गोंदणे (टॅटू)

युवकांमध्ये शरीराच्या दृश्य भागावर कुठे तरी गोंदून घेण्याची फॅशन आहे. आयपीएलमध्ये खेळणारे बहुतेक खेळाडू कुठे तरी टॅटू काढत असतात. त्या टॅटूलाच आपल्याकडे गोंदवणे म्हणतात. चित्रपटसृष्टीतही या गोंदवण्याला फार महत्त्व आहे. ताटातूट झालेले भाऊ-भाऊ, माय-लेक ओळख पटवण्यासाठी हे गोंदवलेले चिन्ह फायटिंगच्यावेळी कपडे फाटून समोर आल्यावर अरे आपण भाऊ-भाऊ आहोत, असे म्हणून मिठी मारायचे आणि क्लायमॅक्सकडे वळायचे तंत्र या गोंदण्यामुळे सापडले होते. दीवारमधील अमिताभ बच्चनच्या हातावरील मेरा बाप चोर हैं, हे गाजलेले गोंदवलेले होते. तर, फटाकडीमधील सुषमा शिरोमणीची इंदी हे दंडावर गोंदवलेले नाव भाऊ-बहिणीला एकत्र आणते. आजकाल त्याला टॅटू म्हणत असले आणि मोठमोठ्या शहरातून असे टॅटू स्टुडीओ लोकप्रिय होत असले, तरी ही एक जागतिक पारंपरिक कला आहे.

शरीरावर चित्राकृती किंवा चिन्हे उठविण्याकरिता टोचून घेण्याची क्रिया म्हणजे गोंदणे. गोंदण्याप्रमाणे जखमा करून व्रण उठविण्याचाही एक प्रकार आहे. गोंदण्याची प्रथा केव्हा व कशी सुरू झाली, हे निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि कपड्याचा वापर सुरू होण्यापूर्वी सौंदर्यदृष्टीने शरीर रंगविण्याची पद्धत असावी अथवा काम करीत असताना चुकून केव्हा तरी शरीराच्या एखाद्या भागाला जखम झाली असावी व तीत नकळत रंगद्रव्य मिसळून तो व्रण कायम झाला असावा. यातूनही गोंदण्याची कल्पना निर्माण झाली असावी. अतिभौतिक शक्तीच्या भीतीपोटीही गोंदण्याची कला उदयास आली असावी व त्याद्वारा संबंधित व्यक्तीचे रक्षण होत असावे, अशी कल्पना हर्बर्ट स्पेन्सरने सुचविली आहे.

नॉइबुर्गर माक्स याच्या मते वैद्यकाच्या एखाद्या प्रक्रियेतून हा प्रकार सुरू झाला असावा. जमातीचे किंवा विजयाचे चिन्ह म्हणूनही गोंदणे सुरू झाले असावे. काही मानवशास्त्रज्ञ गोंदण्याचा संबंध देवादिकांना करण्यात येणाºया रक्ताच्या अभिषेकाशी जोडतात. इतर काहींच्या दृष्टीने स्त्रियांच्या सहनशक्तीची कसोटी पाहण्याकरिता योजिण्यात आलेल्या प्रथेचे हे अवशिष्ट रूप आहे.

गोंदण्यासाठी निरनिराळ्या देशांत निरनिराळी साधने वापरली जातात. झाडांचे वा माशांचे काटे, हाडे, शिंपले इ. नैसर्गिक अणकुचीदार साधनांपासून ते आधुनिक काळातील साध्या किंवा विजेवर चालणाºया सुयांपर्यंत अनेक साधनांचा गोंदण्याकरिता उपयोग करण्यात येतो. शरीरावर सुईसारख्या तीक्ष्ण हत्याराने टोचून त्यात रंगद्रव्ये, तसेच कोळशाची पूड घालतात. त्यामुळे गोंदण्याला निळसर रंग येतो. काही ठिकाणी चाकूने जखमा करून त्यात रंगद्रव्ये घालून त्यावर ठराविक झाडांच्या सालीची राख वा कोळशाची पूड घालतात.

बोर्निओतील जमातींत चित्राचा ठसा काजळी व उसाच्या रसाच्या मिश्रणात बुडवून तो शरीरावर उठवतात. जपानी लोक गोंदण्याकरिता निरनिराळ्या आकारांच्या चार सुया वापरतात. भारतात स्त्रीचे दूध किंवा कारल्याचा रस, गोडेतेल व काजळ एकत्र खलून ते मिश्रण गोंदण्यासाठी वापरतात. सुईचे टोक या मिश्रणात बुडवून टोचून टोचून गोंदण्याची क्रिया करतात. गोंदणे पूर्ण झाल्यावर त्यावर एरंडेल व हळदीच्या मिश्रणाचा लेप लावतात. अलीकडे गोंदण्याचे रासायनिक मिश्रण तयार मिळते व गोंदण्याची क्रियाही यंत्राच्या साहाय्याने करता येते.

काही जमातींत गोंदणे व लग्न यांचा संबंध दिसून येतो. सॉलोमन बेटावरील जमातींत चेहºयावर व छातीवर गोंदून घेतल्याशिवाय मुलगी विवाहास योग्य ठरत नाही. आॅस्ट्रेलियन आदिवासी लग्नापूर्वी तरुण मुलीच्या पाठीवर भीतीदायक स्वरूपाचे गोंदण करतात. तैवानमधील जमातीचे लोक लग्नापूर्वी मुलीचा चेहरा गोंदतात. न्यू गिनितील पापुअन जमातीत अविवाहित मुलींच्या सर्व शरीरावर गोंदण्यात येते. फक्त चेहरा मात्र लग्नाच्या वेळी गोंदून सुशोभित करण्यात येतो. आसाममधील नागा जमातीत गोंदल्यानंतरच तरुण युवक लग्नास योग्य समजण्यात येतो.

गोंदण्याचे निरनिराळे प्रकार आढळतात. त्याचप्रमाणे शरीराच्या कपाळ, गाल, हनुवटी, छाती, स्तन, दंड, मनगट इ. निरनिराळ्या भागांवर गोंदण करण्यात येते. टिंबांच्या आकृती, विशिष्ट चिन्हे, मोर, मत्स्य, कोल्हा, अस्वल इत्यादींची चित्रे स्वस्तिक, देवाचे तसेच आदरणीय किंवा आवडत्या व्यक्तीचे नाव, तुळशी-वृंदावन, हनुमान, महादेवाची पिंड, इतर देवांचा चेहरा इ. प्रकार गोंदणात दिसून येतात.

क्वचित एखादा अपवाद वगळता गोंदण्याची प्रथा कमी अधिक प्रमाणात साधारणत: सर्वत्र दिसून येते. ईजिप्तमध्ये केलेल्या उत्खननावरून इ. स. पू. २००० वर्षांपूर्वीच्या ममींवर गोंदण्याच्या निळ्या खुणा आढळून आल्या आहेत. न्यूझीलंडमधील माओरी जमातीत ही कला अत्यंत प्रगतावस्थेत होती, असे दिसून आले आहे. जपानी लोकांतही ही कला विशेष समृद्ध झाली आहे.

बायबलच्या जुन्या कराराने गोंदणे निषिद्ध ठरविले आहे. मुहंमद पैगंबरानेही त्यास मनाई केली आहे. वैदिक वाङ्‌मयात गोंदण्याचा उल्लेख आढळत नसला, तरी हिंदू समाजात गोंदण्याची प्रथा फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. शिक्षा म्हणून गुन्हेगाराच्या कपाळावर गोंदून त्याची धिंड काढण्यात येत असे. गुन्हेगार, राजकीय कैदी यांची ओळख पटण्याकरिता त्याचप्रमाणे गुन्हेगारांना परस्परांची ओळख देण्याकरिता गोंदण्याचा अवलंब केला जाई. वैद्यकीय उपचारांच्या दृष्टीनेही गोंदण्याचा उपयोग करण्यात येतो. सौंदर्यवर्धन हा तर गोंदण्याचा मुख्य उद्देश आहे.

पन्नास वर्षांपूर्वी गोंदण्याची कला मागे पडली होती; पण टॅटूच्या निमित्ताने ती पुन्हा विकसीत झाली आणि तरुणांमध्ये तिचे आकर्षण वाढलेले दिसते. त्याचे चित्र आयपीएलमधील खेळाडूंमध्ये दिसते.

प्रफुल्ल फडके/संस्कृती

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …