पंजाबच्या प्रचारात खलिस्तानी आणि भय्या!

निवडणुकीच्या रणधुमाळीत आपलाच पक्ष जिंकावा आणि सत्तेत यावा यासाठी राजकीय पक्षांचे नेते जनतेच्या मूलभूत प्रश्नांना बगल देत धार्मिक-प्रांतीक विषयांवर भाष्य करत मतदारांना चेतवतात. पंजाबच्या निवडणुकीच्या प्रचारात खलिस्तानी आणि भय्या यांचा प्रवेश झाला आहे, तो अशा सत्ताकारणाच्या लोभानेच.
पंजाबच्या विधानसभेसाठी काल (रविवारी) मतदान झाले. ११७ आमदारांची विधानसभा असलेल्या या राज्यात निवडणुकीच्या अंतिम प्रचार टप्प्यात सत्ताधारी काँग्रेस पक्ष, भाजप आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांची आघाडी व अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष यांच्यात सत्तेच्या सिंहासनासाठी तुंबळ राजकीय लढाई होताना दिसून आली. पंजाबच्या यावेळीच्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाचे आपापले अंतर्गत स्वतंत्र दुखणे असल्याने जनतेच्या मुळभूत समस्यांच्या निवारणासाठी योजना-धोरणे यांवर अधिक भाष्य करण्यापेक्षा एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याच्या नादात नको त्या विषयांवर राजकारण पेटवले गेले.

पहिली समस्या सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षापासूनच सुरू होते. २०१७ साली ११७ पैकी ७७ जागा जिंकून काँग्रेसने पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवली होती, पण त्यावेळी पंजाब काँग्रेसचे नेतृत्व अमरिंदर सिंग यांच्या हातात होते. त्यांनी आता स्वतंत्र पक्ष स्थापन केलाय. त्यामुळे तेथे पक्षपातळीवर नेतृत्वावरून गोंधळ दिसून येतोय. नवे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात पक्षपातळीवर नेतृत्वासाठी संघर्ष चालू आहे. त्यातच राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून चरणजितसिंग यांनाच पुढची चाल दिल्याने महत्वाकांक्षी सिद्धू दुखावलेले आहेत.
प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्यात निवडणुकीच्या काळातच सुप्त संघर्ष सुरू असल्याने पंजाबमधील काँग्रेस भांबावलेली आहे. त्यामुळे सत्ता राखण्याचे फार मोठे आव्हान मुख्यमंत्री चरणजितसिंग यांना पेलावे लागणार आहे. दुसरीकडे कसेही करून पंजाबची सत्ता मिळवायचीच या हट्टाने पेटलेले आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल मोफतगिरी आश्वासनांची खैरात करत सुटलेले आहेत. त्यांनीही आपल्या पक्षातर्फे खासदार भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित करून प्रामाणिक राजकारणाची भाषा करत काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करत प्रचार केलाय. २०१७च्या निवडणुकीत ‘आप’ने सुद्धा २० आमदार जिंकून आणले होते. त्यामुळे केजरीवाल यांनी या निवडणुकीत पुरता जोर लावत सत्तेच्या दावेदारीवर आपला हक्क सांगितलाय. दिल्लीत शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, बस वाहतूक या क्षेत्रात लक्षणीय कामे केलीत, तशीच पंजाबमध्येही करू, असा त्यांचा एकूण प्रचार होता.

तिसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदी पंजाबच्या जनतेला ‘मला तुमची सेवा करण्यासाठी पाच वर्षे द्या’ अशी विनवणी करताना दिसले. पण शेतकºयांच्या आंदोलनाची झळ, शेतकºयांची नाराजी यांमुळे तेथे भाजपला कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पक्षावरच अवलंबून राहावे लागणार असेच वाटते. असा एकूण पंजाब विधानसभा निवडणुकीचा राजकीय बेरीज, वजाबाकीचा खेळ सुरू असताना प्रचाराच्या अंतिम टप्प्यात अचानक खलिस्तानवादी आणि भय्यांचा मुद्दा निघाल्याने राजकीय वादळ निर्माण झाले व त्याची चर्चा देशभर सुरू झाली. काल पंजाबमध्ये मतदान झाले, तरी या विषयावरचे राजकीय वादंग मात्र पुढेही चालत राहाणार आहे.
भारताच्या अखंडतेला आव्हान देत शिखांचा स्वतंत्र देश बनविण्यासाठी फुटीरतावाद्यांनी ‘खलिस्तान’ची मागणी लावून धरली. त्याचे परिणाम देशाने १९८०च्या दशकात भोगलेत. मोठ्या प्रयासाने पंजाबमधील अतिरेक्यांचा हा फुटीरतावाद गाडून टाकण्यात केंद्र सरकारला यश मिळाले. तरीही खलिस्तानचे समर्थन करणारे काही अतृप्त आत्मे संघटनांच्या माध्यमातून अशा फुटीरतावादाला खतपाणी घालत असतात. त्यापैकीच ‘शीख फॉर जस्टीश’ ही संघटना परदेशामधून खलिस्तानचे समर्थन करीत असते. याच संघटनेने पंजाबच्या निवडणुकीत केजरीवाल यांच्या ‘आप’ पक्षाला समर्थन देणारे पत्रक काढल्याने मतदानाच्या तोंडावर या मुद्यावरून पंजाबमधील वातावरण पेटले.

मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली. यामुळे केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या. २०१७ सालच्या निवडणुकीतही खलिस्तानवाद्यांशी त्यांचे संबंध असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. खलिस्तानवाद्यांच्या विषयावरून ‘आप’ पक्ष अडचणीत येतोय असे वाटत असताना पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनीच चंदिगड येथील प्रचार सभेत बोलताना, ‘उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्लीतील भय्यांना पंजाबात घुसू द्यायचे नाही, या मंडळींना येथे राज्य करू द्यायचे नाही, त्यासाठी सर्व पंजाबी नागरिकांनी एकजूट होणे गरजेचे आहे’ असे भाष करून वाद ओढवून घेतला.
मुख्यमंत्र्यांच्या भय्यागिरीमुळे काँग्रेस पक्षावर हल्ला करण्यासाठी मग ‘आप’चे केजरीवाल आणि भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे सरकावले. पंतप्रधानांनी ‘काँग्रेस पक्षाने एका राज्यातील नागरिकांना अन्य राजातील नागरिकांशी झुंजविण्याचे काम केले’, असा आरोप केला तर केजरीवाल यांनी, ‘चन्नी यांचे वक्तव्य अत्यंत लाजीरवाणे असून, आम्ही त्याचा निषेध करतो’ असे भाष्य केले. अशाप्रकारे पंजाबच्या निवडणुकीच्या अंतिम प्रचारात पंजाबी जनतेच्या खºया समस्यांवर चर्चा न करता खलिस्तानवादी आणि भय्यांचे अतिक्रमणावरच राजकीय हमरीतुमरी झाली. पंजाबी जनतेने यावर मतांच्या माध्यमांतून काय संदेश दिले ते १० मार्चलाच कळेल!

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …