निसर्गाला कमी लेखू नका

मानव हे निसर्गाचे अपत्य आहे. आजवर माणसाने अनेकदा निसर्गावर मात करण्याचा उन्मत्तपणा केला आहे. ज्या-ज्यावेळी कु‍ºहाडीचा दांडा गोतास काळ होऊ लागला, त्यावेळी निसर्गाने माणसाला आपले रूद्र रूप दाखवले. माणसाने घरासाठी, जळणासाठी प्रचंड जंगलतोड केली.
झाडे तोडून निसर्गाचे अंत:करण मानवाने दुखावले. माणसाची सावली नष्ट झाली, उन्हाचे प्रमाण वाढले आणि अवर्षणाच्या रूपाने निसर्गाने आपला प्रकोप व्यक्त केला. झाडे तोडली गेल्यामुळे मातीची धूप वाढली. सुपीक जमीन रेताड बनू लागली. निसर्गाचा हा संताप माणसाला जाणवला नाही. नद्यांच्या रूपाने मिळालेले पाणी माणूस दूषित करू लागला. औद्योगिक प्रगतीचा उन्माद माणसाला चढला. हवा दुषित!, पाणी दूषित!, ध्वनी प्रदूषण! त्यामुळे उन्मत्त माणसाला संतप्त निसर्गाने धडा शिकवण्याचे योजले. नाना साथीचे आजार, विविध व्याधी त्यामुळे माणूस हतबल झाला.

जेव्हा शहराच्या विकासासाठी माणूस समुद्राला मागे ढकलू लागला, तेव्हा समुद्र खवळला. मागे लोटलेला सागर दुसºया किनाºयावर पुढे सरकला. माणसांनी आपला सारा केर-कचरा समुद्रात टाकला. मग खवळलेला समुद्र ओहोटीच्या रूपाने माणसाचा सर्व कचरा त्याला परत देतो. मोठमोठी जहाजे उलथून टाकतो. वेळोवेळी भीषण वादळाचा तडाखा देऊन समुद्र आपला राग व्यक्त करतो. धरणी ही निसर्गाचे महान रूप आहे! आपल्या सृजनतेने ती माणसाच्या जीभेचे चोचले पुरवते; पण ही धरणी कधी तरी कोपते आणि मग धरणी कंप होतो. पाहता-पाहता सुखाने नांदणारे शहर नष्ट होते. मग अमाप मनुष्य हानी होते.
किल्लारी, भूज येथे झालेल्या भूकंपात माणसाने निसर्गाचा हा प्रकोप अनुभवला आहे; पण अनुभवाने शहाणा होईल, तर तो माणूस कसला? आपण निसर्गाचे नियम मोडले की, निसर्ग कोपणारच. निसर्गावर आपण वाजवीपेक्षा जास्त भार घालतोय. माणसानं लोकसंख्या इतकी वाढवली की, त्याला घरं, जमीन, अन्नधान्य, पाणी, रोजगार सगळंच कमी पडू लागलं.

लोकसंख्या वाढवताना ना स्वत:च्या आर्थिक, शारीरिक कुवतीचा विचार केला, ना या निसर्गाकडून मिळणाºया वस्तूंचा विचार केला. राहण्यासाठी जागा अपुरी पडू लागली.
मग पाणथळ जागी, समुद्रात भर घालून काँक्रिटची जंगलं उभी केली. समुद्रात कचºयाचे ढीग जमवले. त्यामुळे त्सुनामीसारखी भयंकर वादळे, भूकंप होतात. गावची गावं नाहीशी होतात. बळींची संख्या वाढत राहते. डोंगर कापले, झाडे कापली. धरती उजाड झाली. त्यामुळे पाऊस कोपला. आपल्या मर्जीप्रमाणे वाटेल तेव्हा, वाटेल तसा, वाटेल तिथे पाऊस कोसळू लागला. कोपीष्ट पावसाने ना ओल्या दुष्काळाचा विचार केला, ना कोरड्या दुष्काळाचा! ओल्या दुष्काळानं अन्नधान्य कुजून गेली आणि कोरड्या दुष्काळाने अन्नधान्य करपू लागली. पाण्याविना, अन्नाविना माणसं उपाशी तडफडू लागली. चाºयाविना गुरंढोरं तडफडू लागली. हा निसर्गाचा कोपच नव्हे का?, निसर्ग अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्यावरचा भार कमी करतोय; पण एवढं करूनही आपण त्याला कुठे दाद देतोय?

निसर्गावर मात केल्याचे माणूस कितीही बाता मारत असला, तरीही निसर्गापुढे तो लहानच आहे. निसर्गाने व्यापलेले विश्व आणि त्यात मानवाचे स्थान यांचा विचार केला, तर असे लक्षात येते की, निसर्गापेक्षा माणूस लहानच आहे. कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला, तरीही कधी तरी त्या गर्वाचे घर खाली होते. निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो. एकदा निसर्ग कोपला की, त्याच्या पुढे मानवाचे काही चालत नाही, म्हणूनच निसर्गाला कधी कमी लेखू नये, नाही तर आपला नाश अटळ आहे.
– बाळासाहेब हांडे/९५९४४४५२२२\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …