खिशात शब्द घेऊन हिंडणारे गदिमा

महाराष्ट्राचे वाल्मिकी अशी ओळख असलेल्या ग. दि. माडगूळकर यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्ताने ग. दि. माडगूळकर या खिशात शब्द घेऊन हिंडणा-या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहितानाही अंगावर रोमांच उभारल्याचा भास होतो. गणित हा विषय असेल, तरच माणूस मोठा होऊ शकतो. नाही तर, आयुष्याचे गणित बिघडून जाते, असे प्रत्येकाचे मत असते. पण, ग. दि. माडगूळकर हे गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पण, मराठी भाषेवरील त्यांच्या प्रभुत्वामुळे त्यांनी आयुष्यातील सर्व गणिते व्यवस्थित सोडवली. सर्व यशाची शिखरे त्यांनी लिलया पादाक्रांत केली.

घरच्या गरिबीमुळे चरिताथार्साठी चित्रपटव्यवसायात आले आणि तिथे त्यांनी कमालच केली. लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. हंस पिक्चर्स या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी या गाजलेल्या चित्रपटात काही छोटया भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकिदीर्चा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली. खूप लिहावेसे वाटू लागले, त्यांच्या कविता लेखनालाही वेग आला.
नवयुग चित्रपट लि. या चित्रसंस्थेत के. नारायण काळे यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पाहावयास मिळाले.तसेच आचार्य अत्रे यांच्या सोप्या पण, प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्यासमोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी आणि पहिला पाळणा या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर राम जोशी या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहिली. त्यात एक भूमिकाही केली. या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले.

गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन या नावाने संग्रहित आहेत. त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेल्या आहेत. युद्धाच्या सावल्या या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते. ते फारसे यशस्वी झाले नाही. कवितांमध्ये जोगिया, चार संगीतिका, काव्यकथा, गीतरामायण, गीत गोपाल, गीत सौभद्र यांना प्रचंड लोकप्रियता लाभली. गीतरामायणाने तर त्यांना वाल्मिकी बनवून टाकले. या रामायणात ते अक्षरश: शब्द आणि अक्षरांमध्ये सरस्वतीला घेऊन संचारले. कथासंग्रहांमध्ये कृष्णाची करंगळी, तुपाचा नंदादीप, चंदनी उदबत्ती या पुस्तकांचा समावेश आहे. तर, कादंबरी प्रकारात आकाशाची फळे हे पुस्तक गाजले.
त्यांचे आत्मचरित्र मंतरलेले दिवस आणि वाटेवरल्या सावल्या अशा स्वरूपात आहे. ग. दि. माडगूळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते. याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या, सोप्या; परंतु प्रभावी गीतांतूनही येतो. त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणामागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लय-तालांनी त्यांची गीते नटलेली असत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मन:पूर्वक प्रतिसाद दिला. त्यांच्या गीतरामायणाने तर कीतीर्चा कळस गाठला. त्यांना महाराष्ट्र-वाल्मिकी ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूतीर्ने दिली. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले. पण, त्याची गोडी कधीच कमी होत नाही. गदिमांच्या चित्रकथा वैविध्यपूर्ण असून त्यांचे संवाद सोपे पण, प्रत्ययकारी आहेत. चित्रपटतंत्राची त्यांची अत्यंत सूक्ष्म जाण त्यातून लक्षात येते.

त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटांत पुढचं पाऊल याची पटकथा, संवाद, गीते सबकुछ गदिमा. बाळा जो जो रे, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे. ऊन-पाऊस, मी तुळस तुज्या अंगणी, जगाच्या पाठीवर, संथ वाहते कृष्णामाई यांचा समावेश होतो. या सर्व चित्रपटांच्या कथा, पटकथा, संवाद, गीते त्यापैकी सर्व काही गदिमा होते. हिंदी चित्रपटात त्यांनी तुफान और दिया, दो आँखे बारह हाथ, गुँज उठी शहनाई हे त्यांनी लिहिलेले उल्लेखनीय हिंदी चित्रपट होते. माडगूळकर हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वºहाडी आणि वाजंत्री या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत. त्यांच्या जोगिया, मंतरलेले दिवस, चैत्रबन अशा अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला.
१९७३ मध्ये यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे ते काही काळ नियुक्त सदस्य होते, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचेही ते सदस्य होते.ग. दि. माडगूळकर हे आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग. दि. माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले, तरी त्यांचे गीतरामायण फार लोकप्रिय आहे. त्यांच्या गीतरामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत. मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ हा गदिमा, राजा परांजपे आणि सुधीर फडके या त्रिकुटाने गाजवला. राजा परांजपेंची निर्मिती, गदिमांची कथा, पटकथा, संवाद, गीते आणि सुधीर फडके यांचे संगीत आणि आवाज म्हणजे चित्रपट अजरामर होणार हे समीकरण या त्रिकुटाने साधले होते. चांगल्या निर्मितीसाठी त्यांच्यात अनेकदा खटके उडत. पण, ते बौद्धिक पातळीवरचे असायचे, त्यामुळे ते किस्सेही ऐकण्यासारखे असतात. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त गदिमांना शब्दपूर्ण आदरांजली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …

Leave a Reply

Your email address will not be published.