घरोघरी मातीच्या चुली!

मुंबईसारख्या आधुनिक शहरात एकेकाळी महिन्याच्या सामानाच्या यादीत कोळशाचं पोतंही असे, हे नवीन पिढीला ऐकून खरं वाटणार नाही; पण तसं ते होतं. बहुतेक घरांमध्ये कोळशाचं पोतं येत असे आणि कोळसा ओला होऊ नये, म्हणून घराच्या कोपºयात, गॅलरीत, जुन्या पिंपात किंवा लाकडी हडप्यात साठवले जायचे. कारण, घरोघरी मातीच्या चुली किंवा इतर प्रकारच्या चुलीसाठी जळण म्हणून कोळसा हवा असायचा. कांडी किंवा बदामी कोळसा ‘कोळसा डेपोमध्ये’ वजनावर विकत मिळत असे. अशी कोळशाची दुकानं वस्तीत हमखास असायची. कारण, कोळसा त्या काळातील घरोघरची गरजेची वस्तू होती.
आज स्वयंपाक घरात गेल्यावर, गॅसच्या शेगडीचं बटन फिरवून, लायटर दाबायची खोटी आणि बिन आवाजाची, बिन धुराची, बिन राखेची, जेवढा हवा तितकाच निळ्या रंगातील विस्तव देणारी गॅसची शेगडी, स्वयंपाकासाठी हजर. पण त्या आधी त्याजागी रॉकेलचा स्टोव्ह आणि त्याच्याही पूर्वी, स्वयंपाक करण्यासाठी वर म्हटल्याप्रमाणे कोळशाची शेगडी वापरली जात होती. अगदी मुंबईत सुद्धा.
घरात जमिनीवर तयार केलेल्या स्वयंपाकाच्या ओट्यावर, भिंती लगत नवीन वर्ष दोन वर्षांनी माती थापून शेगडी घातली जायची. दोन तीन टोपल्या लाल माती आणून ती चाळून बारीक पावडर सारखी माती ही शेगडी करिता उपयोगात आणत. साधारण दोन फूट लांब, फुट दीड फूट रूंद आणि फूट सव्वा फूट उंच अशी चौकोनी शेगडी. मऊ मुलायम लाल मातीच्या लगद्यापासून थापली जायची. ती थापताना त्याचे दोन भाग असे तयार करायचे की, मूळ शेगडी पेटलेली असताना, तिच्या आगीची ईनडायरेक्ट झळ बाजूला चुलीवरच्या भांड्याच्या बुडाला मिळत राहील. त्यासाठी शेगडी थापताना, त्याची रचना शेगडीच्या एका कप्प्याला किंवा भागाला समोरून सहा-आठ इंच आणि सहा-साडेसहा इंच रूंद असे उघडे दार ठेवायचे. जेथून कोळसे जळून गेल्यावर खाली चुलीत पडणारी राख नंतर सहजपणे काढता येईल. आतून मूळ पेटत्या शेगडीपासून विस्तव बाजूच्या भागात पोहचण्यासाठी लहान पोकळी ठेवायची. चुलीच्या वरच्या दोन गोलाकार ज्यावर भांडे ठेवायचे आहे, अशा मोकळ्या जागा तयार करताना त्यामध्ये लोखंडाच्या लहान पेन्सिल आकाराच्या चार-पाच सळ्या बसवून घ्यायच्या. त्यावर कोळसे ठेवून ते पेटवता येतील. भांडे न डळमळता नीट बसेल, अशा तºहेने त्या मोकळ्या जागेवर बाजूला तीन-चार लहान-लहान उंचवटे करायला हवेतच.
मग दोन-चार दिवस ती चांगली सुकू द्यायची. अशी शेगडी थापून तयार झाली की, घरची लक्ष्मी ती लाल गेरूने छान रंगवायची आणि शेगडीला हळद-कुंकू वाहून तिची पूजा करून तिचं आपलं नातं जुळवून घेत असे. घरातल्यांची आणि आले-गेल्या पै पाहुण्यांची रसना तृप्त करण्यासाठी आता गृहलक्ष्मीची जीवाभावाची स्वयंपाकघरातील सखी स्वत:च्या मुखी विस्तव घेण्यासाठी यापुढे सिद्ध झालेली असायची.
स्वयंपाकघर म्हटलं की, चुलीतला धूर आणि काजळी येणारच त्यात काय नवल! हे सत्य सर्वांनी त्याकाळी मनोमन स्वीकारलेलं असायचं.
गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात, त्यामुळे मग अशी कायम एका जागी असणाºया शेगडीपेक्षा सहज दुसºया ठिकाणी नेता येईल अशी, पत्राच्या बादलीतली शेगडी बाजारात मिळू लागली. शिवाय लहान गोल आकाराच्या लोखंडी कोळशाच्या शेगड्या बाजारात उपलब्ध झाल्या.
कोळशाची शेगडी वापरायची म्हटलं की, कोळसे उचलायला लांब चिमटा, कोळसे फुलवायला, फुकणी नामक लहान पाईपचा तुकडा किंवा वारा घालण्यासाठी पत्र्याचा नाही, तर पुठ्ठ्याचा तुकडा आणि कोळसा जाळून उरलेली राख भरायचा पत्रा ही सर्व तयारी आजूबाजूला हवीच. तीही असायचीच.
त्याकाळी, प्रत्येक वस्तूचा पुरेपूर उपयोग करून घेणे ही आदर्श अशी संस्कृती असल्यामुळे, शेगडीतील कोळशाची राख आणि नारळाच्या करवंटीवरच्या उपसून काढलेल्या किशा (चिवट दोरे) भांडी घासायला उपयोगी पडायच्या.
चुलीवरच्या स्वयंपाकाची चव आणि म्हणी पुरत्याच आता मातीच्या चुली आठवणीत उरल्यात.
– मोहन गद्रे/कांदि‘वल्ली’\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …