एखादे टपाल किंवा वस्तू संबंधित व्यक्तीपर्यंत व्यवस्थित पोहोचण्यासाठी पत्ता योग्य व पूर्ण असणे जितके महत्त्वाचे असते तितकेच एखादे ठिकाण गाठण्यासाठी त्या ठिकाणचा संपूर्ण पत्ता माहिती असणे आवश्यक असते. पत्ता अपूर्ण असेल, तर टपाल मूळ जागी परत पाठवले जाते. त्याप्रमाणेच योग्य पत्त्याविना इच्छित स्थळ गाठण्यात अडचण येऊ शकते किंवा वेळ लागू शकतो. आता गुगलभाऊ ती अडचण बºयाच प्रमाणात सोडवतो आणि तसेही हल्लीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात टपालाने पत्र पाठविणे जवळजवळ बंदच झाले आहे. त्यामुळे पत्ता या बाबतीत गौण ठरतो, परंतु बरीचशी सरकारी कागदपत्रे टपालानेच पाठवली जातात. तेव्हा मात्र पत्ता आवश्यकच ठरतो. कुरियरसाठीही पत्त्याची आवश्यकता असतेच.
पत्ता सांगण्याच्या, विचारण्याच्या पद्धतीत बºयाच गंमतीजमती आढळून येतात. पत्ता विचारला जातो अशी हमखास ठिकाणे म्हणजे पेपरस्टॉल, टपरीवजा दुकाने, पानपट्टीची दुकाने इत्यादी. रेल्वे स्टेशनबाहेरचा पेपरस्टॉलवाला तर पत्ता विचारण्यासाठी हक्काचा माणूसच असावा इतक्या सहज त्याच्याकडे येणारे जाणारे पत्ता विचारत असतात. तोही न कंटाळता पत्ता सांगत असतो. माझ्या माहितीतील असाच एकजण गंमतीशीर पद्धतीने पत्ता सांगत असे. ग्रँटरोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेल्या त्याच्या पेपरस्टॉलजवळ येऊन नाना चौक कुठे आहे, अशी विचारणा करणारे बरेच जण असत. त्यावेळी चणेवाल्याकडून चाराण्याचे चणे घेऊन ते खात खात पुढे जायला तो सांगत असे. जेव्हा चणे संपतील, तेव्हा नाना चौक येईल, असा सल्लाही देत असे. पत्ता सांगण्यातील रुक्षपणावर त्याने त्याच्या परीने शोधलेला हा गंमतीशीर उपाय होता.
रेल्वे स्टेशनच्या बाहेर एखाद्याची वाट पाहणारे पत्ता विचारणाºयांच्या तावडीत सापडतात. अशा माणसांना हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे पूर्व किंवा पश्चिम बाजू कुठली? त्यानंतर पत्ता विचारला जातो. अशावेळी वाट पाहणे बाजूलाच राहते. थोड्या फार अंतराने कोणी ना कोणी पत्ता विचारण्यासाठी गाठतोच. तुम्हालाही असा अनुभव नक्की आला असेल. मुंबईत लँडमार्क महत्त्वाचा ठरतो. तो असेल, तर पत्ता सांगणे आणि त्यामुळे निश्चित ठिकाण गाठणे थोडेसे सोपे होते. काही जण पत्ता देताना तर असेही सांगतात की, तिथे आल्यावर कोणालाही विचारा तो तुम्हाला नेमक्या ठिकाणी आणून सोडेल. काहींच्या बाबतीत ते खरेही असते, परंतु बºयाच वेळा असाही अनुभव येतो की, त्या व्यक्तीला ओळखणारे कमी निघतात आणि मग पत्त्याची शोधाशोध ठरलेलीच असते. काही जणांना पत्ता परत परत विचारायची सवय असते. म्हणजे एखाद्याने तो नक्की कुठे आहे हे सांगितल्यावर आणखी दोघा-तिघांना विचारून पक्की खात्री झाल्यावरच पुढचे मार्गक्रमण करतात, परंतु नंतरही ते ठिकाण गाठेपर्यंत थोड्याथोड्या वेळाने त्यांचे पत्ता विचारणे चालूच असते. ‘असा मी असामी’ या पुस्तकात पुलंनी वर्णन केलेला पत्ता शोधण्याचा गंमतीशीर प्रसंग वाचताना वाचकाच्या चेहºयावर हसू उमटते आणि सोबतच स्वत:ही कधीतरी अशाच प्रसंगातून गेल्याचे स्मरते. त्यामुळे दुहेरी हास्य मुखावर झळकू लागते.
पुण्याबाबत अशी वंदता आहे की, तिथे पत्ता सरळ सांगितला जात नाही. पुणेरी पाट्याबाबत प्रसिद्ध असलेल्या पुण्यात ‘अमुक अमुकाचा पत्ता विचारू नये’, अशी पाटीही आढळल्याचे ऐकण्यात, वाचनात आले आहे. मध्यंतरी माझ्या नजरेसही अशी पाटी चक्क मुंबईत एका दुकानात पाहण्यात आली होती. मुंबईसारख्या शहरात नक्की पत्ता माहिती नसेल, तर टॅक्सी, रिक्षाने ते गाठण्याचा प्रयत्न खर्चिक ठरू शकतो. काही प्रामाणिक चालकांचा अपवाद वगळता तुम्हाला नेमक्या ठिकाणी सोडेपर्यंत भाडेमीटरचा आकडा नक्कीच वाढलेला असेल.
अमिताभ आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या ‘दोस्ताना’ चित्रपटातील एका गाण्यात, तर असे बोल आहेत, ‘पता कोई पूछे तो कहते हैं हम के एक दुजे के दिल मे रहते हैं हम’. यातील अतिशयोक्तीचा भाग सोडला, तरी असा निश्चित पत्ता असेल, तर पत्ता सापडायला वेळ लागत नाही. पत्त्याचे ठिकाण सापडल्यानंतर आपण समाधानाचा सुस्कारा टाकतो. त्यामुळे पत्ता अचूक असणे गरजेचेच असते.
– दीपक गुंडये.\\