आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६५ वा महापरिनिर्वाण दिन. तेव्हा बाबासाहेबांचे लाखो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देश-विदेशातून दादरच्या चैत्यभूमीवर येत असतात. मागील २० महिने देशात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात आहे. आता ओमिक्रॉनचा धोका संभवत असल्यामुळे जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने आदेश काढले आहेत. त्यामुळे बाबासाहेबांच्या अनुयायांना चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी कोरोना विषाणूच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल. आज जरी अनुयायांना कोरोना विषाणू बरोबर संघर्ष करावा लागत असला, तरी आंबेडकरी अनुयायांची शिस्त बघायची असेल, तर आपल्याला चैत्यभूमीवर यावे लागेल. मागील वर्षीही बाबासाहेबांच्या अनुयायांनी कोरोना व्हायरसच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केलेले होते, मात्र इतर सणासुदीला कोरोनाचे नियम शिथील केले जातात, याची खंत आंबेडकरी अनुयांना वाटत असते. तेव्हा नियमांची नि:पक्षपातीपणे योग्य कारवाई शासन स्तरावर झाली पाहिजे. आजही राजगृहावरून आलेल्या आदेशाचे किंवा शासकीय नियमावलीचे पालन आंबेडकरी जनता करीत असतात. महत्त्वाची बाब म्हणजे, २ डिसेंबर, २०१६ रोजी महाराष्ट्र शासनाने दादरच्या चैत्यभूमीला अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळाला ‘अ’ वर्ग पर्यटन व तीर्थ स्थळाचा दर्जा दिला आहे. हे विसरून चालणार नाही.
आधुनिक भारताचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, ‘शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा आणि समाजाचे विश्वासू नेते बनावे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा पायाभूत विचार करताना ज्यांना शिक्षणाचे महत्त्व कळत नाही. त्यांच्यासाठी सक्तीचा कायदा असावा असे म्हटले. शिवाय शिक्षण सरसकट सर्वांसाठी मोफत न करता जे फी देऊ शकतात त्यांच्याकडून ती घ्यावी, म्हणजे सक्तीच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यास मदत होईल. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये सर्व धर्म आणि विविध जातीच्या मुला-मुलींमध्ये रुजवणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मूळ शैक्षणिक दृष्टिकोन होता.
शाळा ही एक पवित्र संस्था आहे जिथे विद्यार्थ्यांचे मन सुसंस्कृत होते. शाळांमधील नियमित कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने केले पाहिजे. शाळा म्हणजे चांगले नागरिक घडवण्याचा कारखाना. या कुशल संस्थेत कच्च्या मालाचे चांगल्या दर्जाच्या उत्पादनात रूपांतर करतात असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दलित शोषित समाजासाठी उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ या शैक्षणिक संस्थेची स्थापना ८ जुलै, १९४५ रोजी सुरूकरून त्यांनी आदर्श शैक्षणिक संस्था सुरू केली. प्रत्येक शैक्षणिक संस्था ही समाज परिवर्तनाची संस्था असली पाहिजे. तसेच समाजासाठी शिक्षणाला प्राधान्य दिले जावे आणि त्याचा उपयोग चारित्र्य संपन्न व्यक्तींच्या वाढीसाठी केला जावा, असे ठाम मत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केवळ देशातील नागरिकांमध्ये जागरूकता आणि मानवी हक्कांची पूर्तता करता नाही, तर देशात मानवी सन्मान आणि न्यायदेखील शिकवते अशा प्रकारचे शिक्षण हवे होते. त्यांच्या मते शिक्षणामुळेच लोकांचे डोळे उघडू शकतात. अत्याचारितांना लढण्यासाठी आणि त्यांच्यावर युगानुयुगे होत असलेला अन्याय व शोषण दूर करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. तेव्हा शिक्षणाचा अभाव हे गरीब लोकांच्या मागासलेपणाचे प्रमुख कारण असल्याचे बाबासाहेबांनी ओळखले. बाबासाहेबांनी मानवतावादी शिक्षणाला प्राधान्य दिले जे मनुष्याला शाळा अथवा राज्याचे विद्यार्थी होण्याऐवजी स्वत:ला पुन्हा शोधण्यास आणि स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यास सक्षम करते. शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे माणसाने समाजात आणि जीवनशैलीत मोठे सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. कारण समाज परिवर्तनाचा मार्ग शिक्षणातून होत असतो.
शिक्षण आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. चांगले जीवन जगण्यासाठी आपण सुशिक्षित असले पाहिजे. शिक्षण हे असे आहे की, जे एखाद्या व्यक्तीला चांगले जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करते. तेव्हा आपल्या नजीकच्या भविष्यात काहीतरी विधायक घडवून आणणारे शिक्षण आहे. वैयक्तिक वाढीच्या यशात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची असते. जितके तुमच्याकडे ज्ञान असेल तितकी तुमची वाढ होईल.
शिक्षण ही अशी गोष्ट आहे की, जी प्रत्येकाच्या आवाक्यात आणली पाहिजे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मूलभूत शैक्षणिक विचार होता. डॉ. बाबासाहेबांचा उदारमतवादी शिक्षणावर विश्वास होता. सुशिक्षित असणे आणि व्यावसायिक पदवी मिळवणे तुम्हाला प्रतिष्ठित संस्था अथवा विविध कंपन्यामध्ये भाग घेण्यास तयार करते. ज्या व्यक्तीने चांगले शिक्षण घेतलेले असेल तो चांगला नागरिक बनतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाबाबत खूप व्यापक आणि आदर्श आहेत. ज्ञान म्हणजे प्रकाश. हा प्रकाश माणसाच्या सामाजिक, आर्थिक आणि नैतिक विकासाचा आधार बनला पाहिजे. ज्ञानाचा संदर्भ सामाजिक असला पाहिजे आणि शिक्षण हे हत्यार आहे, ज्याच्या सहाय्याने माणूस शोषणमुक्त होऊन गुलामगिरीविरुद्ध क्रांती घडवू शकतो. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, बुद्धी तलवारी सारखी आहे. प्रत्येक समाज किंवा समूह ती धारण करणारा माणूस ओळखतो. हुशारी आणि बुद्धीला चांगले चारित्र्य आणि सभ्यता हवी. याशिवाय लोक सुशिक्षित झाले, तर राष्ट्र आणि समाज नष्ट होईल. शिक्षण हेच माणसाला घडवते. ज्ञान आणि बुद्धीचा अनोखा संगम म्हणजे शिक्षण. ज्ञानाद्वारे स्वावलंबन साध्य करणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. यातून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक दृष्टिकोन सहज लक्षात येतो. तेव्हा आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी प्रत्येक आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांचा शैक्षणिक दृष्टिकोन लक्षात घेऊन आपल्या मुलांना उच्च विभूषित करुया असे आपण बाबासाहेबांच्या आजच्या महापरिनिर्वाण दिनी वचनबद्ध होऊया.
रवींद्र तांबे/महापरिनिर्वाण दिन विशेष