१९ तारखेपासून देवमाणूस २ ही मालिका झी मराठीवर सुरू झाली. एका सिरीयल किलरची विकृत कथा यशस्वी झाल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर या मालिकेचे दुसरे पर्व सुरू केले. त्या दुसºया पर्वातील पहिला खून या आठवड्यात झाला. आता ही खुनांची नवी मालिका आणि आणखी कोणाचे मुडदे पडतात हे आगामी काळात दिसणार आहे.
देवमाणूस २ सुरू झाल्यानंतर त्यात काही बदल आणि रहस्यमयता असेल, अशी अपेक्षा प्रेक्षकांची होती. पण तोच अजितकुमार देव उर्फ देवीसिंग आता राजस्थानी बनून आपल्या बायकोला घेऊन कातळवाडीत येतो. गावातले लोक त्याला ओळखतात आणि हेच डॉक्टर आहेत, हे लक्षात येते. तो अधूनमधून मराठी बोलून जुन्या आठवणी सांगतो आणि हा नक्की काय प्रकार आहे हे गावकºयांना कळत नाही. पण त्याला आता परत जाऊ द्यायचे नाही, हे गावकरी नक्की करतात.
नटवर बनून इथे दाखल झालेल्या अजितकुमारबरोबर त्याची मारवाडी बायको आहे. ती त्याला इथून घेऊन जाण्याचा आग्रह करत आहे. त्यामुळे तो तिचा खून करतो आणि तिचे प्रेत मोठ्या शिताफीने नदीत बुडवून टाकतो. पण यात बºयाच गोष्टी असंबद्ध अशा वाटतात. अजितकुमारच्या पहिल्या पुण्यतिथीच्या दिवशीच तो गावात नटवर म्हणून प्रकट होतो, तेव्हा हाच डॉक्टर आहे, हे बजा ठामपणे सांगतो. अजितकुमार मेला समजून त्याचा पुतळा उभारलेला असतो. मग त्याच्याऐवजी नेमके कोणाचे प्रेत मिळाले?, तो मेला याचा काय पुरावा होता?, हे सगळंच अनुत्तरीत राहते. इतक्या कमी कालावधीत नटवर बनलेल्या डॉक्टरला ती राजस्थानी बाई कुठे भेटते, ती तो नटवर आहे असे का म्हणते, याचे रहस्य समोर आल्याशिवाय या मालिकेचे कथानक पुढे सरकरणार नाही. पहिला भाग संपवताना डिम्पल डॉक्टरचे पैसे, दागदागिने घेऊन पळून जाते, असे दाखवले होते. मग ती परत गावात कशी आली आहे?, त्या पैशांचे तिने काय केले?, हिरॉईन बनायला ती जर पैसे घेऊन पळाली होती, तर ती गावात परत कधी आली याचा उलगडा होणे आता आवश्यक आहे.
यात फक्त वर्षभरात बाबू हा दारूड्या झाला आहे, एवढेच दिसून येते. दारूच्या नादात तो काहीही करतो आहे, हे केवळ विनोद निर्मितीसाठी केलेले प्रकार आहेत. त्यात त्याने दारूच्या नशेत ग्रामसेवकाशी लग्न करणे, नवरा-बायकोसारखे दोन पुरुषांनी वरातीत हिंडणे हे अगदी विचित्र प्रकार वाटतात. रहस्यमय, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मालिकेला ओढून ताणून विनोदी बनवण्यासाठी दारूचा घेतलेला आधार हे काही बरोबर वाटत नाही. सारखा तो २०रुपये मागत हिंडतो आणि देशी नवटाक टाकून येतो हे अती होत आहे.
विशेष म्हणजे डॉक्टर परत आला आहे, हा गाजावाजा झालेला असतानाही पोलिसांना त्याचा सुगावा लागलेला नाही. पोलिसांचे कुठेही दर्शन झालेले नाही. पहिल्या पर्वात पहिल्या भागापासून पोलीस होते. इथे दहा भाग झाले, तरी पोलीस कुठेही दिसले नाहीत. अजित देव एक खुनी आरोपी म्हणून नाहीसा झाला होता. तो प्रकट झाल्याचा गाजावाजा झाल्यानंतर त्याला भेटायला कोणी पोलीस कसे आले नाहीत, हा एक प्रश्न आहे. पण ही असंबद्धता दूर केली, तर मालिका लवकर गती घेईल हे नक्की.
यात एकच झाले आहे. ते म्हणजे मुळच्या मालिकेच्या टायटल साँगचा आणि मालिकेचा काहीही संबंध नव्हता. तो जोडण्यासाठी या पर्वात आटापिटा केलेला दिसून आला. कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला दाखवला आहे. त्यात निरूपणासाठी अभंग म्हणून हे टायटल साँग ‘आला एकला, गेला एकला, गुंतला जीव मातीत’ हे पद घेतले आणि कुठून तरी त्याचा बादरायण संबंध जोडला. पण ग्रामीण भागात खरंतर कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या पावित्र्याने केला जातो. कीर्तनकाराचा सन्मान केला जातो, पण यात सरपंचाला कीर्तनकाराला हार घाला सांगितल्यावर तो स्वत:लाच हार घालून घेतो. ही केलेली विनोदनिर्मिती अत्यंत पोरकट वाटते. कीर्तनात उत्तररंग सुरू झाल्यावर हार घातला जातो तो आधीच स्वागताला घालतात तसा घालताना दाखवला आहे. हे काही तरी अतर्क्य जोडण्याचे प्रकार या मालिकेने थांबवले पाहिजेत.
मुळचे कथानक डॉक्टर पोळच्या संबंधाने दाखवण्याचा प्रयत्न होता, पण ते प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने कथानक नव्याने जुळवायचा प्रयत्न होत आहे. या प्रयत्नात ते भरकटताना दिसत आहे. ही भरकट थांबणे आवश्यक आहे. यामध्ये पहिला जो खून केला आहे, त्याचे प्रेत गायब करण्यासाठी ते प्रेत नदीत बुडवतो. नदीतून बाहेर येताना एक दगड घेऊन येतो. त्या दगडाचा वापर करून आता डॉक्टरीबरोबर तो भोंदुगिरी सुरू करणार हे नक्की झाले आहे. पहिल्या पर्वात डॉक्टर बनून विश्वास संपादन केला. आता हा दगड गुरूचा आशीर्वाद आहे, असे सांगून त्या दगडावरचा श्रद्धा अंधश्रद्धेचा बाजार इथून पुढे सुरू होणार. आता औषधांनी नाही, तर हा देवमाणूस आता खºया अर्थाने महाराज, बुवा होणार आणि बुवाबाजीतून मायाबाजार निर्माण करणार. डॉक्टर पोळचे कथानक सोडून आता आसारामबापूसारखा बुवा बनून तो भोंदुगिरीचा नवा खेळ सुरू करत आहे. आता देवमाणूस नाही, तर तो देवच बनू पाहतो आहे.
प्रफुल्ल फडके/छोटा पडदा
9152448055\\
One comment
Pingback: visit homepage