बांगलादेशमधील हिंसाचाराच्या घटनेची सुरुवात दुर्गा पूजा मंडपात तोडफोड आणि धर्मग्रंथ ठेवल्याच्या घटनेनंतर झाली होती. बांगलादेशातील घटनेच्या निषेधार्थ त्रिपुरात विविध ठिकाणी मोर्चे काढले. या मोर्चांना हिंसक वळण लागले आणि घरांची, दुकानांची तोडफोड करण्यात आली, असे आरोप झाले. परिणामी खºया खोट्या सोशल मीडियावरील मेसेज, फोटो अन् व्हिडीओमुळे बांगलादेश, त्रिपुरा आणि महाराष्ट्रात दंगलीची वात पेटली. दुसºया राज्यातील घटनेवर महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटण्याचे कारण नाही, परंतु स्वातंत्र्याच्या आधीपासून असे घडत आले आहे. जगात कुठे काही घडले, तर त्याची प्रतिक्रिया देशात उमटते. त्रिपुरामध्ये काय घडले माहीत नाही, परंतु तिथल्या घटनेचे महाराष्ट्रात पडसाद उमटण्याचे कारण नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वत:चे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु हे मत मांडत असताना त्याचा दुसºयाला त्रास होईल, असा अधिकार मात्र नक्कीच कोणाला दिलेला नाही. आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण सनदशीर मार्गाने आणि शांततेने ते केले पाहिजे.
आज आपल्याला काय दिसत आहे, त्रिपुरात मुस्लीम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराविरोधात काढलेल्या रॅलीला हिंसक वळण लागले. राज्यात मालेगाव, नांदेड, अमरावती येथे मुस्लीम समाजाने काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. नांदेडमध्ये दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाल्याची शक्यता आहे. त्रिपुरा येथे अल्पसंख्याकांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी वाहने आणि दुकानांवर दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा सौम्य वापर केला. महाराष्ट्रात अशा प्रकारचा उद्रेक होता कामा नये. तुम्ही इथली शांतता भंग करणार असाल, तर महाराष्ट्र सरकारने त्यावर तातडीने कारवाई करावी. अशा प्रकारचा जातीय तणाव निर्माण होणार असेल, तर ते महाराष्ट्रासाठी योग्य राहणार नाही. मग अशा प्रवृत्ती त्रिपुरात घटना घडते म्हणून येथे दादागिरी करणार असेल, तर महाराष्ट्रात चालणार नाही आणि ते कोणी खपवून घेणार नाही. सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा हे प्रकरण हाताबाहेर जाईल. असा इशारा विरोधी पक्षातर्फे देण्यात आला. या घटनेचा निषेध म्हणून १३ नोव्हेंबर, २०२१ रोजी भाजपच्या वतीने अमरावती बंद पुकारण्यात आला. या बंदलाही हिंसक वळण लागले. भाजप कार्यकर्त्यांनी शहरात मोठ्या प्रमाणात तोडफोड केली असून, शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नमुना परिसर तसेच अंबापेठ परिसरात अनेक दुकाने फोडण्यात आली. एका हॉस्पिटलवर देखील दगडफेक करण्यात आली आहे. असा दावा सत्ताधारी पक्षातर्फे करण्यात आला, तसेच मुस्लीम समाज आक्रमक झाला असे वक्तव्य करणे योग्य नाही. कुणी चिथावणी देत असेल, तर कारवाई केली जाईल. संपूर्ण राज्यात शांतता आहे. घटना फक्त अमरावतीमध्ये घडत आहे. तेथील परिस्थिती नियंत्रणात येईल, असे गृहमंत्री नामदार दिलीप वळसे-पाटील यांनी नमूद केले. त्रिपुरा राज्यातील घटनेचा आधार घेऊन खरेतर कोणीही एकमेकांच्या विरोधात कुरघोडी करण्यासाठी वापर करावा, हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी देशाला अभिमानास्पद नाही.
े बाळासाहेब हांडे/ ९५९४४४५२२२\\