मध्यंतरी एक चित्रफित पाहण्यात आली. ज्यात नळावरचे भांडण टिपले गेले होते. ‘कचाकचा भांडणे’ या वाक्प्रचाराचा प्रत्ययच त्या चित्रफितीतून येत होता. ती चित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल होत असताना, सोबत मजेदार मथळा दिला होता. ‘लुप्त होत चाललेली कला.’ काही प्रमाणात खरेच आहे ते. ती चित्रफित पाहिली आणि जुने दिवस आठवले. त्याचबरोबर मुख्यत्वे आठवला तो ताडदेवच्या नवी जायफळवाडीतील ‘झरा’.
तसे नवी जायफळवाडीत नैसर्गिक पाण्याच्या झºयांचे प्रमाण जास्तच होते. ठिकठिकाणी नैसर्गिक पाण्याचे झरे उपलब्ध असल्यामुळे सुरुवातीला पाण्याची वानवा नव्हती. मलबार हिलवर असलेला जलाशय हाच खरेतर येथल्या झºयांचे उगमस्थान मानता येईल. सुरुवातीच्या काळात झºयाची जागा बंदिस्त नव्हती. झºयाच्या जागी झाडाची पाने लावून त्या धारेतून येणारे पाणी भांड्यांमध्ये जमा केले जात असे. कालांतराने वस्ती वाढू लागल्यावर ती जागा टाकी बांधून बंदिस्त केली गेली. ठिकठिकाणी पाण्याच्या अशा टाक्या बांधून येथील रहिवाशांनी आपली पाण्याची व्यवस्था केली होती. जायफळवाडीत अशा जवळपास पाच-सहा टाक्या होत्या.
सुरुवातीला लोकसंख्या कमी असल्यामुळे या झºयांवर गर्दी नसे. पाणीही मुबलक होते, परंतु जसजशी येथील लोकसंख्या वाढू लागली, तसतशी ती व्यवस्था अपुरी पडू लागली. सकाळपासून रात्रीपर्यंत झºयावर गर्दी दिसू लागली. मग झºयावरची भांडणे वाढू लागली. अगदी त्या चित्रफितीतील भांडणासारखी भांडणे होत असत. एकमेकांच्या कुळाचा सर्रास उद्धार करण्यातही मागेपुढे पाहिले जात नसे. झºयावर दिवसभर असलेली गर्दी टाळण्यासाठीच आईचा दिवस भल्या पहाटे सुरू व्हायचा. गर्दी व्हायच्या अगोदरच तिचे धुणेपाणी झालेले असायचे. त्यामुळे परत झºयावर जाणे होत नसे, परंतु सर्वांनाच तसे जमायचे नाही. साहजिकच नंतर झºयावरची गर्दी आणि भांडणे ही ठरलेलीच. मग भांडणे टाळण्यासाठी काही अलिखित नियम महिला करत असत. ज्यात एका नंबरात अमुकअमुक भांडीच भरायची, असा एक नियम होता. ती भरून झाली की परत नंबर लावून दुसºयांदा पाणी भरायचे, परंतु त्यावरूनही भांडणे होत. त्याला निमित्त ठरे ते भांड्यांचे आकार. दोन हंडे आणि दोन कळशा भरायच्या असे ठरले तरी काहींची भांडी आकाराने मोठी असत. साहजिकच नियमानुसार तीच भांडी भरली जात. मग ज्यांची भांडी आकाराने लहान असत त्यांच्याकडून हरकत घेतली जाई आणि वादाला तोंड फुटे. मग परत दुसरा नियम बनविला जाई, जो एखादा नवीन वाद होईपर्यंत टिके. काहींची झºयावरील भांडणात मास्टरी होती! त्यांच्यापुढे इतरांचा निभाव लागत नसे.
नंतर मात्र महापालिकेच्या पाण्याची नळ योजना आली. सुरुवातीला वरच्या भागात पाणी चढत नसल्यामुळे टेकडीच्या पायथ्याशीच नळ योजना आली. नंतर उशिरा टेकडीच्या वरील भागांतही नळ योजना आली आणि झºयावरची भांडणे कमी झाली आणि नळावरची वाढली! पण ही भांडणेही फक्त तेवढ्यापुरतीच असत. ती कायमस्वरूपी नसत. कारण सुखदु:खाच्या प्रसंगी एक होणाºया जायफळवाडीकरांच्या दृष्टीने झºयावरची भांडणे झºयावरच संपत.
नवी जायफळवाडीचे नूतनीकरण होऊन टॉवरमध्ये स्थलांतर झाल्यावर घरोघरी असणाºया नळामुळे झºयाशी असणारा संबंध संपला, परंतु पाणी सोडण्याच्या अनियमित वेळा आणि प्रसंगी अपुरे पाणी यामुळे रहिवाशांना जुन्या झºयाची आठवण हटकून येत असणार हे नक्की.
दीपक गुंडये/९९८७१९७२०५\