ठळक बातम्या

नाटककार खानोलकर

अत्यंत कमी वयात साहित्यातील भरपूर विविधतापूर्ण कामगिरी करणारे नाटककार, साहित्यिक आणि कवी म्हणजे चिं. त्र्यं. खानोलकर. म्हणजेच चिंतामणी त्र्यंबक खानोलकर. कवितेसाठी आरती प्रभू या नावाने त्यांनी लेखन केले, पण कमी काळात जास्तीत जास्त समृद्ध साहित्य नाट्य संपदा निर्माण करून वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी त्यांनी निरोप घेतला, नाहीतर अजून एक ज्ञानपीठ पुरस्कार त्यांनी महाराष्ट्राला मिळवून दिला असता. साहित्याचे अनेक पैलू त्यांनी पाडले असले, तरी त्यांच्यातील नाटककार हा फार वेगळा आणि डोळस होता.

चिं. त्र्यं. खानोलकर यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील बागलांची राई, तेंडोली येथे झाला. त्यांच्या शिक्षणाची सुरुवात १९३६ साली वेंगुर्ले येथून झाली. १९३७ साली खानोलकर कुटुंब वेंगुर्ले सोडून सावंतवाडी येथे आले. सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कूलमध्ये त्यांनी इंग्रजी पहिली ते इंग्रजी चौथी पर्यंतचे शिक्षण घेतले. १९४५ पर्यंत खानोलकर कुटुंब सावंतवाडीमध्ये राहत होते. त्यांनतर शिक्षणासाठी खानोलकर मुंबईत ठाकुरद्वार येथे आले व नजीकच्या सिटी हायस्कूलमध्ये इंग्रजी पाचवीत प्रवेश घेतला. मे १९५० मध्ये ‘बालार्क’ या शालेय वार्षिकामध्ये त्यांची ‘भवितव्य’ ही कविता व ‘मोगºयाची वेणी’ ही कथा प्रसिद्ध झाली. पुढे कुडाळ येथे ते व त्यांच्या मातोश्री यांनी ‘वीणा गेस्ट हाऊस’ नावाचे लॉजिंग-बोर्डिंग सुरू केले. तेथे गल्ल्यावर बसून खानोलकर कविता करत. १९५१ मध्ये ‘सत्यकथा’ या नियतकालिकात त्यांची ‘जाणीव’ ही कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर ‘वैनतेय’ साप्ताहिकामध्ये त्यांची ‘कुढत का राहायचे?’ ही कविता प्रसिद्ध झाली व पहिल्यांदाच ते कवी म्हणून प्रकाशात आले.
१९५४ च्या जानेवारीत त्यांच्या ‘येईन एक दिवस’ या नाटकाचा प्रयोग झाला. रंगभूमीवर आलेले हे त्यांचे पहिलेच नाटक. त्याचवेळी ‘सत्यकथा’ नियतकालिकात त्यांची ‘शून्य श्रृंगारते’ ही कविता प्रसिद्ध झाली. आरती प्रभू या टोपणनावाने प्रसिद्ध झालेली ही पहिली कविता होती. त्यानंतर १९५७ मध्ये त्यांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरील कवी संमेलनात भाग घेतला हे त्यांचे आकाशवाणीवरील पहिले काव्यवाचन होते. १९५८ साली मालवण येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात खानोलकरांच्या पल्लवी या संपादित काव्य संग्रहाचे प्रकाशन झाले.

त्यानंतर त्यांचे ‘वीणा गेस्ट हाऊस’ बंद झाले. त्यामुळे त्यांनी नोकरीसाठी पुन्हा मुंबई गाठली. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांची आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर स्टाफ आर्टिस्ट म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर १९५९ साली त्यांचा जोगवा हा कविता संग्रह प्रकाशित झाला. १९६१च्या आॅक्टोबर महिन्यात कम्युनिस्ट असल्याच्या आरोपावरून त्यांना आकाशवाणीच्या नोकरीवरून काढण्यात करण्यात आले, मात्र ‘मौज’च्या अंकात आपल्या कविता प्रकाशित झाल्याचे बघून खानोलकर बावरून गेले. त्या अवस्थेतच त्यांनी खालील कविता लिहिली. ती अत्यंत गाजली.
ये रे घना

ये रे घना
न्हाऊं घाल

माझ्या मना…
खानोलकरांना भीती होती की, अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीमुळे आपली प्रतिभा, आपल्याला मिळालेली शब्दांची ही देणगी आपल्या हातून निसटून तर जाणार नाही ना. पण तसे काही झाले नाही. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य त्यांच्या अकाली निधनापर्यंत मराठी साहित्यसृष्टीत तळपतच राहिला.

कुडाळला असताना चिं. त्र्यं. खानोलकरांनी एक तीन अंकी नाटक लिहिले होते. त्याचा प्रयोगही कुडाळला झाला होता. त्यानंतर खानोलकरांनी एक शून्य बाजीराव लिहिले, ते रंगायनने विल्सन कॉलेजच्या रंगमंचावर सादर केले आणि प्रेक्षकांना आवडले. नाटकाच्या दिग्दर्शिका विजया मेहता होत्या. त्यामुळे ते नाटक किती उंचीचे असेल याची कल्पना करायला हवी.
कवी, कथाकार आणि पुरोगामी कादंबरीकार खानोलकर यांच्या नाटकांत दु:खाची अनेक रूपे उमटतात. नशीब आणि मनुष्य यांच्यात काय संबंध आहे?, पाप आणि पुण्य या संकल्पनांबद्दल त्यांचे काय मत आहे?, हे त्याच्या नाटकांनी दाखवले आहे. खानोलकरांची कविता ही त्यांची जीवनरेखा होती. त्यांच्या दु:खाची व्यथा त्यांच्या कवितांमध्ये व्यक्त झाली आहे. त्याला कदाचित तत्त्वज्ञान म्हणून दु:ख पाहण्याचे सामर्थ्य दिले गेले होते, केवळ दु:खाकडे तटस्थतेपासून दु:ख स्वीकारण्याच्या अपरिहार्यतेमुळे. कवी, कथाकार आणि कादंबरीकार म्हणून नावलौकिक मिळवलेल्या खानोलकर यांनी बºयाच काळानंतर नाटके लिहिण्यास सुरुवात केली. १९६६ मध्ये त्यांचे प्रसिद्ध नाटक ‘एक शून्य बाजीराव’ रंगमंचावर आले. अनेक रंग आणि शैली स्वीकारणारे बाजीराव स्वत:ला बºयाच रूपांत प्रकट करतो. कधी तो विदूषकाच्या शैलीत उभा राहतो, तर कधी भागवतकार, कथाकार किंवा कीर्तनकारांच्या शैलीत दिसतो. कधीकधी तो सर्कस विदूषक कलाबाजी करतो, आपल्या अंगांच्या अभिव्यक्तीसह त्याचा हेतू समृद्ध करतो आणि कधीकधी एकल नाटक सुरू करतो. कधी त्याच्या भाषेत संस्कृत भाषेचे काव्यत्व असते, तर कधी थोर लेखकांचा गूढ गोडवा, तर कधी लोकनाट्याचे विडंबन, कधी विवेकी विद्वानांची प्रतिष्ठा. या सर्व शोधांमध्ये बाजीरावांचे चारित्र्य त्याचे दु:ख, व्यथा, व्याधी व्यक्त करणारे रूप धारण करते. या कारणास्तव, केवळ मराठी नाट्यच नाही तर आधुनिक भारतीय रंगभूमीवर देखील एक शून्य बाजीराव हे एक ‘महत्त्वाचे नाटक’ आहे.

खानोलकरांची नाटके ही वेगळ्या प्रकारे गाजली. त्यातून दिग्गज कलाकार समोर आले. अजब न्याय वर्तुळाचा, अभोगी, अवध्य या नाटकांचे विषयच कमालीचे वेगळे आणि विचार करायला लावणारे. कालाय तस्मै नम: या नाटकाने तर व्यावसायिक आणि स्पर्धामधून धूमाकूळ घातला. १९८०च्या दशकात त्यांच्या रखेली या नाटकाने स्त्रीयांच्या अलोट गर्दीचे नाटक असा सन्मान मिळवला होता. म्हणजे रखेली म्हटल्यावर ते नाव तसे भयानक आणि ए सर्टिफिकेटचे वाटावे. पण सहकुटुंब पाहण्यासारखे ज्वलंत आणि सामाजिक विषयावरचे ते नाटक ठरले. अरुण सरनाईक आणि संजिवनी बिडकर यांनी या नाटकात जीव ओतून काम केले होते. त्यानंतर हेच नाटक पुढे कुलदीप पवार यांनी केले. याच नाटकाचे काही प्रयोग अन्य कलाकारांनीही केले, पण ते खानोलकरांचे लक्षात राहील, असे नाटक होते.
याशिवाय श्रीमंत पतीची राणी, सगेसोयरेही नाटके विशेष गाजली होती. सगळ्यात कमालीचे नाटक होते ते म्हणजे हयवदन हे नाटक. अभिनेते आणि दिग्दर्शकाला हे नाटक समजून घेऊनच करावे लागेल, अशी त्याची रचना होती. यातून रवींद्र मंकणीसारखे अनेक वेगळे कलाकार मराठी रंगभूमीला मिळाले होते. याशिवाय अंधा युग हे त्यांचे अनुवादित नाटक होते, असाही एक अश्वत्थामा, आई, आषाढातला एक दिवस, इस्तू जागा ठेव, एकनाथ मुंगी, एका नाटकाचा अंत, एका भुताचे भागधेय, एका राघूची गोष्ट, गुरू महाराज गुरू, देवाची आईही वेगळी नाटके होती. देवाची आई या नाटकाचा विषय तर इतका भयानक होता की, नाटक पाहताना अंगावरून शहारा यायचा. १९८०च्या दशकात प्रारब्ध किंवा देवाची आई अशा दोन नावाने हे नाटक प्रेक्षकांच्या समोर आले. पण यातून तृतियपंथीयांच्या भावविश्वाचा त्यांनी घेतलेला शोध हा अत्यंत भावणारा आहे. अत्यंत वैविध्य पूर्ण लेखन करणाºया खानोलकरांना अजून दहा वर्ष जरी आयुष्य मिळाले असते, तरी त्यांनी आपल्या सहज आणि वेगळ्या विषयांच्या लेखणीच्या जोरावर ज्ञानपीठसारखे पुरस्कार मिळवले असते.

प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा
9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …