दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने निर्बंध शिथील करून सर्वसामान्यांना, व्यापाºयांना दिलासा दिलेला आहे. अर्थात यामागचे सामान्यांचे हित म्हणण्यापेक्षा आगामी काळात येणाºया निवडणुकांसाठी पोषक वातावरण तयार करणे हे धोरण आहे, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.
सध्या राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट (बरे होण्याचं प्रमाण) ९७.३९ टक्के आहे, तर मृत्यूचं प्रमाण २.१२ टक्के आहे. राज्यातील कमी होणारी कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता सरकारनं हळूहळू निर्बंध कमी करायला सुरुवात केली आहे. त्याप्रमाणे राज्यातल्या शाळा ४ आॅक्टोबरपासून सुरू करण्यात आल्या आहेत, तर आजपासून राज्यातील सर्व महाविद्यालयं सुरू होणार आहेत.
७ आॅक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे खुली करण्यात आली आहेत, तर राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ आॅक्टोबरनंतर सुरू होणार आहेत. अर्थात हे सगळं खुली करताना सरकारनं नियमावली जारी केली आहे. याशिवाय कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना राज्यात प्रवेश करण्यास मुभा देण्यात आली आहे. सोमवारी राज्य सरकारने हॉटेल, बार, दुकानांवरील निर्बंध पूर्णपणे शिथील केले आणि पूर्ववत सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. आता हॉटेल, बार रात्री १२पर्यंत, तर दुकाने रात्री ११पर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे दिवाळीत व्यापारी उलाढाल होण्यास फायदा होईल.
राज्य सरकारने हा निर्णय घेतला ते योग्यच झाले. त्यामुळे त्यांनी विरोधकांवर पूर्णपणे मात केल्याचे दिसत आहे, कारण आज जर ऐन दिवाळीच्या, जवळ आलेल्या लग्नसराईच्या हंगामात निर्बंध शिथील केले नसते, तर सरकारला आगामी काळात निवडणुकांच्या तोंडावर मतदारांनी जाब विचारला असता. निवडणुकांसाठी गर्दी चालते, सभा, प्रचारसभा घेण्यास मुभा आहे, मग व्यापाराला, जनजीवन सुरळीत करण्यात बाधा का आणली जात आहे? त्यामुळे हा निर्णय वेळीच घेऊन निवडणुकीच्या काळात आपल्या बाजूने चांगले वातावरण तयार करण्याचे काम सरकारने केलेले आहे. त्याचा नक्की फायदा सरकारमधील घटक पक्षांना होईल.
त्याचप्रमाणे रविवारीच आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, दिवाळीनंतर १ डोस घेतलेल्यांनाही लोकल प्रवासाची मुभा असेल. यातून त्यांनी जनतेला सवलत देत आपल्या बाजूने वातावरण तयार करण्यास सुरुवात केलेली आहे, हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे यावर्षीची दिवाळी निर्बंध मुक्त आणि आनंदाची जाईल यात शंका नाही.
विशेष म्हणजे मुंबईत रविवारी कोरोना संसर्गामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. कोविड-१९ चा संसर्ग पसरल्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूसंख्या शून्यावर आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (१८ आॅक्टोबर) कोविड टास्क फोर्सबरोबर बैठक केली. या बैठकीत काही ठोस निर्णय घेण्यात आले. यामध्ये राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याआधी १० वाजेपर्यंत ही वेळ मर्यादित होती आणि पार्सल सेवा सुरू होती. याशिवाय २२ आॅक्टोबरपासून अम्युझमेंट पार्क देखील सुरू होतील, असाही निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मग दिवाळीनंतर महाराष्ट्र निर्बंधमुक्त होणार, असे संकेत राज्य सरकारनं यातून दिले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गणेशोत्सव, दसरा या कालावधीतही रुग्णसंख्येत प्रचंड वाढ न झाल्यानं सरकार दिवाळीनंतर महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त करणार का, असंही विचारलं जात आहे. या निर्णयांचा राज्य सरकारला आगामी निवडणुकीत नक्की फायदा होईल हे यातून स्पष्ट होत आहे.
केंद्र सरकारचे प्रोत्साहन आणि त्याला राज्य सरकारने दिलेली साथ यामुळे राज्यात प्रभावी लसीकरण झाले. केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य सरकारने लसीकरणाचा वेग वाढवला. ८ ते १४ आॅक्टोबर विशेष सप्ताह राबवला. राज्यात जवळपास ९ कोटींच्या पुढे लसीकरण झालेले आहे. त्यामुळे हा संसर्ग आता कमी होताना दिसत आहे. अर्थात सद्यस्थितीत आपण अनेक गोष्टी सुरू करण्याची मुभा दिलीय; पण दिवाळीपर्यंत आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात असेल, तर निर्बंध पूर्ण उघडले पाहिजेत. सद्यस्थितीत आपल्याकडे जे रुग्ण येत आहेत, हीच तिसरी लाट म्हणावी लागेल. आणखी कोणती नवीन लाट येण्याची शक्यता वाटत नाही. दुसºया लाटेतच तिसरी लाट घुसून ती शांत होताना दिसत असावी, असे चित्र आहे. सध्या राज्यातील बहुसंख्य भागातील रुग्णसंख्या खालावत असली, तरी सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. काही शहरांमध्ये अद्यापही दररोज ५० हून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत; पण तिथेही लवकरच मात करता येईल, असे चित्र आहे. गेल्या काही दिवसांत अहमदनगरमध्ये अचानक वाढ होताना दिसत होती; पण तिथेही परिस्थिती सुधारताना दिसत आहे.
यामध्ये एक लक्षात घेतले पाहिजे की, सर्वसामान्य जनता आता सावध झालेली आहे. जर लॉकडाऊन झाले, पुन्हा बंद झाला, तर त्याचा त्रास आपल्याला होणार आहे. आपल्या रोजगारावर होणार आहे, याची जाणीव आहे. सध्या लसीकरणाबरोबर परप्रांतियांवर आणि त्यांच्याकडून होणाºया अस्वच्छतेवर नियंत्रण ठेवले, तर हे निर्बंध पुन्हा कडक करावे लागणार नाहीत हे स्पष्ट आहे.