ठळक बातम्या

जुन्नर तालुक्यात पर्यटनाला वाव

जुन्नर तालुका इसवी सन पूर्व काळात जीर्णनगर या नावाने सातवाहन राज्यात प्रमुख बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होता. विविध वैशिष्ट्यपूर्ण, समृद्ध आणि निसर्गाचे वरदान लाभलेला हा भाग आहे. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी, ३५० लेण्यांचा एकमेव तालुका, पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, नैसर्गिक आणि महादुर्बीणसारख्या वैज्ञानिक वैशिष्ट्यांनी नटलेल्या जुन्नर तालुक्याला विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. राज्यातील पहिला पर्यटन क्षेत्र तालुका म्हणून जुन्नर असल्याने हा तालुका राज्याचा मॉडेल तालुका आहे.
पर्यटनासाठी या तालुक्यात काय काय पाहता येते ते आपण पाहू. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरीसह भैरवगड, नारायणगड, हडसर, निमगिरी आदींसह सात किल्ले आहेत. सर्वाधिक ३५० लेण्या येथे आहेत. लेण्याद्रीला सातवाहन काळातील लेणीसमूह, मानमोडी डोंगरात जैन देवी-देवतांच्या गुहा आहेत. भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अष्टविनायकांपैकी गिरिजात्मक-लेण्याद्री, विघ्नेश्वर-ओझर ही दोन मंदिरे आहेत. हेमाडपंती बांधणीतील तीन कोरिव मंदिरे, जुन्नरचे प्राचीन जैन मंदिर पाहण्यासारखे आहे.

नाणेघाट-घाटघर, दर्याघाट, आणेघाट- आणे आदी निसर्गरम्य घाट आणि प्रसिद्ध धबधबेदेखील या ठिकाणी आहेत. खोडद येथे जगातील सर्वात मोठी रेडिओ इलेक्ट्रॉनिक दुर्बीण व आर्वी येथे दळणवळण उपग्रह भूकेंद्र आहे. गिर्यारोहकांना आव्हान देणारे दोन ते तीन हजार फूट खोल कोकणकडे, माणिकडोह येथील कुकडी नदीतील रांजण खाचखळगे आहे.
आजच्या आॅनलाइन काळातही ३५० वर्ष परंपरेचा इतिहास असलेला आठवडे बाजार सोमवारी बेल्हे गावत पाहावयास मिळतो. खरेदी-विक्रीसाठी हजारो व्यापारी आणि ग्राहक येथे यात्रेच्या स्वरूपात पाहावयास मिळतात. या दिवशी शाळेस सुट्टी असते. येथे सोमवारऐवजी रविवारी शाळा भरते. येथील सर्वात प्रसिद्ध मानला जातो तो बैल बाजार. या बाजारात प्रत्येक सोमवारी दोन ते अडीच हजार बैलांचा खरेदी, विक्रीचा एकाच दिवशी व्यापार चालतो असे म्हणतात. पर्यटकांची भूक भागविण्यासाठी जुन्नरची मासवडी, लसूण चटणी, मटण/चिकन भाकरी, मटकी भेळ, राजुरीचा पेढा अतिशय प्रसिद्ध आहे.

तमाशा पंढरी म्हणून ओळखले जाणारे नारायणगाव. अनेक लोककलाकारांचा जन्म जुन्नर तालुक्यात रसिकांच्या गोडीतून झाला व पाहता पाहता देशात तमाशाची पंढरी म्हणून नारायणगाव शहराला मान मिळाला. येथे अनेक तमाशा कलाकार स्वकलाकृतीद्वारे समाजासमोर आले आणि ते राष्ट्रपती पारितोषिक विजेते ठरले. विठाबाई नारायण गावकर, दत्तोबा तांबे, दत्ता महाडिक, मंगला बनसोडे, तुकाराम खेडकर, पांडुरंग मुळे हे यापैकी आहेत. इतिहास हा शब्द न उच्चारताच जगाला तालुक्याची ओळख करून देतो असा हा जुन्नर तालुका.
जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची हीच ती पदस्पर्श पावन भूमी की ज्यांनी जगात इतिहास घडविला. त्या भूमीचा निसर्ग कसा असेल, त्याचे वर्णन व रूप कसे असेल हे शब्दांत सांगणेच कठीण आहे. यासाठी जुन्नरमध्ये जाऊन पर्यटन केलेच पाहिजे. येथील पर्यटनाला गती येण्यासाठी प्रस्तावित असलेले कल्याण-नगर व नाशिक-पुणे या रेल्वे मार्गांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. जुन्नर तालुक्यात सह्याद्रीच्या रांगामुळे पाऊस मुबलक प्रमाणात पडतो. हे पाणी अडवण्यासाठी परिसरात अनेक धरणे आहेत. परिणामी हा तालुका बारमाही पाण्याने समृद्ध आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेती ही बारमाही बागायती आहे. जवळ जवळ या भागांतील बहुतेक शेतकरी हे सधन असून, त्यापैकी बहुसंख्य हे पुणे, मुंबईला फुले, फळे व भाज्या यांचे घाऊक व्यापारी आहेत.

े बाळासाहेब हांडे े/ ९५९४४४५२२२

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …