दशावतारी

दशावतार हा महाराष्ट्रातील लोकनाट्याचा एक प्रकार आहे. कोकण व गोमंतक येथे सुगीनंतर देवोत्सवात वा चातुर्मास्यात जत्राप्रसंगी दशावतारी खेळ करण्याची पूर्वापार प्रथा आहे. विशेषत: देवगड, वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण आणि गोवा या भागांत दशावतारी नाटके लोकप्रिय आहेत.

दशावतारी नाटकाची पूर्वपीठिका फार प्राचीन असून, ती अगदी सातव्या शतकापर्यंत मागे नेता येते. समर्थ रामदासांच्या दासबोधातही दशावतारी खेळांचा उल्लेख सापडतो. सामान्यपणे दशावतारी नाटकाचे मूळ कर्नाटकात असून, तेथून ते महाराष्ट्रात आले, असे म्हटले जाते.

इसवी सन १७२८ मध्ये श्यामाजी नाईक काळे यांनी हे दशावतारी खेळ कर्नाटकातून आडिवºयास आणले व तेथून पुढे त्यांचा प्रसार उत्तर कोकणात झाला, असा उल्लेख आडिवºयाची महाकाली या आपल्या पुस्तकात चिं. कृ. दीक्षित यांनी केला आहे. थोडक्यात दशावतारी नाटकाची परंपरा महाराष्ट्रामध्ये अठराव्या शतकापासूनच धरली जाते.

दशावतारी नाटके मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध व कलंकी (कल्की) या दहा अवतारांवर आधारित असतात. तथापि, ही सर्वच पात्रे प्रत्यक्ष सभामंडपात (रंगमंचावर) मात्र येत नाहीत, त्यातील काही प्रत्यक्ष रंगमंचावर येतात, तर काहींचा केवळ उल्लेखच केला जातो. दशावतारी खेळांचे परंपरागत स्वरूप आहे.

या नाटकांची सुरुवात मध्यरात्रीला होऊन ते सकाळपर्यंत चालते. सर्वप्रथम सूत्रधार रंगभूमीवर येऊन विघ्नहर्त्या गणपतीला आवाहन करणारे धृवपद म्हणतो. ते संपण्याच्या सुमारास ऋद्धीसिद्धीसहित गणपती रंगमंचावर येतो. त्याच्या मागोमाग सरस्वती येते. गणपतीचे आवाहन संपले की, सूत्रधार सरस्वतीची स्तुती करतो. सरस्वती त्याला आशीर्वाद देते. यानंतर प्रत्यक्ष खेळाला सुरुवात होते. त्यावेळी सूत्रधार व गणपती-सरस्वती रंगमंचाच्या कोपºयात निघून जातात.

प्रत्यक्ष खेळामध्ये प्रथम मत्स्यावतार आख्यानातील शंखासुरा (संकासुरा) चा प्रसंग दाखवितात. संकासूर व विष्णू यांचे रंगमंचावर आगमन होऊन त्यांचा संवाद होतो. संकासुराचे भाषण बरेच विनोदी असते. तो अंगविक्षेपही करतो. शेवटी संकासुराचे विष्णूकडून पारिपत्य होते व तेथे मत्स्यावतार संपतो. यानंतर कूर्म आणि वराह या अवतारांची फक्त सोंगेच दाखवितात. नंतरच्या नरसिंहावतारापासून मात्र खेळाला रंग भरतो. यात हिरण्यकशिपू, कयाधू, प्रल्हाद, भालदार व नरसिंह अशी पाच पात्रे असतात. या कथेतील बरेच प्रसंग दाखविण्यात येतात. यानंतरचा अवतार वामन असून, यात फक्त वामन व बळी ही दोनच पात्रे दाखविण्यात येतात. नंतर परशुरामाचा नुसता उल्लेख करून राम व कृष्ण या दोन अवतारांतील मात्र बरेच कथाभाग दाखविले जातात. हे सर्व कथाभाग अतिशय नाट्यपूर्ण व मनोरंजक असतात. त्यातही राधा हे प्रेक्षकांचे आवडते पात्र असल्यामुळे नाटकात तिचे स्थान अनिवार्य असते. यानंतरचे अवतार बुद्ध व कलंकी हे मात्र दाखविले जात नाहीत.

अठराव्या शतकात श्यामजी नाईक काळे यांनी दशावतारी खेळ दाखविणारा एक फड स्थापन केला होता. तो घेऊन ते महाराष्ट्रभर फिरत. तळकोकणातील दशावतारी खेळांचे स्वरूप थोडे निराळे आहे. या प्रकारात नाटक सुरू होण्यापूर्वी पडद्यामागे धुमाळ म्हणजे गायन होई. नंतर मंगलाचरण व त्यानंतर गणपती-सरस्वतीचा प्रवेश असा क्रम असे. पुढे वरयाचना व वरदान या प्रकारांनंतर ब्रह्मदेवाचा प्रवेश, संकासुराचे वेदचौर्य व विष्णूकडून त्याचे पारिपत्य हे कथाभाग होई. यानंतर मात्र पुढचे सर्व कथाप्रसंग गाळून एकदम गोपी-कृष्णाच्या लीला दाखविण्यात येत. येथे पूर्वरंग संपून उत्तररंगाला प्रारंभ होई. त्यात एखाद्या पौराणिक कथेचे आख्यान असे. सूत्रधार आपल्या पद्यांतून कथानकाचा विकासक्रम दाखवी, तर पात्रे आपापली भाषणे स्वयंस्फूर्तीने म्हणतात. देव-दानव आणि राजे-राक्षस यांच्या युद्धांची दृश्ये रंगमंचावर दाखविण्यात येत. राक्षसाच्या प्रवेशाच्या वेळी राळ उडविण्यात येई व ते आरडाओरडा करीत आणि तलवारीच्या फेका फेकत रंगमंचावर प्रवेश करीत. देव-दानवांच्या युद्धप्रसंगी मृदंग व झांजा वगैरे वाद्यांचा एकच गजर चाले. अखेरीस राक्षसांचा पराभव होई. खेळाच्या शेवटी हंडी फोडून दहीकाला वाटत व नंतर आरती होऊन खेळाचा शेवट होत असे.

दशावतारी नाटकातील पात्रांचा अभिनय, रंग-वेशभूषा तसेच सजावट हे प्रकारही परंपरागत स्वरूपांचे असतात. नाटकातील बहुतेक भाग पद्यमय असून, ती पद्ये सूत्रधार म्हणत असे, तर संवाद थोडे असून पात्रे ते स्वयंस्फूर्तीने म्हणत. साथीला मृदंग व झांजा असून, त्यांच्या तालासुरावर पात्रांची नृत्ये चालत, तसेच त्यांचे अंगविक्षेपही पद्यातील आशयानुसारच होत असत. रंगभूमी फळ्यांची केलेली असून, ती १ ते २ फूट उंच असते. सजावटीसाठी रंगमंचाच्या मागील बाजूस पांढºया धोतराचा वा रुमालाचा पडदा असे. संपूर्ण खेळ याच एका पडद्यावर चाले. रंगमंचाच्या उजव्या बाजूस सूत्रधार व वादक बसत, तर डाव्या बाजूने पात्रांची ये-जा होई. देवांची पात्रे लाकडी मुखवटे वापरीत. त्यातही गणपती, राक्षस व पूतना यांना मुखवटे असत आणि ते दरवर्षी काल्याच्या अगोदर लाखी रंगांनी रंगवून घेत. सरस्वतीला मात्र मुखवटा नसे. ती आपल्या पायांमध्ये लाकडी मोर धरी. तिच्या डाव्या हातात त्याची मान व उजव्या हातात हातरुमाल असे व ती वाद्यांच्या तालावर नृत्य करी. देव व राजे यांच्या अंगावर किरीटकुंडलादी अलंकार असून, ती पात्रे सौम्य व आकर्षक असतात. तर राक्षस व दैत्य यांची वेशभूषा भडक स्वरूपाची असे. डोक्यावरील केस सोडलेले, मिशा मोठ्या, चेहरे अक्राळविक्राळ, डोळ्याखाली लाल रंग लावलेला व कमरेला चुण्यांचा घागरा घातलेला, अंगावर कुडता व त्यावर बटणाच्या जागी लहान लहान भिंगांची ओळ आणि पायांत चाळ बांधलेले असत. संकासुराचे पात्र मात्र प्रेक्षकांच्या दृष्टीने मोठेच आकर्षण असे. त्याचे सबंध अंग काळ्या कपड्याने झाकलेले, जीभ बाहेर काढलेली व डोळ्यांच्या ठिकाणी दोन भोके ठेवलेली असत.

देव-दानवांचे युद्ध म्हणजे दशावतारी नाटकातील प्रमुख आकर्षण. राक्षसाच्या प्रवेशाच्या वेळी राळेचा भपकारा उडवीत व त्याचे सैन्य समोरच्या बाजूने प्रेक्षकांच्या गर्दीतून येई. दशावतारी नाटके ही ठराविक प्रसंग, ठराविक भाषा, ठराविक अभिनय, ठराविक आशय यातच गुंतून पडलेली लोकनाट्ये होत. विष्णूदास भाव्यांनी या दशावतारी नाट्यतंत्राचे मूलगामी संस्करण करून आपली पौराणिक नाटके सादर केली. त्या दृष्टीने पाहता मराठी नाटकाची पूर्वपीठिका दशावतारी नाटकांपर्यंत जाऊन भिडते.

– प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा

9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …