प्रेमावर बोलू काही

व्हॅलेंटाइन डे आला की, अनेक जण प्रेमळ होतात; पण आजकाल व्हॅलेंटाइन हा डे न राहता विक किंवा सप्ताह असतो. ७ तारखेपासून रोज काही ना काही तरी दिवस असतात. या दिवसात हे प्रेम वेगवेगळ्या प्रकारे उतू जात असतं. ७ फेब्रुवारी रोझ डे, ८ फेब्रुवारी प्रपोज डे, ९ फेब्रुवारी चॉकलेट डे, १० फेब्रुवारी टेडी डे, ११ फेब्रुवारी प्रॉमिस डे, १२ फेब्रुवारी हग डे, १३ फेब्रुवारी किस डे आणि १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाइन डे. मग हे सात दिवस झाल्यावर पुढे दिवस जाईपर्यंत प्रेम करायचे. किती छान ना? आयला आमच्यावेळी असलं काही नव्हतं. अर्थात त्यामुळे तरुण पिढीवर आम्ही जळत नाही बरं का.

हा प्रेमाचा उत्सव खरोखरच मजेशीर आणि आनंददायी असावा. खरंच प्रेमळ हा शब्द किती सात्विक सभ्य वाटतो ना? माणसं प्रेमळ झाली, तर जगाचंच भलं होईल; पण सगळीच माणसे या फेब्रुवारी दिवसाच्या जवळपास प्रेमळ न होता प्रेमी होतात. प्रेमी म्हटलं की, तो पागल असल्यासारखाच वाटतो. लगेच मजनू दिसायला लागतो; पण प्रेम करायला एक विशिष्ठ दिवसच कशाला पाहिजे? अहो प्रेमाने जग जिंकता येते, मग तो एकच दिवस येऊन कसे चालेल? पण हा दिवस जग जिंकण्यासाठी नाही, तर आपल्या प्रेमिकेला जिंकण्यासाठी आहे म्हणे. एकदा प्रेमिकेला जिंकायचं आणि आयुष्यभर हरायचं; पण खरंच या दिवसापर्यंत खरे प्रेमी गप्प बसतील का?, १ मार्चला एखादा प्रेमात पडला, तर तो प्रेम व्यक्त करायला पुढचा १४ फेब्रुवारी येईपर्यंत गप्प बसेल का?, प्रेमाचा असा दिवस कशाला ठरवायचा ना?, म्हणजे श्वानांचा जसा भाद्रपद मास हा काळ असतो तसा हा माणसांचा काळ आहे, असा समज कोणत्या संस्कृतीतून आलेला आहे?, काय असेल ते असो; पण हा सप्ताह एकूणच रंगीत असतो.
आज काय तर म्हणे कीस डे आहे. आधीची पिढी म्हणेल आमच्यावेळी असलं काही नव्हतं. आमच्यावेळी फक्त बटाट्याचा नाही, तर रताळ्याचा कीस होता. तोही एकादशी आणि महाशिवरात्रीसाठी घेतला जायचा, म्हणजे खाण्यासाठी वापरला जायचा; पण आजकाल हा सप्ताह साजरा केल्यानंतरचे हे प्रेम म्हणजे ये फेविकॉलका जोड हैं, असे असते म्हणे.

अर्थात आपण प्रेमावर नेहमीच बोलत असतो. आपल्या संस्कृतीत प्रेम हेच सर्वश्रेष्ठ आहे. आपल्याकडचे साहित्य नाट्य हेही प्रेमावर आधारित आहेत; पण त्यामध्ये असा कोणताही विशिष्ठ दिवस निश्चित केलेला नसतो, म्हणजे आपल्याकडे किती नाटकांची नावे प्रेमावरून आहेत याचा विचार केला, तर त्यात चार दिवस प्रेमाचे, प्रेमाच्या गावा जावे, प्रेमा तुझा रंग कसा? प्रेमी चतुर प्रिया फितुर, अशी कितीतरी नाटकांची नावे सांगता येतील. प्रेमावरचे चित्रपटही भरपूर आहेत. अगदी प्रेम करू या खुल्लम खुल्ला, प्रेमासाठी वाटेल ते, कशासाठी प्रेमासाठी वगैरे वगैरे; पण यातही कुठे विशिष्ठ दिवशीच प्रेम करायचा संदेश दिलेला नाही, तर प्रेम हे सतत करायची प्रक्रिया आहे. प्रेम हे माणसांना जोडण्यासाठी आहे; पण या व्हॅलेंटाइनच्या प्रेमात फक्त वासुगिरीच दिसते. म्हणजे रोज डे… दिलं गुलाबाचं फूल. प्रपोज डे…. विचारलं…. चॉकलेट डे…. दाखवलं आमिष….. टेडी डे….दिली लोकरीची बाहुली कुरवाळायला….. हग डे…… मारलीच मिठी कचकन…. अन मग किस डे….. पण आज मिठी मारायची आणि उद्या किस करायचा…. हे पण तसं विलंबाचंच संथपणाचंच लक्षण आहे ना? आज फक्त मिठ्या मारायच्या आणि उद्या फक्त पाप्या घ्यायच्या? किस म्हटलं की कसंपॉश, हायप्रोफाइल वाटलं ना? पापी किवा पप्पी म्हटलं की पाप केल्यासारखं वाटतं. हाच फरक आहे; पण ही सगळी वासुगिरीच आहे.
या वासुगिरीतूनच मुलींवर होणारे हल्ले, अत्याचार असले प्रकार घडतात. चार दिवसांपूर्वी चॉकलेट डेच्या निमित्ताने साताºयातील एका महाविद्यालयात मुलींच्या दोन गटात झालेली मारामारी हे असलेच वासुगिरीचे प्रकार आहेत. वासुगिरी म्हणजे वासू-सपनाचे खरे प्रेम नाही, तर या प्रेमाचा वासच वेगळा असतो. जे या एका दिवसाची वाट पाहत प्रेम व्यक्त करायला थांबलेले असतात. ते प्रेमी प्रेमळ नाही, तर वासनांध असतात असे म्हणावे लागेल. अशा वासूंसाठी हे प्रेम असावे असे दिसते.

पण प्रेम ही पवित्र भावना आहे. ती फक्त एक दिवसाची कधीच नसते. कवी जगताना प्रेमावर कविता करायला खूप आवडतात. सर्वाधिक कविता या प्रेमावरच्या असतात. किंबहुना जो कवी असतो. तो आपल्या आयुष्यात एक तरी प्रेम कविता करतोच करतो, कारण प्रेम ही उत्कट भावना आहे. त्या उत्कट प्रेमाला वाट करून देण्यासाठी म्हणून काव्य प्रकट होते; पण हे काव्यही काही १४ फेब्रुवारी ही तारीख डोक्यात ठेवून प्रसवत नाही. ते केव्हाही निर्माण होत असते, म्हणूनच प्रेम ही अगाध, अथांग असलेली भावना असताना ती एका विशिष्ठ दिवसाची बाब आहे, असे समजणे म्हणजे तो प्रेमाचा अपमान आहे. खरंतर पाश्चिमात्य देशातून आलेला हा व्हॅलेंटाइन डे. तो आपल्याकडे गेल्या पंचवीस वर्षांत साजरा होऊ लागला; पण हा सण आता त्या पाश्चिमात्य देशात तरी साजरा होत आहे की नाही, हे पाहावे लागेल. कारण हा दिवस पवित्र प्रेमाचा वाटतच नाही. तो कामांध प्रेमाचा दिवस वाटतो; पण या दिवसाने प्रेमाकडे पाहण्याची दृष्टी बदलून गेलेली आहे हे नक्की.
आपल्याकडे प्रेमाला नेहमीच पवित्र मानले गेले आहे. प्रेम हे काही फक्त प्रियकराने प्रेयसीवर किंवा प्रेयसीने प्रियकरावर करायची भावना नाही. ते आपण कोणावरही करू शकतो. सर्वात प्रथम आपले आपल्यावर प्रेम असले पाहिजे. आपल्यावर प्रेम असेल, तर मनुष्य तेजस्वी होतो. स्वत:ला स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतो. आपले मन आणि शरीर दोन्ही स्वच्छ ठेवण्यासाठी स्वत:वरचे प्रेम महत्त्वाचे असते. आपल्या कुटुंबीयांना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी प्रेम हे महत्त्वाचे असते. महाभारतात आपल्या मुलांमध्ये फूट पडू नये, म्हणून अर्जुनाने पणावर जिंकलेल्या द्रौपदीशी पाचही भावंडांनी विवाह करावा, असे कुंती सांगते. पाचही जणांना प्रेमाने बांधण्यासाठी केलेला तो प्रयत्न होता. प्रेम आपण आपल्या कामावर केले, तर आपण यशस्वी होतो. जो कामावर प्रेम न करता पाट्या टाकण्याचे काम करतो, तो कधीच यशस्वी होत नाही. तो कामगारच राहतो. प्रेम आपण चराचरातील प्रत्येक गोष्टीवर करू शकतो. आपल्या आसपासच्या परिसरावर प्रेम केले, तर आपण कोठेही कचरा टाकणार नाही. रस्त्याने थुंकणारे, वाटेत कचरा टाकणारे हे देशावर प्रेम करणारे लोक नाहीत. आपण आपली भारतमाता म्हणतो त्या मातेवर थुंकण्याचे काम कुठेही थुंकणारे लोक करत असतात. त्यांना जर देशप्रेम समजले, तर आपोआप सगळा देश स्वच्छ होईल; पण आपल्याकडे स्वच्छता अभियान राबवावे लागते. प्राणी कुठेही विशेषत: भटकी कुत्री कुठेही घाण करतात; पण आपल्यात आणि त्यांच्यात फरक आहे. त्यांच्यात प्रेम ही भावना नसते; पण आपल्याला भावना आहेत. हा देश आपला आहे, हे राज्य, हे शहर, हे गाव आपलं आहे. त्यावर आपले प्रेम आहे. मग स्वच्छतेसाठी आपल्याला का सांगावे लागते? कारण प्रेमाचा अभाव असतो. यासाठी प्रेमाच्या नेमक्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.

प्रफुल्ल फडके/मुखशुद्धी
9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …