‘निसर्ग आमुचा सखा, आम्हां जीवन देई फुका’ हे वचन सर्वांना माहीत आहेच. निसर्गाने आपणास भरभरून दिले आहे आणि देतही आहे. फळं, भाजीपाला, धान्य, निसर्गातील प्रत्येक वस्तू आपल्याला भरभरून आणि तेही मोफत देतो. एखाद्या वर्षी पाऊस कमी झाला किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त झाला, तरी किती गैरसोय होते हे आपण पाहतोच. कित्येक काळापासून सजीवांना जीवंत ठेवण्याची व त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी निरपेक्षतेने निसर्ग करीत आहे, परंतु आपण निसर्गाला काय दिले?
‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘पाणी हेच जीवन’, ‘पाणी वाचवा’, ‘केरकचरा नदीनाल्यांत टाकू नका’, असे संदेश मानवाला देण्याची गरज आज भासत आहे. मन मानेल तशी वृक्षतोड सुरू आहे, डोंगर पोखरून तिथे काँक्रीटची जंगल उभी राहत आहेत. मेट्रो रेल्वे, रस्ते चौपदरीकरण, वाढते शहरीकरण सुरू आहे. प्रदुषणामुळे ओझोन वायूचा थर कमी होतोच आहे. इतकेच नव्हे तर वाघ, हरिण यांची शिकार करून त्यांच्या कातड्यांची तस्करी केली जाते किंवा दिवाणखाने सजवण्यासाठी वापर केला जातो. हस्तिदंताच्या वस्तूंसाठी हत्तीच्या दातांचा वापर केला जातो. कोठे चाललो आहोत आपण?
‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे’ हे तुकारामांचे वचन आपण ऐकतो किंवा म्हणतो पण उपयोगात काहीच आणत नाही. निरपेक्षतेने ज्या निसर्गाने आपणास सर्व काही दिले त्याची लूट थांबवायला हवी. जसा गुरू हा शिष्याला सर्व काही निरपेक्ष भावनेने देतो त्याप्रमाणेच निसर्गाचे आहे. निसर्गाकडून हीच प्रेरणा घेऊन त्याचे ओरबाडणे थांबवूया.
– प्राची वैद्य
९७६७६१३१४२\\