ठळक बातम्या

गब्बर भुंकत नव्हता, सांगत होता

गेला आठवडाभर शंतनूच्या सोसायटीत सगळ्यांना एकच चिंता लागून राहिली होती. रात्री-अपरात्री भुंकणाºया गब्बरचा बंदोबस्त कसा करायचा, कारण त्याच्या रात्री-अपरात्री भुंकण्याने लोकांची झोपमोड होत होती. वृद्ध व्यक्तींना, तर त्याचा खूपच त्रास होत होता. गब्बर तसा सर्वांचा लाडका होता, तो त्या सोसायटीत किती तरी वर्षे राहत होता. मुलांबरोबर त्याची खूप चांगली दोस्ती होती. त्या मुलांना अनोळखी व्यक्ती त्रास देऊ लागली की, तो त्या अनोळखी व्यक्तीवर तुटून पडत असे. सोसायटीच्या रखवालदारांना तो रात्रीच्या गस्तीसाठी मदत करत असे, त्यामुळे त्यांचाही तो लाडका होता, परंतु गेला आठवडाभर त्याने रात्री-अपरात्री भुंकून सर्वांना जेरीस आणले होते. त्याचा बंदोबस्त करण्याचा एकमेव उपाय आता सर्वांना सुचू लागला होता, तो म्हणजे त्याला लांब कुठे तरी निर्जनस्थळी नेऊन सोडून देणे किंवा त्याला महापालिकेच्या ताब्यात देणे. हा विचार सोसायटीत चर्चिला जात असताना, लहान मुले मात्र अस्वस्थ होत होती, त्यांचा लाडका गब्बर त्यांच्यापासून दूर जाणार ही कल्पना त्यांना अस्वस्थ करून सोडीत होती.

शंतनूने त्याच्या सर्व छोट्या मित्र-मैत्रिणींची मिटिंग बोलावली आणि गब्बरला सोसायटीत ठेवून घेण्यासाठी काय करता येईल, यावर सर्व बच्चे कंपनी विचार करू लागली. एक गोष्ट सर्वांनाच पटत होती, गब्बरचे रात्रीचे भुंकणे त्रासदायक होत होते. एक-दोन दिवस नव्हे, तर गेला आठवडाभर त्याचा त्रास सर्व रहिवाशांना होत होता. आजी-आजोबा, नोकरीवर लवकर उठून जाणारी माणसे त्यामुळे हैराण झाली होती. शंतनू म्हणाला इतके दिवस रात्री असा त्रास गब्बरने कधीच दिला नाही. आताच तो असा का वागतो?, याचा आपण छडा लावण्याचा प्रयत्न न करता एकदम त्यालाच कायमचा घालविण्याचा आपण विचार करतो हे चुकीचे नाही वाटत. सर्व मित्र-मैत्रिणी म्हणाल्या हो रे, त्याला काही तरी सांगायचे आहे, हेच आपण सगळे विसरलो; पण त्याला तर बिचाºयाला आपल्यासारखे बोलता येत नाही, मग आपल्याला कळणार कसे त्याला काय सांगायचे ते? रश्मी म्हणाली, शंतनू म्हणाला ते आपल्याला शोधून काढलं पाहिजे. शंतनू म्हणाला एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली का? गब्बर फक्त रात्रीचा आणि आपल्या गार्डनमध्ये उभा राहूनच भुंकत असतो. हल्ली आपल्या सोसायटीतील गार्डनमधील दिवे रात्री दहानंतर बंद केले जातात. ते योग्यच आहे, कारण त्यामुळे आपण विजेची चांगली बचत करू शकतो. त्यामुळे आपल्या राखवालदारांनाही कुत्रा का भुंकतो ते कारण कळत नसावे. आज आपण फक्त आजची रात्र जागून गब्बर का भुंकतो हे शोधून काढू, कारण उद्या रविवार आहे. आपल्याला ज्यास्त वेळ उद्या झोपून राहता येईल. त्याने सगळ्या मित्र-मैत्रिणींना जवळ बोलावून सांगितले. आपण सर्वांनी रात्री झोपताना बॅटरी घेऊन गुपचूप झोपायचे. रात्री गब्बर भुंकू लागला की, गपचूप खाली जमायचे.
सगळ्यांना एक वाटत होते आपल्याला रात्र होताच झोप अनावर होईल, आता परीक्षाही जवळ आली आहे. त्यासाठी सर्वांनी आज रात्री अभ्यास करायला बसायचे, म्हणजे कोणाला संशयदेखील येणार नाही. त्याप्रमाणे रात्री सर्व बच्चे कंपनी अभ्यास करत बसली. घरची सर्व मोठी मंडळी त्यांना अभ्यास करताना पाहून एकदम खूश झाली. आपली मुले अभ्यासाला बसलेली पाहून त्यांनाही समाधान वाटत होते. हळूहळू रात्र वाढत गेली, काही मुले अभ्यास करता करता पेंगू लागली. इतक्यात गब्बरचे नेहमीसारखे जोरजोरात भुंकणे सुरू झाले. मुले एकदम सावध झाली, प्रत्येकाने आपापली बॅटरी घेतली आणि गुपचूप दरवाजाची कडी काढून खाली गार्डनमध्ये आली. रखवालदार एकदम अचंबित झाला, त्याला कळेना ही वानरसेना एकदम कशी काय खाली जमली. गब्बर भुंकत होता. त्याने वळून पाहिले, त्याचे सर्व मित्र त्याच्या मागे जमले होते. त्याला एकदम हायसे वाटले, तो धीर एकवटून एका झुडपाच्या जवळ झेपावला. सर्व बच्चे कंपनी आपापल्या हातातल्या बॅटºया लावून त्याच्यापाठोपाठ त्या झुडपाच्या जवळ गेले व पाहतात तर काय एक भला मोठा लांबलचक नागोबा त्या झुडपाच्या मागे फणा काडून उभा होता. सर्वांची पाचावर धारण बसली. शंतनू म्हणाला, अजिबात घाबरू नका. आपण त्याला दुखावले नाही, तर तो आपल्याला काही करणार नाही. शंतनूचे वडील आणि इतर घरातील मोठी माणसे हे खालचे दृश्य आपापल्या घराच्या खिडकीतून पाहत होती. सर्वांनाच मुलांचे कौतुक वाटत होते. शंतनूच्या वडिलांचा एक मित्र हा सर्प मित्र होता. शंतनूच्या वडिलांनी त्याला लगेच फोन करून बोलावले. तोही अर्ध्या तासात हजर झाला आणि त्याने त्याच्या पद्धतीने त्या भल्या मोठ्या नागाला शिताफीने पकडले. मोठी माणसेही नंतर खाली गोळा झाली, त्यांनी अनुभवाने सांगितले हा नागोबा रोज तुमच्या गार्डनमध्ये उंदीर वगैरे खाद्य शोधायला रात्रीच्या वेळी येत असणार आणि त्यामुळेच तुमचा गब्बर रोज अस्वस्थपणे भुंकत होता, त्याला संकटाची जाणीव झाली होती; पण ते मुके जनावर तुम्हाला सांगणार कसे. त्यामुळे तो भुंकून सांगायचा प्रयत्न करत होता आणि तुम्ही मात्र त्याला कायमचा गप्प कसे करता येईल, याचा विचार करत होतात. त्या सर्प मित्राने तो साप आपल्या ताब्यात घेतला आणि तो निघून गेला.

गब्बर उड्या मारत होता. सर्व बच्चे कंपनी त्याच्याभोवती जमा झाली. त्याने प्रत्येकाशी पुढचा एक पाय पुढे करून आनंदाने शेक हँड केले. सर्व मोठी माणसे म्हणाली, लहान मुलांना जे सुचले ते आपल्याला इतके दिवस सुचले नाही. त्यांनी सर्व बच्चे कंपनीचे तोंड भरून कौतुक केले. शंतनूला ही कल्पना सुचल्याबद्दल त्याचे खास अभिनंदन करायला मोठी माणसे विसरली नाहीत.
आता गब्बर पहारेकºयांबरोबर रोज रात्री शांतपणे पहारा देत असतो आणि सोसायटीतील अबालवृद्ध त्याच्या भरवशावर आपापल्या घरी शांत झोप घेत असतात.

– मोहन गद्रे\

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …