निर्बंध

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनलॉक कधी होणार?, सगळे निर्बंध कधी हटणार?, फेब्रुवारीनंतर शंभर टक्के अनलॉक होणार, मार्च अखेर होणार वगैरे चर्चा सुरू आहेत; पण खरंतर या चर्चा सगळ्या व्यर्थ आहेत. आज पाहिले, तर सगळं काही लख्खपणे सुरू असल्याचे दिसत आहे. सगळे कामासाठी बाहेर पडत आहेत, रेल्वे, बस, सार्वजनिक वाहतूक सुरू आहे. मग बंद काय आहे?, शाळाही आता ब‍ºयापैकी सुरू आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट, बार जोरात चालले आहेत. मग आणखी कोणते निर्बंध हटवायचे बाकी आहेत, हा प्रश्न पडतो.
खरंतर देशाची आर्थिक घडी बसवण्यासाठी नागरिक व माल वाहतुकीवरील निर्बंध कमी होणे आवश्यक आहे, हे स्वीकारण्याजोगे आहे; मात्र कोरोनाचा धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही याचेही भान जनतेने व सरकारांनी ठेवले पाहिजे; पण आज खरोखरच बंधने आहेत का? सरकार, प्रशासन सातत्याने गर्दीच्या जागा टाळा, गर्दी करू नका, मास्क वापरा असे सांगत असली तरी बिनामास्क हिंडणारे किती तरी लोक रस्त्याने दिसतात. निवडणुकांचा प्रचार जोरात आहे. राजकीय कार्यक्रम जोरात आहेत. मंदिरे, प्रार्थनास्थळे सुरू झालेली आहेत. क्रिकेटचे सामने होत आहेत. भारत विजयही मिळवत आहे, मग अजून नेमके काय सुरू होणे बाकी आहे? अजून काही दिवसांनी राज्यात महापालिका, पालिका निवडणुकांचा हैदोस सुरू झाल्यावर तर कोरोना नावाचा काही प्रकार होता याचे विस्मरणही सर्वांना होईल. आपण पाच राज्यांतील निवडणुकांमधील परिस्थिती पाहत आहोतच ना. मग आता आणखी कोणते निर्बंध कमी होणे अपेक्षित आहे?, मुळात निर्बंध पाळले जात आहेत का, हाच प्रश्न आहे. आज संपूर्ण अनलॉक असल्याचीच परिस्थिती आहे. आमची राज्य परिवहनाची एसटीच काय ती बंद आहे. ती पण काही प्रमाणात; पण त्याचे कारण कोरोना नसून संप आहे. पण बाकी खासगी वाहतूक इतकी तुफान वेगात चालू आहे की, सामान्यांचे काहीही अडलेले नाही. मग आता निर्बंध कसले बाकी आहेत? खरंच हा अनाकलनीय प्रश्न आहे. आता लग्नकार्याचा आकडा हा विषय असू शकतो; पण लग्न आणि मयतावर निर्बंध घातलेले असले, तरी मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. राहता राहिला प्रश्न सिनेमा हॉल आणि नाट्यगृहांचा; पण ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे आता सिनेमागृहांकडे होणारी गर्दी कमीच होणार आहे. पूर्वी पंचवीस आठवडे चित्रपट चालायचे. आता २५ दिवस नाही, तर एकूण पंचवीश शो झाले तरी पुष्कळ अशी परिस्थिती आहे. त्यामुळे निर्बंधांची कोणती शिथीलता बाकी आहे, हे समजेनासे झालेले आहे.

खरंतर कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत असल्याने तिसरी लाट ओसरत असल्याची चिन्हे आहेत. हे लक्षात घेऊन राज्यांनी लादलेले जादा निर्बंध शिथिल करावेत किंवा ते पूर्ण मागे घ्यावेत, अशी सूचना केंद्रीय आरोग्य खात्याने सर्व राज्यांना केली आहे. यात प्रामुख्याने नागरिकांच्या वावरण्यावरील बंधनांचा विचार आहे. नवी रुग्णसंख्या, सक्रिय रुग्णसंख्या व विषाणू प्रादुर्भावाचा वेग (पॉझिटिव्हिटी रेट) लक्षात घेऊन राज्यांनी लादलेले नवे किंवा जादा निर्बंध सैल करण्याचा किंवा रद्द करण्याचा विचार करावा, असे पत्र केंद्रीय आरोग्य खात्याचे सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पाठवले आहे; पण निर्बंध आहेत का, हाच प्रश्न आहे. ज्याप्रकारे निर्बंध नसताना लोक वावरत होते, तसेच फिरताना दिसत आहेत. खरंतर आता कोरोना संपला, तरी प्रत्येकाने कायमस्वरूपी मास्क घालणे गरजेचे आहे. नवनवे रोग येतील जातील. पण त्याचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून आपल्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने कायमच आता मास्क वापरणे आवश्यक आहे. असे असताना निर्बंध शिथिल नाहीत, असे म्हणायचे आणि विनामास्क फिरणारे अनेक जण रस्त्याने दिसतात. लोकल ट्रेनमध्येही अनेक जण अत्यंत बेजबाबदारपणे वावरताना दिसतात. मग कसले निर्बंध हटवायचे हाच प्रश्न पडतो.
कोरोनाच्या साथीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी सीमा किंवा विमानतळांवर जादा निर्बंध लादणे काही महिन्यांपूर्वी योग्य होते; पण आता रुग्णवाढीचा आलेख उतरत असल्याने नागरिकांचा वावर व आर्थिक घडामोडींना त्याचा फटका बसता कामा नये, असे भूषण यांनी पत्रात म्हटले आहे. जानेवारीच्या मध्यास जेवढी रुग्णसंख्या होती किंवा नवे रुग्ण नोंदले जात होते, तेवढा वेग आता राहिलेला नाही हे आकडेवारी वरून दिसत आहे. भूषण यांची सूचना निश्चित योग्य असली, तरी लोकसंख्या आणि जनतेची मानसिकता यांचाही विचार होणे गरजेचे आहे.

ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा प्रसार या वर्षी झपाट्याने झाला. त्यामुळे जगात आणि भारतातही चिंता वाढली. केंद्र व राज्य सरकारांनी अनेक निर्बंध पुन्हा लादले. केंद्राने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे मर्यादित केली. परदेशातून येणाºयांना चाचण्या, विलगीकरण, सक्तीचे झाले. शाळा-महाविद्यालये बंद झाली, सर्व कार्यालयांमध्ये कर्मचाºयांच्या उपस्थितीवर बंधने आली. कारखाने-उद्योग यातील कर्मचारी संख्या रोडावली. याचा फटका अर्थव्यवस्थेला निश्चित बसला. त्याची व्याप्ती कळण्यास एप्रिल उजाडावा लागेल; परंतु ओमिक्रॉन हा अपेक्षेपेक्षा बराच सौम्य असल्याचे नंतर उघड झाले. त्याची लागण झाली, तरी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण खूप कमी होते, तसेच मृत्युदरही कमी आहे. आता बाधितांची संख्या २० हजारांच्या आसपास आली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही जानेवारीतील सर्वोच्च संख्येच्या पातळीच्या बरीच खाली आली आहे. देशपातळीवर पॉझिटिव्हिटी दरही २.६१ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांनी शाळा-महाविद्यालये उघडण्यास परवानगी दिली आहे. महत्त्वाच्या परीक्षाही प्रत्यक्ष म्हणजे ‘आॅफ लाइन’ पद्धतीने होणार आहेत. प्रश्न आहे तो सीमांवरील बंधनांमुळे मालवाहतूक सुरळीत होण्याचा व विमान तसेच रेल्वे, आंतर राज्य बस प्रवासाचा. हे सर्व प्रवास लवकर दोन वर्षांपूर्वीच्या पातळीवर येणे आवश्यक आहे.
खरं म्हणजे आता सरकारने नाही, तर नागरिकांनी आपण होऊन काही निर्बंध मनावर लादले पाहिजेत. सवय लावून घेतली पाहिजे. त्यादृष्टीने नागरिकांनी काळजी घेणे जरूरीचे आहे. गर्दी टाळणे हा विषाणूचा प्रसार टाळण्यातील महत्त्वाचा उपाय आहे; पण धार्मिक सण-कार्यक्रम आले की, नागरिक प्रचंड गर्दी करतात. हे गेल्या वर्षीही दिसले. खरेदीसाठी नागरिक ठराविक बाजारपेठांमध्येच जमतात. त्यामुळे पुन्हा फैलाव होऊ शकतो. बहुधा सर्व देशांनी कोरोना हा विषाणू आपल्याबरोबर कायम राहणार हे गृहीत धरले आहे. निर्बंध रद्द करताना त्याचा विचार करणे व काळजी घेणे अजूनही आवश्यक आहे. पुन्हा निर्बंध लावावे लागू नयेत, अशी स्थिती आता आली पाहिजे.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …