दहशतवादाचे अस्त्र


दहशतवाद ही संपूर्ण जगाची समस्या आहे. आज कोणतीही मागणी ही दहशतीच्या जोरावर मान्य करता येते, असा जो संदेश जात आहे, तो मोडून काढणे गरजेचे आहे. गेल्या दोन दिवसांपासून आपल्याकडे देवस्थानांना दहशतीच्या सावटीखाली ठेवण्याचे प्रयत्न चालले आहेत. शनिवारी परळी वैद्यनाथचे, तर रविवारी अंबाजोगाईचे मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी दहशतवाद्यांनी दिली. ही हिंमत येते कुठून?

प्रत्येक ठिकाणी दहशत माजवूनच कामे करायची, असा जो संदेश जात आहे ते चुकीचे आहे. प्रवाशांना वेठीस धरून, बसवर दगडफेक करून दहशत माजवून आपल्या मागण्या सरकारला मान्य करायला लावणारी श्रमशक्ती हा त्याचाच नमुना आहे, तर दहशतीच्या जोरावर देशात घातपाताची कृत्ये करू, अशा धमक्या देऊन बहुमताने मंजूर झालेले कायदे सरकारला मागे घ्यायला लावणारे विघातक अशेतकरी आंदोलक हे पण त्यातलेच म्हणावे लागेल, पण एकूणच दहशतवादाचे जगासमोरील आव्हान दिवसेंदिवस कठीण होत आहे.
गेली अनेक दशके भारताला या दहशतवादाने चांगलेच झोडपले होते. त्या घटनांकडे पाश्चिमात्य, युरोपियन देश हे अत्यंत तटस्थपणे बघत होते. भारतात घडणारा दहशतवाद हा पाकिस्तानमुळे होतो आहे हे जगाला ओरडून सांगण्याचा प्रयत्न भारताने केला, पण बाह्य शक्तींबरोबरच अंतर्गत दहशतवाद जो तयार होताना दिसतो आहे, तो तितकाच घातक आहे. याला कारण सत्ताधारी आणि विरोधक हे लोकशाहीचे महत्त्वाचे खांब आहोत, आधारस्तंभ आहेत याचा पडलेला विसर. आज सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांना शत्रू मानत आहेत हे दुर्दैव आहे. त्यामुळेच सरकारने काही चांगले काम केले की, विरोधकांनी ते हाणून पाडण्यासाठी अशा असुरी शक्तींचा वापर करायचे तंत्र अवलंबले. काँग्रेस आणि त्यांच्या कंपूतील पक्षांनी शेतकरी आंदोलनात ठोकलेल्या बैठका हा त्याच अंतर्गत दहशतवादाला प्रोत्साहन देणा‍ºया आहेत, तर एसटी कर्मचा‍ºयांच्या संपात उतरून राज्यातील भाजपच्या आयात नेत्यांकडून त्याचेच अनुकरण केले.

पण कोणताही दहशतवाद मोडून काढायचा असेल, तर त्यासाठी एकजूट लागते. पाक पुरस्कृत दहशतवाद भारतला सहन करायला लागला, तेव्हा परदु:ख शीतलम्च्या न्यायाने अमेरिकेसह त्यांची मित्र राष्ट्रे फ्रान्स, इटली हे गप्प बसले. भारत पाकिस्तानातील तणावाचे संबंध राहणे हे त्यांच्या अर्थव्यवस्थेला पोषक राहिले.
परंतु त्याच दहशतवादाचा प्रत्यय जेव्हा काही वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये आला. अर्थात फ्रान्सने लगेच त्याचे सडेतोड उत्तर दिले. वीस वर्षांपूर्वी ९/११या घटनेने अमेरिकेला दणका दिल्यानंतर अमेरिकेने एका ओसामा बिन लादेनसाठी संपूर्ण अफगाणिस्तान उद्ध्वस्त केले. लादेनचा खातमा करेपर्यंत अमेरिकेने प्रयत्न केले आणि त्याचा सूड उगवला. दहशतवादाला असे सडेतोड उत्तर देण्याचे धाडस लागते. तसे सडेतोड उत्तर द्यावे लागते हे भारताने अजूनही ओळखले नाही. ओळखले असले, तरी इच्छाशक्ती नाही. त्यामुळे कोणताही दहशतवादी हल्ला झाला की, आमच्या देशात अंतर्गत वादच उफाळून येत असतात. धर्माच्या नावावरून राजकारण करतात. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, वगैरे छापिल कमेंट पास करून आपले मतप्रदर्शन करतात किंवा या दहशतवादी हल्ल्याला हिंदू, मुस्लीम असा रंग देण्याचा प्रकार करून डावे आणि तथाकथीत पुरोगामी स्वत:ला शहाणे समजतात, पण दहशतवाद हा विषारी डंख मारणाºया सापासारखा असतो. तो ठेचायचा असतो, हे मात्र हे लोक करत नाहीत. अमेरिकेने लादेनचा सूड घेतला, पण आम्ही अजूनही दाऊद कोठे आहे हे माहीत असूनही अंतर्गत राजकारणाने त्यावर फालतू चर्चा करत बसतो. दाऊदला पकडल्याने विशिष्ठ समाज, अल्पसंख्याक दुखावले जातील हा समज या डाव्या आणि तथाकथीत पुरोगामी लोकांनी करून दिला. छोटा राजनला पकडल्यानंतर त्याच्यावरून कशाप्रकारे राजकारण घडते आहे?, याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर त्याचे उदात्तीकरण करणारी प्रवृत्ती या देशात उफाळून आली होती. याकूबच्या अंत्यसंस्काराला जमलेली गर्दी नेमके काय सांगत होती? ही असली धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम डाव्या विचारांनी आणि पुरस्कार परत करणाºया सुमार लोकांनी केले आहे. अफझल गुरूचे समर्थनही जेएनयूत होते आणि संसदेवर हल्ला करणा‍ºया आणि फासावर गेलेल्या दहशतवाद्याला हुतात्मा ठरवण्याचे काम केले जाते, तेव्हा काँग्रेस त्याचे समर्थन करते, अशा नेत्यांना आपल्या पक्षात पायघड्या घालून बोलावते, तेव्हा या दहशतवादावर उत्तर मिळणार कसे?

टिव्हीवरील फालतू चर्चासत्रांमधून अमूक एक धर्माच्या संघटनेने तमूक एक कृत्य केले, असे पसरवून संपूर्ण धर्माला, विशिष्ठ समाजाला वेठीस धरण्याचा प्रकार काही प्रवृत्तींनी चालवला. हे या देशाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.
गेल्या दोन वर्षांत आयसिसने आपले पाय जगभर पसरवले आहेत. या आयसिसचा भारतालाही धोका आहे. त्याच आयसिसने फ्रान्समध्ये हल्ले चढवल्यावर कशाप्रकारे हालचाली झाल्या आहेत ते आपण पाहिले पाहिजे.

आयसिसच्या दहशतवाद्यांनी पॅरिसवर आत्मघाती हल्ले केले. सात ठिकाणी झालेल्या स्फोटांत सव्वाशेहून अधिक जण बळी पडले. शेकडो जखमी झाले. मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी या घटनेने पुन्हा जागल्या आहेत. पॅरिस व मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात साम्य असल्याचेही बोलले जात आहे. सीरियातील हल्ल्यात फ्रान्सने सहभाग घेतल्याबद्दल हा बदला असल्याचा दावा आयसिसने केला आहे. मात्र या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार फ्रान्सने केला. असा निर्धार आम्हाला कधी जमला नाही. कारण अशा प्रवृत्तींना धडा शिकवला तर विशिष्ठ समाज दुखावला जाईल, अशी भीती निर्माण केली गेली. एकीकडे दहशतवादाला धर्म नसतो म्हणायचे आणि एका विशिष्ठ समाजाला व्होट बँक म्हणून कवटाळायचे. ही व्होट बँक दहशतवादाचे समर्थन करणारी असली, तरी गप्प बसायचे. असली घाणेरडी प्रवृत्ती या देशात निर्माण करण्याचे काम राजकीय पक्षांनी केले आहे.
पॅरिसमधील हल्ल्यानंतर मुंबईप्रमाणेच संकटकाळी डगमगून न जाता तेथील नागरिकांनी दाखवलेले सामाजिक भान कौतुकास्पद आहे. जखमींना रक्ताची गरज भासेल याची जाणीव ठेवून हजारो तरुणांनी रक्तदानासाठी रुग्णालयांत रांगा लावल्या होत्या. मेट्रोसेवा बंद झाल्यावर टॅक्सीचालकांनीसुद्धा प्रवाशांना मोफत सेवा पुरवली. जगात सर्वत्र शांततेचा पुरस्कार केला जात आहे. तसे प्रयत्नही सुरू आहेत, मात्र त्या प्रयत्नांना सुरुंग लावण्याचे काम दहशतवादी शक्ती करत आहेत. आता एकटा भारत, अमेरिका वा फ्रान्सपुरता हा धोका मर्यादित राहिलेला नाही. संपूर्ण जगासमोरच दहशतवादाचा भस्मासूर आ-वासून उभा आहे. मानवतेला तो आव्हान देत आहे. माणुसकीला काळिमा फासणाºया घटना वाढत आहेत. मानवतेच्या शत्रूंची संख्या आणि त्यांची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे हे नाकारता येणार नाही. देशातील सुरक्षायंत्रणा सावध असल्या, तरी समाजविघातक शक्तींचे विध्वंसक इरादे भुईसपाट करण्यासाठी त्या पुरेशा नाहीत. दहशतवादाचे घोंघावणारे भूत वेळीच गाडण्याची गरज भासत आहे. विविध देशांमध्ये मतभेद असू शकतात. मात्र दहशतवादाविरुद्ध दोन हात करण्यासाठी आपसातील मतभेद विसरून जगातील सर्व देशांनी एकजूट दाखवली पाहिजे, परंतु भारतासारख्या देशात पक्षीय मतभेद विसरून देशहितासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.

– प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …