नाटककार अशोक पाटोळे

१९८०च्या दशकात ज्या काही नाटककारांनी वेगळे काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे जे नाव लौकीकास पात्र ठरले, त्यामध्ये अशोक पाटोळे यांचे नाव घ्यावे लागेल. चित्रपट, नाटक, दूरदर्शन अशा सर्व आघाड्यांवर काम करत असतानाही त्यांचे स्थान हे वेगळे होते. नाटककार अशोक पाटोळे यांचे नाव लक्षात राहणारे असेच राहिले.
अशोक पाटोळे यांचे शालेय शिक्षण गिरगावातील विल्सन हायस्कूल येथे झाले. त्यांनी लिहिलेली पहिली कथा एका दैनिकात प्रकाशित झाली होती. पुढे ‘श्री दीपलक्ष्मी’, साप्ताहिक ‘मार्मिक’ आदी नियतकालिकांमधून त्यांनी लिहिलेल्या विनोदी कथा प्रकाशित झाल्या होत्या. त्यानंतर लेखक म्हणून हळूहळू अशोक पाटोळे यांची ओळख होऊ लागली. पाटोळे यांनी दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचेही लेखन केले होते. लहानपणापासूनच लिखाणाची आवड असलेले पाटोळे यांनी पहिल्यांदा १९७१ मध्ये ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ या एकांकिकेचे लेखन केले होते. यानंतर त्यांनी विनोदी व हृदयस्पर्शी अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांचे लेखन करत नाट्य क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

पाटोळे यांनी लिहिलेली २० नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. ‘झोपा आता गुपचूप’ हे त्यांचे पहिले नाटक. या नाटकाला व्यावसायिक आणि हौशी स्पर्धेतील नाटकांतही चांगला प्रतिसाद मिळाला होता. झोपा आता गुपचूप या नाटकावरूनच पुढे इना मिना डिका नावाचा चित्रपट आला होता. तोही तुफान गाजला होता, पण झोपा आता गुपचूप या नाटकाने धमाल आणली होती. नावावरून हे चावट नाटक असावे असे वाटायचे. कारण अशोक पाटोळे यांना चावटपणा नेहमीच आवडायचा. पण हे एक विनोदी असे नाटक होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता.
याशिवाय ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’च्या ‘एकटा जीव सदाशिव’ या नाटकात त्यांनी विनोदी नायकाची भूमिका केली होती. अशोक पाटोळे यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू असेच होते. चित्रकला, वक्तृत्व, गीतगायन व अभिनय यांचीही पाटोळ्यांना आवड होती. अनुपम खेर यांच्या कुछ भी हो सकता हैं या आत्मकथनात्मक नाटकाचे लेखन अशोक पाटोळे यांचे आहे. अशोक पाटोळे यांची अनेक नाटके हिंदी-गुजरातीतही यशस्वी ठरली आहेत. अशोक पाटोळे यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेनुसार कोणतेही धार्मिक अंत्यसंस्कार न करता त्यांच्या पार्थिवाचे देहदान करण्यात आले.

अशोक पाटोळे यांनी लिहिलेली नाटके आहेत त्यामध्ये अग्निदिव्य, आई तुला मी कोठे ठेवू? या नाटकांनंतर त्यांनी पुन्हा आई हा विषय घेऊन नाटक लिहिले. ते होते, ‘आई रिटायर होते.’ १९८०च्या दशकातील उत्तरार्धात हे नाटक तुफान हिट झाले, गाजले. याचे कारण या नाटकातून पुन्हा एकदा भक्ती बर्वे नव्याने रंगभूमीवर आली होती. भक्ती बर्वे यांच्या सहज सुंदर अभिनय आणि संवादफेकीतून हे नाटक तुफान लोकप्रिय झाले.
त्यानंतर त्यांनी अनेक नाटके लिहिली, चित्रपटांच्या कथा, पटकथा, संवाद लिहिले. पण त्यांची खºया अर्थाने चर्चा किंवा वादग्रस्त ठरले ते नाटक म्हणजे, ‘एक चावट संध्याकाळ’. हे नाटक तुफान गाजले. फक्त दोन पात्री असलेले आणि तेही दोन पुरुष पात्र असलेले हे नाटक. स्वत: अशोक पाटोळे आणि अजित केळकर या नाटकात काम करायचे. या नाटकाची जाहिरात आली आणि महिला संघटनांनी त्यावर आक्षेप घेत वाद निर्माण केला. हे नाटक फक्त पुरुषांसाठी आहे अशी जाहिरात केल्यामुळे महिला संघटनांचा स्वाभीमान दुखावला आणि हे नाटक बायकांनी का पाहायचे नाही यासाठी त्या रस्त्यावर उतरल्या, न्यायालयात गेल्या, वृत्तवाहिन्यांवर त्याची चर्चा झाली. नाटकाला त्यामुळे अमाप प्रसिद्धी मिळाली. हे नाटक म्हणजे म्हातारपणाकडे झुकणाºया प्रौढ माणसातील चावटपणा जागृत असतो. त्यांना चावट बोलायला आवडते. पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा म्हणतात तसे त्यांचे हिरवे मन चावटपणासाठी आसुसलेले असे. अशाच एका सायंकाळी दारू पिण्यासाठी कंपनी म्हणून एकाला आमंत्रित केले जाते. यातून दोन तास फक्त पांचट विनोद हे दोघे एकमेकांना सांगत राहतात. हे विनोद इतके पांचट आणि भयानक होते की, महिलांनी ऐकणे योग्य नव्हते. किंबहुना आजूबाजूच्या प्रेक्षकांसमोर महिलांना ते विनोद ऐकताना अत्यंत संकोच वाटेल इतके ते भयानक पांचट विनोद होते. त्यामुळे हे नाटक फक्त पुरुषांसाठी म्हणून त्याची जाहिरात केली. महिलांनी केलेल्या या नाटकाविरोधातील आंदोलनामुळे न्यायालयाने हे नाटक महिलांनीही पाहावे असा आदेश आल्याने ते सर्वांसाठी खुले झाले. तरीही नाटकात कोणताही बदल न करता, नि:संकोचपणे पाटोळे आणि अजित केळकर यांनी या नाटकाचे प्रयोग सुरू ठेवले. महिलाही पांचट विनोदाचा आस्वाद घेत हम भी कुछ कम नहीं असे दाखवू लागल्या. तर काही महिलांनी कपाळ बडवत नाट्यगृहातून बाहेर पडल्या. पण या नाटकातील विनोद इतके पांचट आणि भयानक होते की, अक्षरश: हसून हसून पोट दुखणे, कंबर मोडणे आणि छप्पर फाडके हसणे म्हणजे काय हे या नाटकात अनुभवायला मिळत होते. अशोक पाटोळे यांच्या निधनानंतर हे नाटक बंद झाले. पण प्रेक्षकांचा चोरी चोरी छुपके छुपके निखळ करमणुकीसाठी आलेला हा प्रतिसाद अफलातून होता.

अशोक पाटोळे यांचे वेगळे गाजलेले नाटक म्हणजे, तांदूळ निवडता निवडता हे नाटक. व्यावसायिक यशाबरोबरच या नाटकाला स्पर्धांमधून प्रचंड प्रतिसाद मिळाला. राज्य नाट्य स्पर्धेतील बहुसंख्य केंद्रांवर हे नाटक झाले. कामगार कल्याण केंद्र, एसटीच्या विभागीय नाट्य स्पर्धा, एमएसईबीच्या नाट्य स्पर्धामध्ये या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. स्पर्धेसाठी लागणाºया नाटकाची नेमकी मूल्य या नाटकात होती.
१९९०च्या दशकात पाटोळे यांचे आलेले आणखी एक नाटक म्हणजे, दांडेकरांचा सल्ला. विजय चव्हाण यांना मोरूची मावशी व्यतिरिक्त श्रीमंद दामोदर पंत या नाटकातून पाहण्याची चांगली संधी जशी प्रेक्षकांना मिळाली होती, तशीच दांडेकरांचा सल्ला यातून विनोदी भूमिकेत अशोक पाटोळे यांच्या नाटकातून वाव मिळाला होता. एक चावट संध्याकाळची बीजे या दांडेकरांच्या सल्ल्यातच कुठेतरी लपलेली दिसत होती.

याशिवाय त्यांच्या गाजलेल्या नाटकांमध्ये दुर्गाबाई जरा जपून, देखणी बायको दुस‍ºयाची, बे दुणे पाच, राम तुझी सीतामाऊली, श्यामची मम्मी, सातव्या मुलीची सातवी गोष्ट या नाटकांचा समावेश करावा लागेल.
पण आपल्या सहज आणि सोप्या लेखणीतून अशोक पाटोळे यांनी मराठी रंगभूमीला दोन दशके सातत्याने नवनवीन नाटके दिली आणि रंजन केले हे नक्की.

– प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा
9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …