नूतन

नूतन म्हणजे स्वर्गीय गौतम राजाध्यक्ष यांच्या मते परफेक्ट फोटोजेनिक चेहरा; अशी अभिनेत्री जिचा कोणत्याही अँगलमधून फोटो घ्या उत्कृष्टच येणार; नूतन फक्त दिसायलाच सुंदर नव्हती, तर अभिनयामध्ये देखील श्रेष्ठ होती. सर्वात जास्त फिल्मफेअर जिंकणारी नायिका म्हणून ती चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात दबदबा राखून होती. नूतन म्हटले की, सहज आठवणारी गाणी म्हणजे ‘छोड़ दो आँचल जमाना क्या कहेगा.’ या गाण्यामध्ये नूतन व देव आनंद ही जोडी इतकी रोमँटिक दिसली आहे की, विचारायची सोय नाही. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात नूतनने अनेक प्रकारचे कानातले घातले होते; ते सर्व डूल त्यावेळी फॅशन आयकॉन म्हणून कॉलेज तरुणींमध्ये लोकप्रिय झाले होते.

देव व नूतनचे गाजलेले दुसरे गाणे म्हणजे ‘इक घर बनाऊंगा, तेरे घर के सामने’ या गाण्याचे पिक्चरायझेशन त्याकाळी खूप गाजले होते. दारूच्या ग्लासमध्ये देव आनंदला नूतन दिसत आहे व त्याच वेळी देव त्या ग्लासमध्ये बर्फाचा तुकडा टाकतो; तेव्हा तो बर्फ आधी बाहेर टाकून दे, अंगावर शिरशिरी येईल हे आर्जव नूतनने आपल्या अभिनयातून काय मस्त व्यक्त केले होते व हाच अभिनय या गाण्याचा हायलाईट होता.
नूतन म्हटले की आठवतो ‘बंदिनी’ हा चित्रपट; यामध्ये ‘अब के बरस भेज भैया को बाबुल; सावन में लीजो बुलाय रे’ हे गाणे आहे; यात खरंतर नूतन ही बॅकग्राऊंडलाच आहे; पण हे गाणे गायिका आशा भोसले यांच्यासाठी खूप खास होते. घरच्यांच्या मर्जीविरुद्ध पळून जाऊन आशा ताई यांनी लग्न केले होते. त्यामुळे त्यांना माहेरचे दरवाजे बंद झाले होते; या गाण्यातील सिच्युएशनमधून स्वत: आशा ताई त्यावेळी जात होत्या. त्यामुळे या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी त्या खूपच भावूक झाल्या होत्या. बंदिनी म्हटले की, नूतनवर चित्रीत झालेले अजून एक खास गाणे म्हणजे ‘मोरा गोरा अंग लइ ले मोहे शाम रंग दइ दे छुप जाऊँगी रात ही में मोहे पी का संग दइ दे’ हे गाणे म्हणजे गुलजार साहेबांनी लिहिलेले पहिले गाणे; त्यामध्ये त्यांनी चंद्राला राहू ग्रासतो व ग्रहण होते या हिंदू संकल्पनेची छान सांगड घातली आहे. नायिका चंद्राला शाप देताना म्हणते, ‘बदरी हटा के चंदा, चुपके से झाँके चंदा, तोहे राहू लागे बैरी, मुस्काएजी जलाईके.’ काबुलीवाला हा चित्रपट बंदिनीच्या आधी रिलीज झाल्यामुळे त्याची गाणी म्हणजे गुलजार साहेबांची पहिली कलाकृती हा गैरसमज काही जणांचा झाला आहे.

नूतन म्हटले की, आठवतो चित्रपट ‘सरस्वतीचंद्र’ व त्यामधील गाणे ‘चंदनसा बदन, चंचल चितवन, धीरे से तेरा ये मुस्काना.’ हे गाणे मेल व फिमेल अशा दोन्ही व्हर्जनमध्ये असल्याने या दोन व्हर्जन्समध्ये नूतनचे दोन वेगवेगळे अभिनय पाहण्याचे सौभाग्य चाहत्यांना लाभले आहे. हे गाणे किंवा पूर्ण चित्रपटच सर्वार्थाने नूतनचा होता, कारण यातील नायक हा फारसा लोकप्रिय नव्हता.
नूतन म्हटले की ‘निगाहें मिलाने को जी चाहता हैं; दिल-ओ-जान लुटाने को जी चाहता हैं’ हे गाणे रसिकांना आठवणार नाही असे कसे होईल?, आपण कोरियोग्राफर सरोज खान यांना माधुरी किंवा श्रीदेवीची कोरियोग्राफर म्हणून ओळखतो; पण याच सरोज खान हे गाणे कोरियोग्राफ केले होते हे अनेकांना ठाऊक नाही.

‘अनाडी’ चित्रपट म्हटले की, आठवतात राज कपूर व नर्गिस; या चित्रपटातील सर्वच गाणी हिट आहेत; काहींना ‘वो चाँद खिला, वो तारे हँसे’ हे गाणे आवडते, तर काहींना ‘सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी’ हे गाणे भावते. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे नूतन सोडून बाकी सर्व जणांचा या चित्रपटाच्या निमित्ताने सन्मान झाला. राजकपूरला सर्वोत्तम नायक, शंकर जयकिशनला उत्तम संगीतकार, ललिता पवार यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री, मुकेशला सर्वोत्तम पार्श्वगायक, तर शैलेंद्रला उत्कृष्ट गीतकार असे पुरस्कार मिळाले, पण जरा थांबा; नूतनला देखील त्यावर्षी फिल्मफेअर मिळाले; पण चित्रपट ‘सुजाता’साठी.
सुजाता चित्रपट व नूतन म्हणजे एक भावनिक बंधच होता. काळी सावळी, खालच्या जातीतील मुलगी म्हणून कायम हेटाळली जाणारी नायिका नूतनने साकारली होती. या चित्रपटामध्ये टेलिफोनवर गायले गेलेले आजवरचे सर्वोत्कृष्ट चित्रपटगीत आहे. नायक सुनील दत्त ते गीत गात असतो व नूतन ते दुसºया बाजूने ऐकत असते. खरंतर गीताचे बोल ऐकल्यावर कोणतीही प्रेयसी आनंदाने मोहरून गेली असती; पण नूतन जिने आयुष्यभर नुसती हेटाळणी अनुभवलेली असते तिला ती स्तुती देखील काट्यांसारखी टोचत असते; गाणे अर्थातच ‘जलते हैं जिसके लिए तेरी आँखों के दिये ढूँढ लाया हूँ वही गीत मैं तेरे लिए’ उच्च दर्जाचा मूकाभिनय कसा असतो याचे प्रात्यक्षिक नूतनने या गाण्यात दिले आहे. त्यामुळेच हे गाणे सुनील दत्तचे न राहता नूतनचे झाले आहे. ज्या तलत मेहमूदने ‘जलते हैं जिसके लिए तेरी आँखों के दिये’ हे गाणे गायले हे तोच नूतनचा हिरो देखील झाला होता; चित्रपट होता ‘सोनेकी चिडियाँ’; यातील ‘सच बता तू मुझसे फिदा’ हे चुलबुले गाणे अनेक गान रसिकांच्या स्मृतीमध्ये आहे.

नूतनचा सीमा हा चित्रपटदेखील लाजवाब आहे. ‘बात बात में रूठो ना, अपने आप को लुटो ना; ये रंग बदलती दुनिया हैं, तकदीर से अपनी रूठो ना’ या गाण्यामध्ये रुसलेल्या नूतनला हसविण्याचे काम केले आहे, शुभा खोटेने. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे जेवणाच्या थाळ्या व चहाचे कप यांचे बॅलन्सिंग करत शुभाने केलेला गाण्यातील वावर. सीमा, सुजाता, बंदिनी या सर्व चित्रपटांसाठी नूतनला फिल्म फेअर मिळाले होते. दर चार वर्षांनी नूतनने एकूण ४ फिल्मफेअर पटकाविले. चौथे फिल्मफेअर होते मिलन चित्रपटासाठी.
मिलन चित्रपटामधील ‘सावन का महिना पवन करे सोर’ हे गाणे व त्यातील ‘शोर नहीं सोर’ ही मुकेश व लता दीदींमधील नोंकझोक खूपच प्रसिद्ध आहे; हे गाणे साकारले आहे ते आपल्या नूतन व सुनील दत्त या लोकप्रिय जोडीने.

‘मधुबन खुशबू देता हैं’ एक अजून एक अनवट गाणे नूतनवर चित्रीत झाले आहे; साऊथचे सुपरस्टार येशुदासने हे गाणे गायले आहे; या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे या गाण्यात नूतनने अगदी वेस्टर्न स्टाइल ड्रेस, साडीपासून ते थेट पंजाबी ड्रेसपर्यंत वेगवेगळे पोशाख परिधान केले आहेत.
नूतन या मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल मला सार्थ अभिमान व जिव्हाळा आहे, कारण विक्रमी ५ वेळा तिने उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला आहे; तिच्यासोबत बरोबरी केली आहे, ते फक्त तिच्या भाचीने म्हणजे काजोलने.

– प्रशांत दांडेकर/9821947457\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …