झी टीव्हीच्या पुरस्कारांचे भावी मानकरी

म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा, अशी आपल्याकडे म्हण आहे. त्याप्रमाणे चांगले दर्जेदार कार्यक्रम नसल्याने टीआरपी घसरलेल्या झी मराठी या वाहिनीला कोणताही ठोस कार्यक्रम नसलेले राजकीय नेते हाच आधार झालेला दिसतो. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून झी मराठीच्या किचन कल्लाकार कार्यक्रमात कलाकारांऐवजी करमणूकप्रधान राजकीय नेत्यांना आमंत्रित केले जात आहे. वाहिनीवरील लोकप्रिय अभिनेते अन्य वाहिन्यांकडे वळाल्याने आता राजकीय नेत्यांचाच आधार या वाहिनीला आहे का, असा प्रश्न पडतो. त्यामुळे येत्या वर्षात झी गौरव, उत्सव नात्यांचा या कार्यक्रमात होणाºया नामांकनामध्ये राजकीय नेत्यांना हा मान मिळणार का, असा प्रश्न पडतो.

गेल्या दीड दोन महिन्यांपासून राजकीय नेते, प्रवक्ते आणि चर्चेतील राजकीय व्यक्तींना आपल्या कार्यक्रमात आणण्याचा चंग झी मराठी वाहिनीने बांधला. याची सुरुवात हे तर काहीच नाही या अल्पकाळ चाललेल्या मालिकेपासून सुरू झाला. त्यात भाजप नेते प्रवक्ते केशव उपाध्ये यांना बोलावले आणि त्यांनी हे तर काहीच नाही, असे म्हटल्यावर झी मराठीला आयला करमणूक तर राजकारणातच आहे, याची जाणीव झाली. त्यानंतर प्रशांत दामले आणि संकर्ष कºहाडे चालवत असलेल्या किचन कल्लाकार या मालिकेत आता राजकीय नेत्यांचा वावर सुरू झाला आहे.

किचन कल्लाकार या कार्यक्रमाची सुरुवात होण्यापूर्वी जी जाहिरात केली गेली होती, त्यामध्ये नामांकीत कलाकार इथे येऊन आपली रेसीपी वापरणार, एखादा पदार्थ करून दाखवणार असे दाखवले होते. त्याप्रमाणे सुरुवातीला अप्सरा सोनाली कुलकर्णी, नागराज मंजुळे, आकाश ठोसर, अनंत जोग, चिन्मय मांडलेकर, स्वप्नील जोशी, अभिज्ञा भावे असे अनेक कलाकार येऊन गेले. विविध चित्रपट, मालिकांच्या प्रमोशनसाठी या मालिकेचा वापर होऊ लागला. प्रमोशनसाठी गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेल्या चला हवा येऊ द्या या मालिकेतील हवा गेल्याने आता या मालिकेचा वापर होताना दिसला. तरी प्रेक्षकांनी या किचन कल्लाकारला प्रतिसाद दिला; पण यातील तोच तो पणा आणि पोरकट विनोदांमुळे प्रेक्षक कंटाळू लागले. त्यामुळे टीआरपी सुधारण्यासाठी आणि मनोरंजनासाठी अभिनेते कमी पडले, म्हणून की काय आता मसालेदार मनोरंजनासाठी राजकीय नेते बोलावले जाऊ लागले. गेल्या महिनाभरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेचे सदस्य भाजप नेते प्रसाद लाड, मनसेचे नेते नितीन सरदेसाई हे नेते आले. सतत चर्चेत राहणारे सकाळ झाली पत्रकार परिषदेतून भ्रष्टाचाराचे आरोप करणारे नेते किरीट सोमय्या, ईडीचा ससेमिरा लागलेले एकनाथ खडसे हे पण येऊन गेले. त्या अगोदर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आमंत्रित केले होते. त्या आधी पावशेर तुपासोबत ३५ पुरणपोळ्या खातील, असे वक्तव्य करणाºया अमृता फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती.

हे सगळे पाहता राजकारणात करमणूक जास्त आहे आणि ती कॅश करण्यासाठी झी मराठीने नेत्यांना आमंत्रित करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात होणाºया उत्सव नात्यांचा किंवा त्यानंतर होणाºया झी गौरव पुरस्कार सोहळ्यात आता राजकीय नेत्यांचे नामांकन होणार का, हे आता पाहावे लागेल. या व्यासपीठावर आल्यावर नाना पटोले, प्रसाद लाड आणि नितीन सरदेसाई यांनी शिवसेनेची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी आमदारांना फ्लॅट देण्याची घोषणा केल्यामुळे त्यावर बरीच सर्वबाजूनी टीका झाली होती. किचन कल्लाकारमध्ये विजेत्याला ट्रिपल डोअर फ्रीज मिळणार असे सांगितल्यावर नितीन सरदेसाई यांनी आता आमदारांना फ्लॅट मिळाला, तर या फ्रिजला जागा होईल, अशी टिप्पणी केली. तर नाना पटोले यांनी आम्हाला नको फ्लॅट तो गोरगरीबांना मिळावा, अशी टिप्पणी करून आपल्याच सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर बोट ठेवले; पण यातून राजकीय नेत्यांनी चांगली करमणूक केल्याने त्यांना सेलिब्रेटीचा दर्जा देऊन आगामी पुरस्कारांसाठी नामांकित केले जाईल का, अशी शंका प्रेक्षकांच्या मनात आली, तर आश्चर्य वाटायला नको.

या आठवड्यात नाना पटोले, प्रसाद लाड आणि नितीन सरदेसाई यांचा सहभाग असलेल्या किचन कल्लाकारने चांगली करमणूक केली. एरवी जे चिडून परस्परांवर टीका करत असतात, ते हे परस्पर विरोधी नेते हसत खेळत एकमेकांवर टीका आणि कुरघोडी करताना दिसत होते. यात बनवाबनवी या थीमवर तिखट शंकरपाळे, कडबोळी, शेव हे पदार्थ या तिघांना करायला लावून राजकीय कडबोळी, भाजणी आणि शंकरपाळी यावर टिप्पणी करताना आपापल्या पक्षांचाही मोठेपणा सांगितला. त्यातून चांगले पंच निघाले आणि करमणूकही चांगली झाली. त्यामुळे भविष्यात झी मराठीला अभिनेते मिळाले नाहीत, तर राजकीय नेते टीआरपी मिळवून देतील, असा विश्वास निर्माण केला. यामध्ये नितीन सरदेसाई यांनी बाजी मारल्याचेही दिसून आले.

प्रफुल्ल फडके/छोटा पडदा

9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

मनाला निर्बंध :  अग्रलेख

  कोरोना गेला, आपण कोव्हिडमुक्त झालो, सगळे निर्बंध उठले, या भ्रमात सगळे जण अत्यंत गाफीलपणे …