्हणजे महाराष्ट्र स्कुटर्स असे होते. या कंपनीत बजाजची प्रिया, बजाज सुपर, चेतक यांचे उत्पादन होत असूनही राहुल बजाज यांनी कंपनीचे नाव महाराष्ट्र स्कुटर्स असे ठेवून महाराष्ट्राचे नाव मोठे केले होते. हजारो कर्मचारी, त्यांचे वेगवेगळे शॉप, डिपार्टमेंट ही एक औद्योगिक समृद्धी होती. या समृद्धीतून प्रत्येकाच्या दारात प्रिया, सुपर नाही तर चेतक अशी स्कुटर असेल याचा विश्वास दिला होता. ते सुंदर दिवस राहुल बजाज यांनी दाखवले होते.

थंडीच्या वेळी स्कुटर कीक मारून घाईला यायची. कधी ओव्हफ्लो झालेली असायची. कधी त्याच्या प्लगमध्ये काही तरी बिघाड निर्माण झालेला असायचा; पण यासाठी कधी मॅकॅनिकची गरज भासत नव्हती. प्लग घासून, कधी तो पेट्रोलमध्ये धुवून, गरम करून आपली आपण मेंटनन्स ठेवण्याची सवय बजाजनी लावली होती. मग कधी गाडी लवकर स्टार्ट होण्यासाठी कोणी तरी ती तिरकी करायचा सल्ला द्यायचे. त्यावर हमखास ठरलेला विनोद व्हायचा. बजाजनी विमान जरी काढले, तरी ते तिरके केल्याशिवाय स्टार्ट होणार नाही, ही त्यांची खासीयत आहे. पण अशाप्रकारे बजाज प्रत्येक घराचा एक घटक बनला होता. हा घटक आपल्या घराघरात पोहोचवणारे राहुल बजाज आज राहिले नाहीत. याचे खूप दु:ख आहे.
केवळ आपले उत्पादनच त्यांनी पोहोचवले नाही, तर मोठ्या प्रमाणात त्यांनी रोजगार दिला होता, हे महत्त्वाचे. देशात लाखोंच्या संख्येने आटो रिक्षा आहेत. त्यातील ८० टक्के रिक्षा या बजाजच्या आहेत. आपल्या उत्पादन क्षेत्रात त्यांनी रोजगार दिलाच; पण बजाज आटो, बजाज टेम्पोच्या माध्यमातून टेम्पो, रिक्षा या व्यवसायाला उभारी त्यांच्यामुळे आली. त्यामुळे आपल्याकडे स्कुटर नसली, तरी सार्वजनिक असे रिक्षाचे वाहन हे बजाजचे होतेच. त्यामुळे बजाज हे नाव सर्वसामान्यांच्या जीवनाचा एक भाग बनले होते. कितीही कंपन्यांच्या रिक्षा आल्या, तरी बजाजला तोड नव्हती. फ्रंट इंजिनची रिक्षा, रिअर इंजिनची रिक्षा, टू सीटर, थ्री सीटर अशी अनेक नवनवीन प्रयोग करून त्यांनी रिक्षांची मॉडेल आणली; पण त्याचे सौंदर्य आणि उपयोगिता कधीच कमी झाली नाही. हमारा बजाज हा खºया अर्थाने सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत झालेला होता. त्यामुळे गेल्या पन्नास वर्षांची त्यांची देशाशी जोडलेली नाळ ही अचानक तुटल्याने सर्वांनाच दु:ख झाले आहे.

एकूणच बजाज उद्योग समूहाला मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. २००१ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राहुल बजाज यांनी अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून, त्यानंतर हॉवर्ड विद्यापीठातून एमबीएचे देखील शिक्षण घेतले होते. १९६८ मध्ये बजाज आॅटोमध्ये ते कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले होते. तिथून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. मागील वर्षीच त्यांनी बजाज आॅटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. जवळपास पाच दशकांपासून त्यांनी बजाज आॅटोची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. बजाज आॅटोला यशोशिखरावर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. तो कायम राहिल. राहुल बजाज यांच्या जाण्याने उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे. सर्वसामान्यांना हमारा वाटणारे आणि रोजगार निर्मितीसाठी मोठे कार्य असलेल्या राहुल बजाज यांना भावपूर्ण आदरांजली.
प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …