ठळक बातम्या

पणतीतील वात काळोख गिळते, उजेड देते

यावर्षी झालेल्या दिवाळीवर एसटी कर्मचाºयांच्या संपाचे सावट होते. दिवाळीपूर्वीच काही आगारांचा संप सुरू होता, तर काही आगारांनी दिवाळीनंतर संपाला सुरुवात केली, पण दिवाळी जसजशी जवळ येऊ लागते, तसतशी सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांची धांदल उडते. याचे कारण त्याचे केवळ पगारावरच चालत असते. चतुर्थश्रेणी किंवा कामगार जगतातील लोक यांना दिवाळी ही पर्वणीची वाटते, पण मध्यमवर्गीयांना ही अधिक खर्चाची वाटत असते. याचे कारण साग्रसंगीत दिवाळीचा झगमगाट करताना, कौटुंबिक आनंद मिळवताना त्याच्या अवतीभवतीच्या जगाचाही त्याला विचार करावा लागतो.
घरातील मोलकरीण, दादा दिवाळीचे काय झाले?, असा प्रश्‍न विचारते, तेव्हा न कुरकुरता त्या मोलकरणीला एक महिन्याचा पगार द्यावा लागतो. मोलकरीण जर झांबाज असेल, तर ती त्यावर थांबत नाही. पैशांबरोबरच कपडे देण्याची मागणीही करते. मोलकरणींची उपलब्धता आणि विश्‍वासार्हता यावर हा खर्च अवलंबून राहतो. या मोलकरणींना नाखूश करून चालत नाही. त्यांना आपण सांगू शकत नाही की, बाई आम्हालाच बोनस नाही, तर तुला कसे आम्ही देणार?, नोकरदारवर्गाला दिवाळीचा बोनस किंवा सानुग्रह अनुदान जे दिले जाते ते यासाठीच असते. आपली पुढची यंत्रणा व्यवस्थित सुरू राहिली पाहिजे, पण सरकारने मागणी मान्य केली नाही किंवा व्यवस्थापनाने बोनस दिला नाही, तरी त्याला मात्र आपल्या घरातल्या गड्यांना, मोलकरणींना बोनस द्यावा लागतो. एका महिन्यात दोन-तीन महिन्यांचा खर्च करताना त्याची अगदी तारांबळ उडते. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि नोकरदारांना दिवाळी ही त्रासदायक वाटते. यावर्षी महिन्याच्या सुरुवातीलाच दिवाळी आल्याने अनेकांची अशीच अवस्था झाली. एकतर पगार लवकर झाले आणि दिवाळीपूर्वीच संपून गेले. पुढचा पगार होईपर्यंत सामान्य नोकरदारांची सध्या तारेवरची कसरत आहे.

नोकरदारांबाबत म्हटले जाते की, एक ते दहा गरम गरम, ११ ते २० नरम नरम आणि २१ ते ३० बेशरम जगायचे असे जीवन असते. पगार येतो तेव्हा खिसा गरम असतो, मनसोक्त विचार न करता खर्च केला जातो. ११ ते २० जरा नरमाईचे हातचे राखून खर्च करण्याचा प्रयत्न होतो, पण २१ नंतर जवळपास संपलेले असते. त्यामुळे लाज सोडून म्हणजे बेशरम पणाचे जीवन सुरू होते. उधारी उसनवारी सुरू होते. यातून तो कधीच बाहेर पडत नाही.
एरवी कधी वेळेवर न येणारे पोस्टमन या दिवसात हमखास वेळेवर येतात. तो तसा निरूपद्रवी प्राणी असतो, पण त्याला दिवाळीची पोस्ट द्यावी लागते. आपली आठवड्यातून, दिवसातून येणारी काही पत्रे त्याने इमानेइतबारे वर्षभर आणून पोहोच केलेली असतात. न कंटाळता जिने चढून वर येऊन पत्र घरपोच केल्याबद्दल वर्षातून एकदा एखादी हिरवी नोट त्याच्या हातात टेकवावी लागते.

दरमहा एचपीचा किंवा भारत पेट्रोलियमचा सिलिंडर दर महिन्याला नोंदवल्यानंतर चार दिवसांनी घेऊन येणा‍ºया गॅस एजन्सीच्या निळ्या नाहीतर लाल कपड्यातील कामगारांना एखादी महात्मा गांधी छाप नोट द्यावी लागते. कारण का तर गॅसची टंचाई निर्माण झाली, तरी आपल्याला नंबर न डावलता त्याने काळा बाजार करून त्रास देऊ नये. गॅसची पाइप उंदरांनी कुरतडली किंवा खूप दिवस ती घरात असल्यामुळे जुनी झाल्यामुळे गॅस लिक होत असेल. सिलिंडरचे गास्केट गेले असेल तर निर्माण होणा‍ºया धोक्याच्या वेळी मदतीला त्याने वेळेवर धावून आले पाहिजे. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने तो येतो, तेव्हा त्याला सांगता येत नाही की, बाबा रे आम्हाला बोनस नाही तर तुम्हाला कुठून देणार?, सामान्य मध्यवर्गीय माणसाचे हे दुखणे असते. दुस‍ºयांनी दिवाळी आनंदात करावी यासाठीच त्याला पणतीतील वातीप्रमाणे या दिवाळीत अक्षरश: जळावे लागते. कारण या सगळ्यांच्या दृष्टीने तो माणूस साहेब असतो, सर असतो. हे साहेबपण, सर पण टिकवून ठेवण्यासाठी त्याला हे खर्च टाळता येत नाहीत. गॅस संपला आहे, दुसरा सिलिंडरही केव्हा जाईल सांगता येत नाही. महिना महिना मिळणार नाही असे म्हणतात. अशी भुणभुण बायकोने लावू नये आणि आपल्याला आॅफिसातून आल्यावर चहाचा कप हातात मिळावा म्हणून गॅसचा सिलिंडर घेऊन येणा‍ºयाला ही दिवाळी बक्षिसी द्यावीच लागते. महिन्यातून एकदा डोक्यावरचा भार कमी करण्यासाठी आणि आॅफिसात बरे दिसावे यासाठी करावी लागणारी कारागिरी दिवाळीच्या आधी जास्त प्रेमाने होते. पाठीवर दणके मारत मालिश केल्याच्या नादात तो कारागिर साहेब, दिवाळी द्या बर का असे हक्काने सांगतो. त्याला नाही कसे म्हणणार?, अरे आम्हाला दिवाळीची काहीच कमाई नाही, तर तुला काय देणार असे सांगायचे?, पण त्याने प्रेमाने गालावरून हात फिरवून लावलेल्या पावडरीचा मोबदला त्याला द्यायलाच लागतो. आठवड्याला लाँड्रीची कागदात गुंडाळलेली कपड्यांची थप्पी घेऊन येणारा आणि नियमीत कपडे घरातून घेऊन जाणारा दिवाळीत कपड्यांची थप्पी घेऊन येतो आणि बिल दिल्यानंतरही घुटमळतो, तेव्हा त्याला केवळ चहाचा कप देऊन कटवता येत नाही. त्याचीही पाच पन्नासची अपेक्षा असते. त्याला द्यावी लागते बक्षिसी. नाही दिली तर तो तुमचा आवडता कपडाच नेमका जाळून ठेवेल किंवा त्यावर डाग पाडेल. कपडे जळले अथवा खराब झाले तर आम्ही जबाबदार नाही असे त्याच्या पावतीवर आधीच लिहिलेले असते. त्यामुळे काही बोलताही येणार नाही. कपडे वॉश करताना किंवा ड्रायक्लिनिंग करताना शर्टच्या बटणांची जबाबदारी तो घेत नाही. चांगली इस्त्रीची घडी घातलेला लाँड्रीतून आलेला शर्ट अंगात घालायचा आणि मग लक्षात येते की शर्टची बटणेच ड्रायक्लिनिंगच्या वेळी तुटलेली आहेत. पुन्हा दुसरा ड्रेस घालावा लागतो. असे प्रकार वारंवार घडू नयेत म्हणून त्या पो‍ºयाला आपल्याला नोट सरकवावी लागते. त्याला सांगता येत नाही की, आम्हाला बोनस मिळालेला नाही म्हणून. कामगार आणि चतुर्थ श्रेणीतील माणसांना दिवाळीची अशी छोटी छोटी म्हणत भरपूर कमाई होत असते. दिवाळी निमित्त व्यावसायिक उलाढाल वाढल्याने व्यापारीवर्गाला फायदा होत असतो. हा फायदाही मध्यवर्गीय आणि मोठ्या वर्गातील खरेदीदारांमुळे झालेला असतो, पण सामान्य मध्यमवर्गीय माणूस मात्र दिवाळीत दुस‍ºयांवर खर्च करता करता स्वत:ला सावरत असतो. सर्वांच्या घरात दिवाळीच्या पणत्या लागाव्यात म्हणून नाईलाजाने का होईना त्याला काही ना काही द्यावे लागते. हे सगळे खर्च केल्यानंतर जे काही शिल्लक राहते त्या लक्ष्मीची पूजा इमाने इतबारे तो करतो. त्याच्या या प्रामाणिकपणाचा आनंद घेत पाडव्याला त्याची पत्नी त्याला ओवाळते. भाऊबीजेला आपल्या मुलांना असलेल्या सख्ख्या आणि मानलेल्या सगळ्या बहिणींना ओवाळणी देण्यासाठीही त्याला तरतूद करायची असते. हे सगळे खर्च करत सगळ्यांच्या चेह‍ºयावरील अनमोल आनंद टिपताना त्याला विसरायचे असते की, आपल्याला बोनस मिळालेला नाही. कामगार जगतात संप करून, प्रशासनास जेरीस आणून आपल्या मागण्या दामटून वसूल करण्याच्या जगात बुद्धिजीवी माणसांची मात्र होरपळ असते. तीच त्याच्या जीवनाची वात असते. पणतीतील वात स्वत: जळते दुस‍ºयांना उजेड देते. दिवाळीची पणती म्हणजे ख‍ºया अर्थाने मध्यमवर्गीय माणसाची स्थिती असते.
– प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

भारतीय संविधान दिन

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, ‘जर मला संविधानाचा गैरवापर होत …

One comment

  1. Pingback: blog link