चिंतेची बाब

कोरोनाचा कहर संपून वेगाने प्रगती करण्याच्या काळात आपले दोन शेजारी देश आजारी आहेत. हे भारताच्या दृष्टीने त्रासदायक आहे. एक आपल्या पायाशी आहे, तर दुसरा डोक्याशी आहे. त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्रास, ताण आपल्याला सोसावा लागणार आहेच. श्रीलंका आणि पाकिस्तानातील जी वाईट अवस्था आहे, त्याचा भार शेजारी म्हणून आपल्याला उचलावा लागत आहे, ही चिंतेची बाब आहे.

या दोन देशांमुळे भारतावर अनेक अंगांनी ताण येणार आहे. खाली दक्षिणेत श्रीलंकेत स्थिर सरकार असूनही जवळपास बेबंदशाही चालली आहे. श्रीलंकेची जनता त्यांच्या अध्यक्षांनी चीनकडे देशाला गहाण टाकल्यामुळे अस्वस्थ आहे. कर्जबाजार झालेल्या देशात जनता अन्नाला मोताद झालेली आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानात सर्वशक्तिमान लष्कर आणि आयएसआय यांनी इम्रान खान यांच्या सरकारला दिलेले खांदे काढून घेण्याचे ठरविलेले आहे. पाकिस्तानात पुढच्या आठ-दहा दिवसांत काय होईल, हे काहीही सांगता येत नाही. आता इम्रान खान यांचा निर्णय चुकीचा ठरवत सर्वोच्च न्यायालयाने विश्वासदर्शक ठराव घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर इथले अराजक फार भयाण असेल.

पाकिस्तानातील नेहमीची परंपरा असलेल्या प्रथेला न पाळता गेल्या काही वर्षांत लष्कराने प्रत्यक्ष सत्ता ताब्यात घेण्याऐवजी संसदीय लोकशाहीचे सोंग चालू ठेवून, सगळी सूत्र आपल्या हातात ठेवण्याचे कसब साधले आहे. त्यामुळे लष्करप्रमुखाने देशाचे नेतृत्व करण्याऐवजी रिमोट कंट्रोलची भूमिका घेतल्याचे दिसते आहे. याचे कारण असे केल्याने जगाचा रोष पत्करावा लागत नाही; त्यामुळे लष्करशहा कदाचित थेट सिंहासनावर बसणारही नाही. तेथे याच नॅशनल असेंब्लीमधून नवे सरकार करायचे की, इम्रान खान यांनी घोषणा केल्याप्रमाणे नव्या निवडणुका घ्यायच्या हे आज ठरेल. पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांना दिलेला दणका फार मोठा आहे.

सध्या इम्रान खान संघर्षाच्या भूमिकेत दिसतात. त्यांनी लष्कराविरुद्ध पुकारलेला लढा कितपत लढता येईल, हा मोठा प्रश्न आहे. इम्रान यांनी आता हंगामी पंतप्रधान म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश गुलझार अहमद यांचे नाव पुढे केले आहे. इम्रान खान यांना गुलझार अहमद यांच्या निगराणीखाली नव्या निवडणुका हव्या आहेत. अर्थात, ते आता तेथील सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडले हा भाग वेगळा. पाकिस्तानचे सर्वोच्च न्यायालय अनेकदा लष्कराला अनुकूल निकाल देते. पण काही तत्ववादी न्यायालये अजून तिथे शाबूत आहेत. अशा न्यायमूर्तींनी याआधी पाकिस्तानी लष्कर व सत्ताधाºयांना जबर तडाखे दिले आहेत. पाकिस्तानात इतक्या वर्षांमध्ये कोणत्याही संसदीय, घटनात्मक आणि न्यायालयीन परंपरा घट्ट मुळे रुजवू शकलेल्या नाहीत. त्यामुळेच, तेथे आज अध्यक्ष, पंतप्रधान, नॅशनल असेंब्लीचे सभापती आणि न्यायालय यांच्यात जो पत्रव्यवहार किंवा विचार विनिमय चालू आहे, त्याला काहीही अर्थ नाही. तो अर्थ एक लष्करशहा क्षणात शून्यवत करू शकतो. अर्थात त्यांचे तिकडे काहीही होवो, पण त्याचे पडसाद आणि त्रास भारताला सोसावे लागतात.

खरे म्हणजे पाकिस्तानातील अस्थैर्य भारताला नेहमीच कटकटीचे ठरते. त्यांच्या अस्थिरतेचा परिणाम केवळ काश्मीरवर नव्हे, तर एकंदरीतच भारताच्या स्थैर्यावर झाल्याशिवाय राहणार नाही, तर दुसरीकडे श्रीलंकेतील स्थिती क्षणाक्षणाला हाताबाहेर जाते आहे. तेथेही अध्यक्ष म्हणून बसलेले गोताबाया राजपक्षे हे एकेकाळचे लष्करशहाच आहेत. त्यांना तमिळी वाघांचे निर्दालन केल्याचा अनुभव आहे; त्यामुळे सध्या त्यांनी संचारबंदी लागू केली आहे. आणीबाणी लावली काय आणि तितक्याच घाईघाईने ती मागेही घेतली काय. पण महाग झालेले अन्नपाणी, जीवनावश्यक वस्तूंसाठी जनता रस्त्यावर उतरून राजपक्षेंना दोष देत आहे. त्यामुळे त्यांनी जर तिथे काही चुकीचे पाऊल उचलले, तर फार मोठा हाहाकार होईल. खरंतर श्रीलंकेतील लोकशाहीची वाटचाल बरीच निकोप चालू होती; मात्र राजपक्षे कुटुंबाने देशातील सगळी सत्तास्थाने आपल्या ताब्यात घेतली आणि मनमानी कारभाराने देशाला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे केले. आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला पुन्हा उभे करणे, हे सोपे आव्हान नाही. त्यातच चीनला भारतीय उपखंडातील प्रत्येक देशाला कायमचे अंकित करून भारताला शह द्यायचा आहे. चीनने हा खेळ नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, भूतान या सर्वच देशांमध्ये चालविला आहे. आता श्रीलंकेचा बळी घेण्याचे काम चालू आहे.

या साºया पार्श्वभूमीवर कोरोनोत्तर युगात भारतासमोर केवळ संरक्षणविषयक नव्हे, तर आर्थिक आव्हानेही उभी ठाकणार आहेत. श्रीलंकेला मदत केली नाही, नेपाळला चुचकारले नाही, भूतानला सांभाळले नाही आणि बांगलादेशाशी सख्य राखले नाही, तर भारताच्या चारही बाजूंनी संघर्षशील शेजाºयांचा वेढा निर्माण होईल. मागच्या आठवड्यात चाळीस हजार कोटींची मोठी मदत भारताने श्रीलंकेला पाठवली आहे. धान्याची रसदही पुरवली आहे. पण आपण तरी किती हा भार सोसायचा यालाही काही मर्यादा आहेत. शेजारी आजारी आहे, पण त्यामुळे आपल्याला आजारपण येणार नाही याचाही विचार केला पाहिजे. शेजारधर्म पाळताना आपले किती नुकसान करायचे आणि त्याचा आपल्याला फायदा काही आहे का याचाही विचार करावा लागेल. पायाशी आणी डोक्याशी असलेली ही दुखणी त्रासदायकच आहेत.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …