कोरोनामुक्त चीन

गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार झाल्याच्या बातम्या येत आहेत. काही शहरे लॉकडाऊन केल्याच्या बातम्या येत आहेत. दररोज १० हजारांच्या गटात रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे आश्चर्य वाटू लागले आहे. आता कोविडची किंवा कोरोनाची भीती वाटत नाही; पण याच चीनने काही दिवसांपूर्वी झिरो कोविडची घोषणा केली होती. कोरोनामुक्त चीन झाल्याचा दावा केला होता आणि अचानक गेल्या आठ दिवसांत हाहाकार कसा काय माजला? त्याचा परिणाम आपल्या देशावर होणार का, अशी शंका प्रत्येकाच्या मनात येणे स्वाभाविक आहे. चीनने केलेला दावा सपशेल फसलेला आहे, त्या तुलनेत भारताने त्यावर चांगली मात केलेली आहे, हे नक्की.

खरेतर कोविड-१९ विषाणू पहिल्यांदा आढळला, तेव्हा चीनने संपूर्ण वुहान शहरात कडक लॉकडाऊन लागू केले होते. इतर देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले, तेव्हा त्यांनी चीनच्या धर्तीवर त्यांच्या लोकसंख्येवर निर्बंध लादण्यास सुरुवात केली. लॉकडाऊनचा पर्याय चीनने स्वीकारला असताना भारतासारख्या अनेक देशांनी विलगीकरणाचा पर्याय निवडला आणि ते यात यशस्वीही झाले. भारताने चीनप्रमाणे झीरो कोविडचा दावा केला नसला, तरी आपण बºयापैकी कोरोनामुक्त होत आहोत. फक्त चीनने केलेल्या चुका आपण नाही केल्या, तर आज चीनमध्ये जो हाहाकार पुन्हा माजला आहे, तो प्रकार पुन्हा होणार नाही.

एखादी व्यक्ती संसर्गबाधित आढळली, तर तिला इतरांपासून वेगळे करा. जेणेकरून इतर लोक तिच्या संपर्कात येऊन आजारी पडू नयेत, हे विलगीकरणाचे तत्व आपल्याकडे एक हजार वर्षाहून अधिक काळापासून माहीत आहे. परंतु, सर्वच देशांनी लॉकडाऊन लावल्याचे कोविड-१९ च्या आधी कधीच घडले नव्हते. २०२० मध्ये काही देशांनी शून्य-कोविड धोरण स्वीकारले, त्यामुळे सीमा बंद करून वाहतुकीवर बंदी घालण्यात आली. नागरिकांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आणि बाधितांना वेगळे केले गेले. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी यापेक्षा चांगला मार्ग नाही. विषाणूचा प्रसार मंदावल्यावर निर्बंध शिथिल करता येतील. तथापि इतर देशांमधून येणाºया लोकांसाठी अत्यंत कठोर विलगीकरणाचे धोरण तेव्हाही पाळले जाईल, अशी या धोरणामागील कल्पना होती.

विज्ञानाच्या दृष्टिकोनातून हे धोरण अंमलात आणणे आव्हानात्मक असेल, असे प्रारंभिक संकेत होते. पहिले आव्हान हे होते की, बहुतेक बाधितांमध्ये कोणतीही लक्षणे नव्हती आणि इन्क्युबेशन कालावधी अनिश्चित होता. ज्यांना लक्षणे दिसून आली त्यांचीच चाचणी केली जाऊ शकते. एखाद्याला लक्षणे नसतील, तर प्रवासादरम्यान केवळ चाचणी किंवा रँडम चाचणीद्वारे संसर्गाची माहिती मिळू शकत होती. आता संपूर्ण लोकसंख्येची, तर रँडम चाचणी केली जाऊ शकत नाही, त्यामुळे काही बाधित नेहमीच सुटले. काही लोक बाधिताच्या संपर्कात आल्यानंतर दोन आठवड्यांनंतरही पॉझिटिव्ह होऊ शकत होते. याचा अर्थ असा होतो की, बाधित व्यक्तीसाठी विलगीकरण कालावधी वाढवला असता, तरीही अनेक चाचण्या होऊनही प्रत्येक रुग्ण ओळखला जाईल याची हमी नव्हती.

चीनमध्ये पुन:पुन्हा तेच संकट येण्याचे कारण हेच आहे. त्यामुळे चीन याच दुष्टचक्रात अडकला. भारतात मुंबईसारख्या महत्त्वपूर्ण शहरात घरोघर जाऊन काहीवेळा तपासणी केली. कुठे बाधित रुग्ण आढळतात का याची पाहणी केली. टेस्ट वाढवल्या त्यामुळे दुसºया लाटेत दररोज वाढणाºया रुग्णांची संख्या दिसत असली, तरी तो खरा आकडा होता. त्यामुळे सर्वांना वेळीच उपचार करता आले. वेळीच रुग्ण हुडकून काढणे सहज शक्य झाले. हे भारताचे काम कौतुकास्पद आहे.

चीनने म्हटल्याप्रमाणे त्यांची शून्य कोविड पॉलिसी यशस्वी होऊ शकत नाही, याचा आणखी एक संकेत फार पूर्वी मिळाला होता. कोविड प्राण्यांनाही बाधित करू शकतो आणि मानव प्राण्यांच्या अनेक प्रजातींमध्ये संसर्ग पसरवू शकतो. दोन भिन्न प्रजातींमधील दुहेरी-संसर्ग हेदेखील सिद्ध करते की, प्राणी सार्स-कोव्ह-२ चे वाहक असू शकतात आणि विषाणू मानवांमध्ये प्रसारित करू शकतात. त्यामुळेच व्हेरिएंटच्या उदयाने शून्य कोविड धोरण अधिक दिशाहीन वाटू लागले. मूळ वुहान-स्ट्रेनमध्ये विषाणूची पुनरुत्पादक संख्या २.५ ते ३ होती, म्हणजे प्रत्येक बाधित व्यक्ती सरासरी दोन ते तीन लोकांमध्ये विषाणू प्रसारित करू शकते. अल्फा व्हेरिएंटने पुनरुत्पादक संख्या वाढवली, तर डेल्टा आणि ओमिक्रॉनमध्ये ती आणखी पुढे गेली. ओमिक्रॉनची लागण झालेली व्यक्ती सरासरी ८ ते १० लोकांना बाधित करू शकते. लक्षणरहित संसर्गाचे कारण होऊ शकणारा आणि पशूंना वाहक करणारा संसर्गजन्य संसर्ग मानवापासून दूर करणे अशक्य आहे.

भारताची लोकसंख्या प्रचंड असली, तरी आपण ज्या वेगाने लसीकरण केले त्याचे जगाने कौतुक केले; पण याचे चीनला कौतुक नव्हते. जगभरातल्या लसीकरणाच्या बातम्या येत होत्या पण चीनचे काही स्पष्ट चित्र येत नव्हते. त्यामुळे लसीकरण नसल्याने कदाचित चीनमध्ये या रोगाने पुन्हा डोके वर काढले असावे. लॉकडाऊन, विलगीकरणाबरोबर प्रभावी लसीकरणाकडे चीनने दुर्लक्ष केले. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच संकटाला चीनला तोंड देण्याची वेळ आलेली आहे.

खरंतर कोविड टाळता येत नाही हे स्पष्ट झाले, तेव्हा जगाकडे पर्यायच काय उरला होता? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शून्य कोविड शक्य नाही, हे समजून घेणे आवश्यक होते; पण चीनने शून्य कोविड हे ध्येय ठेवले आणि आपणच या रोगाला जन्माला घातले आणि त्यावर नियंत्रण मिळवले, अशी आत्मप्रौढी मिरवली; पण प्रत्यक्षात स्वत:च निर्माण केलेल्या भास्मासूराने त्यांच्याच डोक्यावर आता हात ठेवायला सुरुवात केलेली आहे, हे त्यातील वास्तव आहे.

गेल्या दोन वर्षांत आपल्याला कोविडबद्दल बरेच काही शिकवले आहे. एक कोविड गेला, तर दुसरा कोणता तरी रोग येणार याची आता मानसिकता प्रत्येकाने तयार केली आहे. त्यामुळे झीरो कोविड असा दावा करण्याची गरज उरलेली नाही. चीनचे ते धोरण फसले आहे.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …