न विसरता येणारे वळण!

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान वर्षभरापूर्वी नडगिवे घाटातील धोकादायक वळणे काढली गेली. या घाटातील कोल्ह्याची मोरी (मोरी म्हणजे घाटाच्या एका बाजूकडील पावसाचे पाणी दुस‍ºया बाजूने खाली वाहून नेण्यासाठी रस्त्याखालून काढलेली पाइपलाइन) हे हमखास अपघाताचे ठिकाण ठरले होते. गोव्यावरून येताना तीव्र उतार व जवळपास काटकोनात वळणारा रस्ता यांमुळे चालकाला वेगावर नियंत्रण ठेवता येत नसे. साहजिकच अपघात हा ठरलेलाच. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे या वळणावर वाहन उलटण्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. त्यामुळे हे वळण व यासारखी अनेक वळणे काढली गेलेली आहेत. तसे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अजूनही प्रगतीपथावर आहे. त्यामुळे या कामादरम्यान इतरही वळणे भविष्यात निकाली निघणार आहेत.
चौपदरीकरणामुळे प्रवासाचा वेग वाढणार आहे, पण प्रवास सुरक्षित होईल का?, हा कळीचा सवाल आहे. कारण वेग वाढल्यावर वेगमर्यादा पाळण्याचे प्रमाण कमी होते आणि वाहने भरधाव हाकली जातात. महामार्ग, द्रुतगती मार्ग यांवरील अपघातांचे विश्लेषण केल्यास नेमके तेच कारण समोर येते. अशावेळी वळण हे एक प्रकारे वेग नियंत्रणच करते असे म्हणता येईल. नाहीतर आपण म्हणतोच की चांगले वळणच माणसाला योग्य मार्गावर नेते. महामार्गावर वेगवेगळ्या सूचनाफलकांतून पुढे असणा‍ºया वळणांची सूचना दिलेली असते. जसे स्वैराचारी वागण्याला योग्य वळणाची गरज असते तेच काम महामार्गावरील वळण करू शकते. फक्त चालकाने सूचनाफलकांवरील सूचनांकडे लक्ष द्यायला हवे. वळणे निकालात निघाल्यावर तशा सूचना पाहायला मिळणार नाहीत. त्यामुळे मनाचा ब्रेक हाच उत्तम ब्रेक हे चालकांना कायम लक्षात ठेवावे लागेल.
याचवेळी कोल्ह्याच्या मोरीची बातमी नकळत जुन्या काळात घेऊन गेली. गावी गेल्यानंतर याच वळणावर रस्त्याला लागून असलेल्या उंचवट्यावरील एक काळा दगड हे नेहमीचे विश्रांतीचे ठिकाण असे. कधी डोंगरातून फेरफटका मारून झाल्यानंतर इथे येऊन बसायचो. तर कधी संध्याकाळी मुद्दाम वेळ काढून या खडकावर येऊन बसायचो. येथे बसल्यानंतर खालच्या अंगाने वळणातून येणारी जाणारी वाहने दृष्टीस पडायची. खालच्या बाजूला नडगिवे गावची आमची गुंडयेवाडी. तेथील घरे, शेती, वेगवेगळी झाडे दिसायची. सभोवतालचा परिसर न्याहाळता यायचा. मुख्य म्हणजे या ठिकाणाहून सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य डोळ्यांत साठवता यायचे. हळूहळू अस्ताला जाणा‍ºया सूर्यामुळे समोरच्या आभाळाच्या विशाल पडद्यावर निरनिराळ्या रंगांची उधळण व्हायची. कधी कधी ढगांच्या आडून सूर्य लपंडाव खेळायचा. कधी क्षणात नजरेआड व्हायचा तर कधी हळूच ढगाआडून बाहेर येऊन वाकुल्या दाखवायचा. सूर्यास्ताचे रमणीय दृश्य पाहताना भान हरपून जायचे आणि अंधार दाटलेला लक्षातच यायचा नाही. अंधार झाल्यावर मात्र थोड्या हिरमुसल्या मनानेच पावले घराकडे वळायची. त्या काळ्या खडकावर बसल्यानंतर छायाचित्रकार जागा व्हायचा आणि हातातील मोबाइल निरनिराळी दृश्ये टिपून घ्यायचा. त्या छायाचित्रांचा संग्रहच आता मला परत भूतकाळात घेऊन जातोय. कोल्ह्याच्या मोरीबरोबरच ते ठिकाण अस्तंगत होणार हे नक्की असले, तरी मनाच्या महामार्गावर मात्र ते कायम असणार ही त्याच काळ्या दगडावरची रेघ आहे.
– दीपक गुंडये

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …