बालपणीचा काळ सुखाचा

 

रम्य ते बालपण असे म्हणताना, मुले ही देवाघरची फुले असेही छोट्यांना संबोधिले जाते. याच फुलांमध्ये निरागसता मकरंदाप्रमाणे पुरेपूर भरलेली असते. हीच निरागसता वाढत्या वयाप्रमाणे लोप पावत जाते. म्हणूनच लहानपणी जेवढ्या लवकर मोठे व्हावेसे वाटते, त्याच्या कितीतरी पटीने मोठेपणी बालपणात परत डोकावण्याची इच्छा मनात फेर घालते. बालपणीचा काळ सुखाचा असे राहून राहून बोलले जाते. बालपणातील निरागसतेबरोबर त्या वयात चौकस बुद्धीसुद्धा छोट्यांमध्ये असते. त्यामुळे त्यांच्या बालसुलभ मनाला अनेक प्रश्न पडत असतात आणि ते सहज विचारून मोकळे होतात. या प्रश्नांची उत्तरे त्यांना समजेल अशा भाषेत देण्याचे कठीण काम मात्र पालकांवर येऊन पडते. अशा वेळी त्यांचे प्रश्न अनुत्तरीत न ठेवता छोट्यांचे समाधान होईल, असे उत्तर शोधून त्यांचे शंका निरसन जरूर करावे आणि तसे प्रयत्न केलेही जातात, परंतु काही प्रश्न मात्र खरेच निरूत्तर करतात.
पृथ्वीवर एवढी माणसे आहेत, पृथ्वीला जड नाही होत? हा असाच एक निरागस प्रश्न विचारात टाकणारा आणि निरूत्तर करणारासुद्धा! म्हणजे पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणामुळे सगळे सजीव, वास्तू, वस्तू पृथ्वी आकर्षित करून ठेवते हे शास्त्रीय स्पष्टीकरण खरे, पण लहान मुलांच्या बुद्धीला ते कितपत पटेल? ‘त्यातल्या त्यात पृथ्वीला जेव्हा जड वाटते, तेव्हा ती भूकंप, पूर करून वजन कमी करते’ हे उत्तर कदाचित पटू शकते, परंतु त्याने समाधान होईल का? ही शंकाच आहे.

नंतर त्याच प्रश्नाचा विचार करताना लक्षात आले की, खरेतर त्या प्रश्नातच बरेच उपप्रश्न दडलेले आहेत. वाढती लोकसंख्या पृथ्वीला जड होते आहे का?, जंगलतोड करून निर्माण केलेल्या वास्तू, इमारतींची वाढती संख्या पृथ्वीवरचा भार वाढवत नाही का?, वाढत्या प्रदूषणाचा भार पृथ्वीला सोसवत नाही का?, पृथ्वीची हे भार सोसण्याची मर्यादा संपली आहे का?, या सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच आणि ते म्हणजे ‘होय’. अगोदरचा प्रश्न आपल्यासारख्या जाणत्या माणसांना का पडत नाही?, कारण मानव जमातीचा स्वार्थ! आपली सोय झाली की काम झाले. मग इतर गोष्टींना दुय्यम स्थान. म्हणूनच तर निसर्गाला हवे तसे ओरबाडून पृथ्वीचा समतोल बिघडवण्यात सरळ प्राण्यात बुद्धिमान असणा‍ºया मानवाचा कायमच पुढाकार राहिला आहे. जागतिक तापमान वाढ ही समस्या यामुळेच तर आ वासून उभी ठाकली आहे. त्यामुळे तो दिवस दूर नाही, ज्यावेळी खरोखरच पृथ्वीला हे सर्व जड होईल आणि सगळे पाश ती झुगारून देईल.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …