नेतृत्व कोण करणार?

 

सध्या देशात नव्या आघाडीच्या हालचाली सुरू आहेत. केंद्रातील भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर करण्यासाठी सर्व स्थानिक, प्रादेशिक विरोधी पक्ष आतूर झाले आहेत. एकीकडून ममता बॅनर्जींनी याविरोधात काही दिवसांपूर्वी हाक दिली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यासाठी गेल्या काही दिवसांपासून आग्रही आहेत, तर रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे याच उद्देशाने महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षांना भेटले. त्यामुळे हा प्रयत्न यशस्वी होणार का याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे.
अर्थात या सर्व विरोधी पक्षांचा उद्देश जरी खूप चांगला असला, तरी ते वास्तवात कसे येणार याचा उलगडा होणे कठीण आहे, कारण कोणतीही आघाडी ही नेतृत्वाखाली तयार होत असते. आज या विरोधकांकडे नेतृत्वाचाच अभाव आहे. या आघाडीचे नेतृत्व कोणी करायचे हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत भाजपला शह देणे तितकेसे सोपे नाही.

अशीच परिस्थिती पूर्वी काँग्रेसची होती. काँग्रेस विरोधात कोणी उभे राहू शकत नव्हते; पण १९७७ साली जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्ष एकत्र आले. आपले मूळचे झेंडे बाजूला ठेवून जनता पक्षाच्या नांगरधारी शेतकरी या खुणेच्या झेंड्याखाली एक आले, तेव्हा या देशात काँग्रेसला हालवण्याची क्रांती घडली. इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाहीला शह देता आला.
आज तशी परिस्थिती आहे का?, म्हणजे तशी परिस्थिती निर्माण करत नाही तोपर्यंत हे स्वप्नच पाहणे चुकीचे आहे?, जयप्रकाश नारायण यांच्याप्रमाणे देशव्यापी नेतृत्व कोण आहे? अंधेरे में एक प्रकाश… जयप्रकाश जयप्रकाश… अशी घोषणा दिली तेव्हा त्या अंधारात लख्ख प्रकाश पडणाºया मशाली तयार झाल्या. त्यात जनसंघ होता, समाजवादी पक्ष होते. असे आता सर्वमान्य नेतृत्व या देशात आहे का?

प्रत्येक प्रादेशिक पक्षाला स्वत:ला नेतृत्व करायचे आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. संपूर्ण देशभरात त्यांना ओळखले जाते; पण ममता बॅनर्जी यांचे संख्याबळ आणि ताकद त्यांच्यापेक्षा जास्त असल्याने त्या नेतृत्वासाठी आग्रही आहेत. शिवसेनेचीही ताकद राष्ट्रवादीपेक्षा मोठी आहे. त्यामुळे हे नेतृत्व शिवसेनेने करावे, असे वाटणे स्वाभाविक आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचे लोकसभेतील संख्याबळ काहीच नाही. तरीही पक्ष म्हणून मोठा असल्याने आणि इतर राज्यांत तो पक्ष पसरलेला असल्याने त्यांनाही नेतृत्वाची इच्छा आहे. त्यात आता तेलंगणामधून के. चंद्रशेखर राव आले आहेत. त्यांचीही महत्त्वाकांक्षा लपलेली नाही. यापैकी कोणीही आपापले झेंडे बाजूला ठेवू शकणार नाही. त्यामुळे या परिस्थितीत सध्या तरी भाजपविरोधात आघाडी करणे कोणालाही शक्य नाही. भाजपविरोधात आघाडी उभी करायची असेल, तर ती काँग्रेसच्या नेतृत्वाखालीलच करावी लागेल, कारण काँग्रेस हा पक्ष संपूर्ण देशभर पसरलेला आहे. लोकसभेतील त्यांचे संख्याबळ अन्य विरोधकांच्या तुलनेने सर्वात जास्त आहे. त्यामुळे काँग्रेसला बाजूला ठेवून ही आघाडी शक्य नाही. त्यासाठी फक्त दोनच पर्याय आहेत. काँग्रेसला बरोबर घेऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडी करणे किंवा सर्वांनी आपले झेंडे बाजूला ठेवून नवा पक्ष स्थापन करावा आणि १९७७च्या जनता पक्षाप्रमाणे चमत्कार घडवावा; पण मोदींच्या भाजपच्या भगव्याविरोधात हे हिरवे, नीळे, तांबडे आणि उर्वरित भगवे आपले रंग पुसण्याचे धाडस दाखवणार आहेत का?, मग नवा कोणता रंग बाकी असणार आहे?
रविवारच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केसीआर म्हणाले आम्ही पुन्हा एकत्र भेटून देशातील राजकारणावर आणखी चर्चा करणार आहोत. ही चर्चा कशावर असणार आहे? भाजप हटाव हे सर्वांना वाटते, त्यावर एकवाक्यता आहे. पण नेतृत्वाबाबत एकवाक्यता नाही, हेच त्याचे कारण आहे. त्या नेतृत्वावरच चर्चा होणार हे नक्की. सर्वमान्य नेतृत्वाचा चेहरा उभा करणे हे फार मोठे आव्हान असेल. या प्रत्येक चर्चेत काँग्रेसला बाजूला ठेवण्याचे प्रयत्न असतील, तर दुसरीकडे काँग्रेस अधिक प्रबळ होईल, अशी शंका आहे.

केंद्रातील भाजप सरकारविरोधात तिसरी आघाडी निर्माण करण्याचे संकेत नुकतेच केसीआर यांनी दिले होते. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी याचेच संकेत दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही हाच मुद्दा अधोरेखित करत एका सुडाचे राजकारण संपले पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. यावेळी तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी म्हटले की, आज एक सुरुवात झाली आहे आणि आम्ही थेट स्पष्टपणे सांगितले. आम्ही इतर नेत्यांशीही खुलेपणाने बोलू. कशाप्रकारे तिसºया आघाडीची सुरुवात होईल, याबाबत आम्ही चर्चा करू. अत्यंत वाईट पद्धतीने केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहेत, यात काही शंकाच नाही. मात्र, केंद्र सरकारला ही नीती बदलावी लागेल, अन्यथा त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. याचा अर्थ हा फक्त इशारा आहे. प्रत्यक्षात यातले काही होईलच, असे नाही.
काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीनेही असे प्रयत्न केले होते; पण त्यांना भाजपने दिल्लीतच बांधून ठेवले आहे. त्यापुढे त्यांना सरकता येत नाही. दिल्लीच्या थंडीत केजरीवाल मफलरमध्ये इतके पॅकबंद झाले आहेत की, आता त्यांना तिसरी आघाडी हा विषयही आठवत नाही.

ममता बॅनर्जी यांच्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावरून एक नक्की आहे की, महाराष्ट्राच्या नेत्यांशिवाय हा चमत्कार कोणी करू शकरणार नाही. पण महाराष्ट्राचे नेतृत्व मान्य करणे हे बाहेरच्या राज्यांना शक्य होईल का? उत्तरेतील आणि दक्षिणेतील राज्य नेहमीच महाराष्ट्राचा फायदा घेतात; पण लाभ देण्याची वेळ आली की, महाराष्ट्राला डावलतात. अशा परिस्थितीत महाराष्ट्राने या आघाडीचे नेतृत्व करण्यावर एकवाक्यता होणार का?
महाराष्ट्राला डावलून कोणालाही हे करता येणे शक्य नाही. त्याचप्रमाणे काँग्रेसला वगळून आघाडी उभी करणे हे सोपे नाही. देशात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोनच मोठे पक्ष आहेत. त्या दोन विचारांना धरूनच बाकी पक्षांना जावे लागेल. काँग्रेसने या आघाडीत आम्ही पंतप्रधानपद आणि नेतृत्वाची अपेक्षा न ठेवता येतो, असे स्वीकारणे शक्य झाले, तर ही आघाडी तयार होईल. पण आज आघाडीचे स्वप्न पाहण्याचे काम जे पक्ष बघत आहेत त्यांची त्यांच्या राज्यातच ताकद इतकी कमी आहे की, संपूर्ण देशव्यापी नेतृत्वाची धुरा त्यांच्याकडे कोणीच देणार नाही. त्यामुळे जोपर्यंत नेतृत्वाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत हे दिवास्वप्नच राहील.

प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …