नावात काय आहे, असे शेक्सपिअरने जरी लिहून ठेवले असले, तरी नावातच सर्व काही आहे, याची प्रचिती आपल्याला पदोपदी येत असते. सजीव, निर्जीव यांच्या नावामुळेच वर्गीकरण करता येते, त्यांना ओळख मिळते. यात नेहमीच्या नावाबरोबरच काहींना टोपणनावेही असतात. जुन्या काळात आपली ओळख पटू नये, म्हणून टोपणनावाने लेखन केले जात असे. काहींना प्रेमाने टोपणनावे ठेवली जातात, तर काहींना उपहासाने टोपणनावे ठेवली जातात. प्रेमाने ठेवलेल्या टोपणनावाबद्दल त्या व्यक्तीला माहिती असते आणि त्याबाबत आक्षेप असत नाही. बहुतेक व्यक्तींच्या बाबतीत खºया नावाऐवजी टोपणनावच रुढ झालेले असते, तर उपहासाने ठेवलेली टोपणनावे मात्र खºया व्यक्तीला माहिती नसतात. कारण ती त्या व्यक्तीच्या नकळत घेतली जातात.
टोपणनावे कोणालाही ठेवली जातात. शाळकरी मित्र, खेळगडी, बालपणीचे मित्र-मैत्रिणी यांना ती ठेवली जातातच, पण शिक्षकांनाही ठेवली जातात. महाविद्यालयीन जीवनातही मित्र-मैत्रिणीबरोबरच प्राध्यापकांनीही टोपणनावे ठेवली जातात. रोजच्या जीवनात नातेवाईक, शेजारी हेही यातून सुटत नाहीत, तर कार्यालयात मुख्यत्वे बॉसला विविध टोपणनावे ठेवली जातात. सहकाºयांनाही ती ठेवली जातात. थोडक्यात काय तर वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्या संपर्कात येणाºया व्यक्तींना आपण टोपणनावे ठेवतोच ठेवतो.
उपहासाने ठेवलेली टोपणनावे बहुतेकवेळा शारीरिक वैशिष्ट्यावरून किंवा स्वभावावरून ठरतात. त्या व्यक्तीच्या अनुपस्थितीत तिचा उल्लेख टोपणनावानेच होतो. त्याच्याविषयी चाललेल्या चर्चेत, गप्पात खºया नावाऐवजी टोपणनावच येते. हे सर्व त्या व्यक्तीच्या पाठीमागे चालले असते, तेव्हा ठिक असते. परंतु एखाद्या क्षणी ती व्यक्ती उपस्थित असताना अनपेक्षितपणे एखाद्याच्या तोंडून उपहासात्मक टोपणनाव बाहेर पडते. त्यावेळी मात्र फजिती होऊ शकते. एका कार्यालयीन सहकाºयाची आद्याक्षरे ए. के. होती. तो सहकारी बोलायला लागला की, धडाधडा बोलत असे. त्यावरून त्याचे टोपणनाव एके-४७ पडले होते. त्याच्याविषयी बोलताना त्याचा उल्लेख सर्रास एके-४७ असाच होत असे. एकदा असेच सर्वजण गप्पा मारत असताना तो सहकारीही हजर होता. त्यावेळी एक सहकारी नकळत किंवा सवयीमुळे म्हणाला एके-४७ बोलून गेला. याविषयी संबंधित व्यक्तीला काहीच कल्पना नसल्यामुळे दुसºया सहकाºयाने लगेचच विषयांतर केले व संभाव्य फजिती टाळली, मात्र नंतर तो प्रसंग आठवून येणारे हसू टाळता येत नसे. आणखी एका सहकाºयाचा उल्लेख त्याच्या तोंडाच्या ठेवणीवरून हनुमान असा केला जात असे. त्याच्या बाबतीतही असाच प्रकार घडला होता. दोन्ही प्रसंगात त्या व्यक्ती टोपणनावाविषयी अनभिज्ञ असल्यामुळे ते प्रसंग निभावले गेले होते. असे प्रसंग अधूनमधून घडत असतात. त्यामुळे उपहासात्मक टोपणनावांचा उल्लेख जपूनच करावा. न पेक्षा तो टाळलेलाच बरा!
– दीपक गुंडये\