२१ नोव्हेंबर हा ‘जागतिक दूरचित्रवाणी दिन’. तसेही वर्षभरात विविध ‘डे’ साजरे होत असतात. तसाच हा ही एक दिन. सतराशे साठ वाहिन्यांत वावरणाºया आजच्या पिढीला पूर्वीच्या काळी ‘दूरदर्शन’ ही एकमेव वाहिनी दर्शकांसाठी उपलब्ध होती आणि तीही दिवसातून ठराविक काळासाठीच हे ऐकले तर नवल वाटले, परंतु हे खरे आहे. संध्याकाळी दूरदर्शनचे कार्यक्रम सुरू होण्याअगोदर दूरदर्शन संचावर असलेल्या मुंग्या पाहणे नशिबी असे. कार्यक्रमाची वेळ होताच ती प्रसिद्ध धून चालू होऊन धुरकट वर्तुळातून दूरदर्शनचे बोधचिन्ह आकारास येत असे आणि नंतर कार्यक्रम सुरू होत असत. सुरुवातीला चढ्या किमतींमुळे मोजक्याच लोकांकडे दूरदर्शनवरचे कार्यक्रम पाहायला धावपळ करावी लागे. त्यातही एक गंमत असे. ज्या घरात दूरदर्शन संच असे त्या घरात संचासमोरची जागा पकडण्यात घरातील व्यक्तींपेक्षा इतरांचीच चढाओढ असे.
कार्यक्रमाचे प्रक्षेपण व्यवस्थित होण्यासाठी असलेला अँटेना योग्य जागी बसवला तरी नंतर परत त्याची हलवाहलव करावीच लागे. त्यावेळचा संवाद (अँटेना ठीक करणारा व घरातील इतर सदस्य यांच्यातील) फारच मनोरंजक असे. महत्प्रयासाने मेहनत फळाला आल्यानंतर कार्यक्रम व्यवस्थित दिसू लागत. पण तेवढ्यातच दूरदर्शनची प्रसिद्ध माशी शिंकत असे आणि ‘व्यत्यय’ नावाची पाटी दिमाखात झळकत असे. परंतु असे असतानाही दूरदर्शनवर छान कार्यक्रम पाहायला मिळाले ज्याची सर काही अपवाद वगळता आजच्या सतराशे साठ वाहिन्यांवरील कार्यक्रमांना येत नाही. ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ , ‘शब्दांच्या पलीकडले’, ‘गजरा’ हे काही उदाहरणादाखल कार्यक्रम. आठवड्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगणारा ‘साप्ताहिकी’ तर आवर्जून पाहिला जात असे. शनिवारचा मराठी चित्रपट तर रविवारचा हिंदी चित्रपट यांची उत्सुकतेने वाट पाहिली जायची. हल्ली तर २४ तास चित्रपटांचा मारा सुरू असतो. त्यामुळे त्यातील नाविन्य संपले आहे.
‘रामायण’, ‘महाभारत’ या मालिकांच्या प्रसारणाच्या वेळेत तर रस्ते ओस पडत. दूरदर्शन संचाची पूजा केली जात असे. पण या साप्ताहिक मालिका होत्या. आता तर मालिकांचा रतीबच घातलेला दिसतो. चोवीस तास त्यांचे दळण चालू असते. दूरदर्शनच्या बातम्या पाहणारा एक वर्ग अजूनही आहे. कारण त्यांची विश्वासार्हता. हल्लीच्या ‘सबसे तेज’ जमान्यात वृत्तवाहिन्यांवरील बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचताना मूळ रूप सोडून कोणते स्वरूप धारण करेल हे महाभारतातल्या संजयला सुद्धा कळणार
नाही.
पूर्वी निवडणूक झाल्यानंतर मतमोजणीला दोन तीन दिवस लागत असत. त्यावेळी निकालांच्या बातम्यांसाठी दूरदर्शनवर अवलंबून राहावे लागे. त्या काळात मग सलग चित्रपट दाखवले जात व मधल्या वेळेत निवडणुकांचे निकाल व त्यावर चर्चा रंगत असत. क्रिकेटचे सामने तर पूर्ण जल्लोषात पाहिले जात. जागतिक दूरचित्रवाणी दिनाचे निमित्त झाले आणि जुन्या टिव्ही संचासह दूरदर्शनचा पडदा डोळ्यांसमोर तरळला.
दीपक गुंडये/ ९९८७१९४२०५\\