झी मराठी कात टाकतोय

गेल्या सहा महिन्यांत टीआरपी आणि लोकप्रियतेत अगदी लयाला गेलेल्या झी मराठीने मागच्या महिन्यापासून कात टाकायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. काही चांगले कार्यक्रम आणत आपल्या रटाळ मालिकांना संपवण्याची तयारी केलेली दिसत आहे. त्यामुळे डिसेंबर महिना हा झी मराठीला समाधानकारक ठरत आहे. नव्याने आलेले हे कार्यक्रम नवीन वर्षात पदार्पण करताना झी मराठीला तारतील, असे समजायला हरकत नाही.
येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेने वीट आणल्यानंतर, मालविकाला तुरुंगात टाकल्यानंतरही तिची कारस्थाने संपत नाहीत, या प्रकारांना प्रेक्षक कंटाळला होता. चला हवा येऊ द्या या मालिकेतील विनोदांचे हसू येणे बंद झाल्यामुळे मालिकेचेच हसे झाले होते. त्यामुळे स्वप्नील जोशीला फक्त हसण्यासाठी तिथे बसवले होते. अशामुळे आदेश भाऊजींपासून ते रात्री ११ वाजता सुरू होणाºया रात्रीस खेळ चाले या मालिकांमध्ये एकसंध अशी वाहिनी पाहणे अशक्य होते. प्रेक्षकांच्या हातात रिमोट असल्यामुळे ते आपोआप अन्य वाहिन्यांकडे वळू लागले. त्यामुळे या वाहिनीचा टीआरपी घसरला.

परंतु डिसेंबर महिन्यात किचन कल्लाकार, हे तर काहीच नाही, देवमाणूस २ हे नवे कार्यक्रम आणल्याने या वाहिनीत आता सुधारणा होईल, असा विश्वास प्रेक्षकांना वाटू लागला आहे. ती परत आलीय ही मालिका संपवली आणि देवमाणूसच पुनरागमन झाले. डॉक्टरच्या श्राद्ध दिवसापासून सुरू होणाºया या मालिकेत मुख्य आकर्षण टोन्या आणि सरू आजी आहे. त्यात आता एक सरपंचाचे पात्र वाढवले आहे. बाकी डिंपली, मंगल, बाबू, नाम्या आणि बजा आहेतच. सरू आजीच्या शिव्या आणि म्हणी ऐकायला प्रेक्षक उत्सुक झालेला आहे. त्यामुळे ती परत आलीला फारसा प्रतिसाद मिळाला नसला, तरी देवमाणूसला मात्र रविवारच्या एक तासाच्या विशेष भागापासून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. राजस्थानी वेशात नवीन जोडीदारीणबरोबर घेऊन आलेला अजितकुमार देव हा थोडा भ्रमिष्टासारखा असल्यासारखा वागत आहे. त्याच्यातील नवा अवतार मध्येच राजस्थानी अडाणी माणूस आणि मध्येच अजितकुमार देवची भाषा, स्मृती जागृत झाल्यासारख्या खुणा पटवण्याची प्रवृत्ती यातून रंजकता निर्माण करण्याचा प्रयत्न पहिल्या दोन दिवसांत केल्याचे दिसते. रात्रीस खेळ चाले १ पेक्षा २ आणि २ पेक्षा ३ अधिकाधिक रंगतदार ठरल्या. त्याप्रमाणेच सर्व शंका निरसन करत देवमाणूस २ हे पर्वही रंजक असेल, रहस्यमय असेल अशी अपेक्षा प्रेक्षकांना वाटू लागली आहे. १४ आॅगस्टला देवमाणूस १ चा विशेष २ तासांच्या भागाने शेवट केला आणि तो थोडा असंबद्ध वाटला. नेमका प्रकार काय झाला हे अजून कोणाला कळले नव्हते. त्याचा उलगडा आता देवमाणूस २ मधून होईल हे निश्चित. पण या पहिल्याच भागात सगळे बदललेले वातावरण दाखवले आहे. डॉक्टर गेल्यानंतर झालेली मंगल बाबूची दुरावस्था, पैशांची चणचण दाखवली आहे. पण पहिला सिझन संपवताना डिंपल घरातून डॉक्टरचे सगळे पैसे, दागदागिने घेऊन पळून जाते, असे दाखवले होते. ती परत कधी आली, कशी आली हे न समजणारे आहे. तिच्या बोलण्यात मोठी हिरॉइन झाल्यासारखे बोलते आहे, पण जवळ आई-बापाला खायला घालायलाही पैसे नाहीत, म्हणून मंगलला चोरी करण्याची वेळ येते. बाबू तर २४ तास दारूच्या नशेतच आहे. सगळ्यांना २० रुपये मागत फिरतो आहे, असे दाखवले आहे. दरम्यानच्या काळात गावात डॉक्टरचा पुतळा उभारला आहे, पण आता येत्या काही भागांत हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न जलद गतीने केला जाईल हे नक्की, नटवर बनून आलेला डॉक्टर अजितकुमार देव, सगळे पुरावे नष्ट करणार का आणि कसे ते येत्या काही भागात पहायला मिळेल.
रात्रीस खेळ चालेचा तर काही प्रश्नच नाही. रात्री ११ ची मालिका असूनही तिला चांगला प्रेक्षकवर्ग लाभलेला आहे. या मालिकेने दाखवून दिले आहे की, चांगले कथानक आणि दर्जेदार सादरीकरण असेल, तर प्राइम टाइम वगैरे काही महत्त्वाचे नसते. कोणत्याही वेळी प्रेक्षक तिथे जमतात. गावात आलेला दशातराचा कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने सगळे नाइट कुटुंब ते पहायला जाणे, त्या दशावताराच्या कार्यक्रमातून सयाजी आणि कावेरी समोरासमोर येणे, दोघांनी पळून जाणे हे जबरदस्त आहे.

किचन कल्लाकार हा प्रशांत दामले आणि संकर्षण कºहाडे यांचा नव्याने आलेला कार्यक्रमही प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो आहे. सोनाली कुलकर्णी, आकाश ठोसर आणि नागराज मंजुळे यांना खाद्यपदार्थ बनवायला लावले. प्रशांत दामले यांनी नागराजला थालीपीठ, आकाशला कोथिंबीर वडी, तर सोनालीला मिसळ बनवायला सांगितली. त्यादरम्यान होणाºया गमती जमतीत सोनालीने एक वाक्य शिक्षा म्हणून नवरसात म्हणून दाखवले हे लाजवाब होते.
नव्यानेच सुरू झालेल्या हे तर काहीच नाही या मालिकेत या आठवड्यात आलेले आनंद इंगळे, हेमांगी कवी, रावराणे यांनी सादर केलेले किस्से झकास होते. विशेषत: आनंद इंगळे यांनी पुणेरी स्वभावावर केलेले भाष्य मस्त होते. हेमांगी कवीकडून मात्र जेवढी अपेक्षा होती तितके दर्जेदार किस्से मिळाले नाहीत, पण हा कार्यक्रमही प्रेक्षकांना आवडताना दिसतो आहे. त्यामुळे ९ ते ११.३० हा झी मराठीचा कार्यक्रमांचा वेळ दर्जेदार होताना दिसत आहे. त्यातली थोडी ‘हवा’ कमी केली, तर आणखी दोन दिवस मजा येईल, पण एकूणच झी मराठीचा हरवलेला प्रेक्षकवर्ग परत मिळवण्यासाठी कात टाकण्याचा चाललेला प्रयत्न महत्त्वाचा आहे.

प्रफुल्ल फडके/ छोटा पडदा
9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …