पाकिस्तान नरमाईच्या भूमिकेत?


पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासोबत शत्रुत्वाची भूमिका सोडून संवादाची भाषा करण्याचा मानस एका मुलाखतीत व्यक्त केलाय. याअगोदरही पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण आखताना भारतासोबत जुळवून घेण्याची भूमिका त्यांनी मांडली होती. यातून पाकिस्तान नरमतोय हे सष्ट होतेय; पण त्यांच्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा?
धार्मिक राजकारणाला प्रोत्साहन देणारा, दहशतवाद्यांना आश्रय देणारा आणि पुरते आर्थिक दिवाळे निघालेला पाकिस्तान हा देश अवघ्या जगात बदनाम झालेला आहे. भारतासाठी तर पाकिस्तान ही कायमचीच डोकेदुखी ठरलाय. अशा देशाचे नेतृत्व सध्या पंतप्रधान इम्रान खान यांच्या हातात आहे. महागाई, बेरोजगारी, धार्मिक पंथीय संघर्ष व अंतर्गत फुटीरतावाद या समस्यांनी पोखरलेला आणि चीन तसेच काही इस्लामिक देशांच्या आर्थिक मदतीवर कसाबसा तग धरून राहणारा पाकिस्तान यापुढे एक विश्वसार्हत देश म्हणून उभा करायचा असेल, तर देशाला बदलावे लागणार या विचाराने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान झपाटलेले दिसतात.
पाकिस्तानच्या सर्वच राज्यकर्त्यांनी आपला जन्मजात शत्रू म्हणून भारतासोबत कायमच शत्रुत्व घेतले. काश्मीरच्या मुद्यावरून ते तसेच धगधगत ठेवले, त्यासाठी भारतावर त्यांनी दोन सरळ युद्धे व दोन छुपे युद्धे लादली. खलिस्तानवाद्यांना आणि काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना शस्त्रे व पैशांची मदत दिली. त्यांच्यासाठी पाकिस्तानच्या भूमीत शस्त्रांचे प्रशिक्षण देणारी केंद्रे चालवली. पाकिस्तानचे सर्व लक्ष्यच भारताला धडा शिकविण्यासाठी केंद्रीत झाल्याने तो स्वत:च आपल्याच जाळ्यात फसत गेला. एवढे सर्व करूनही भारताला उपद्रव व डोकेदुखी देण्यापलीकडे पाकिस्तान भारताचे काहीच वाकडे करू शकला नाही.
तथापि भारतासोबतच्या अशा शत्रुत्वामुळे पाकिस्तान धार्मिक आणि आर्थिक संकटात फसत गेला. देश चालविण्यासाठी त्यांना नेहमीच जागतिक संस्था समोर कर्ज मिळविण्यासाठी झोळी घेऊन फिरावे लागले. भारताच्या शत्रुत्वाचा बागुलबुवा उभा करत कधी अमेरिकेकडून आर्थिक मदत मिळवायची, तर कधी चीनकडे स्वत:ला गहाण ठेवायचे. नाही तर मग इस्लामच्या नावाने इस्लामिक देशांपुढे भीकेचा कटोरा घेऊन उभे राहायचे. हेच पाकिस्तानचे गेल्या ७० वर्षांतले अर्थकारण राहिले आहे. सध्या तर पाकिस्तानवर अशी परिस्थिती ओढवली आहे की, पाकिस्तानमधील विरोधी पक्षातील नेत्यांनीच पंतप्रधान इम्रान खानवर टीकेची झोड उठवताना, पाकिस्तानला जगापुढे कायम भीक मागायला लावणारे इम्रान खान, हे पंतप्रधान नसून आंतरराष्ट्रीय भिकारी आहेत, असा आरोप केलाय. अशा वातावरणात पाकिस्तानची सत्ता संभाळणारे इम्रान खान राजकीय संकटांनी घेरले गेलेत. चोहुबाजूंनी समस्यांनी घेरलेल्या पाकिस्तानला आणि स्वत:च्या पक्षाच्या राजकारणाला वाचवायचे असेल, तर भारतासोबतचे शत्रुत्व मिटविणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची नवी प्रतिमा तयार करणे या वाचून गत्यंतर नाही. याचा अंदाज इम्रान खान यांना आल्याने ते आता भारतासोबत संवाद साधण्यासाठी नरमाईची भाषा करताना दिसत आहेत. या संदर्भातच दोन वाहिनींवर दिलेली मुलाखत प्रमाण मानता येते. रशियाच्या दोन दिवसांच्या दौºयावर जाण्यापूर्वी इम्रान खान यांनी ही मुलाखत दिलेली असल्याने त्यामागचा राजकीय अर्थ समजून घेता येतो. भारत हा रशियाचा विशेष आणि सर्वात जुना मित्र असल्याने रशिया दौºयापूर्वी वातावरण निर्मितीचा हा भाग आहे.
या मुलाखतीत भारतासोबतच्या संबंधावर चर्चा सुरू होताच इम्रान खान यांनी आपली बाजू मांडताना भूमिका स्पष्ट केली ती या शब्दात, ‘तेहरिक-ए-इन्साफ हा माझा पक्ष २०१८ साली सत्तेत येताच मी भारताशी संपर्क साधून चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. आमच्यासाठी फक्त काश्मीरचा प्रश्न महत्त्वाचा आहे. भारतासह सर्व देशांशी व्यापार करण्यास आमची तयारी आहे. भारतोसोबतचे मतभेद दूर करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मी टीव्हीवरून चर्चा करू इच्छितो’ एकूणच या मुलाखतीत भारतासोबत संवाद करू इच्छिणाºया इम्रान खानची भाषा नरमाईची होती.
परंतु त्यावर विश्वास किती ठेवायचा हा सर्वात गहन प्रश्न आहे, कारण पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीसदलावर हल्ला झाला, तेव्हा पाकिस्तानमध्ये इम्रान खानचेच सरकार सत्तेत होते. तसेच भारताने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्यावर पाकिस्तानने भारताशी असलेले व्यापारी संबंध तोडले, तेव्हाही पाकिस्तान सरकारचे नेतृत्व इम्रान खानच करीत होते. त्यामुळे पाकिस्तानच्या बदलत्या भूमिकेला भारताला सावध दृष्टीकोनातूनच पाहायला हवे.
असे असले, तरी इम्रान खान पाकिस्तानला खरच बदलू इच्छित असेल, तर मात्र भारतानेही त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे, कारण पाकिस्तानच्या धर्मवादी आणि दहशतवादी राजकारणाचा सर्वात अधिक उपद्रव हा भारतालाच भोगावा लागत आहे. शेवटी शेजारी बदलता येत नाहीत, हे सत्य ही विसरून चालणार नाही. याचे कारण जानेवारी महिन्यात पाकिस्तानचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा धोरण जाहीर झाले होते, त्यातही पाकिस्तानने प्रथमच भारतासोबत जुळवून घेण्याची भूमिका मांडताना आम्हाला भारतासोबत शत्रुत्व नको, तर शांतता हवी अशी भावना स्पष्ट केली होती. म्हणूनच यापुढे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रत्येक नरमाईच्या भाष्याकडे भारताला गांभीर्याने पाहावे लागणार आहे.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …