ठळक बातम्या

कोणत्याही गोष्टीचा ध्यास महत्त्वाचा

कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी त्याचा ध्यास महत्त्वाचा असतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, पूजा पाठ, अनुष्ठान करून काही होत नाही, तर ईश्‍वराला प्राप्त करण्याची जिज्ञासा असली पाहिजे. तसा ध्यास असला पाहिजे. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी ध्यास असावा लागतो.

एका गुरूकडे एक शिष्य रोज मागणी करायचा. हे गुरू मला तुम्ही धर्म सांगा. मला ईश्‍वराला प्राप्त करून द्या. त्याचे गुरू रोज स्मित करायचे. नित्यनियमाने रोज तो शिष्य आपल्या गुरूला म्हणायचा मला धर्म पाहिजे. मला ईश्‍वर पाहिजे. एकदा ऐन कडाक्याच्या उन्हात तो गुरू आपल्या शिष्याला तलावावर घेऊन गेला. गुरूसमवेत तो शिष्य तलावात उतरला. शिष्याने पाण्यात डुबकी मारली. त्याबरोबर गुरूने त्याचे डोके पाण्याखालीच दाबून धरले. पाण्यातून त्याला वरच येऊ दिले नाही. तो शिष्य गुदमरायला लागला, हात-पाय आपटू लागला आणि ताकद लावून त्याने डोके बाहेर काढले आणि जोराने श्‍वास घेऊलागला.
तेव्हा गुरूने त्याला विचारले, पाण्यात जेव्हा तुला डुबवले, तेव्हा तुला सगळ्यात जास्त गरज कशाची वाटली? तेव्हा त्या शिष्याने उत्तर दिले की, मला सर्वात जास्त गरज वाटली ती श्‍वास घेण्याची. तेव्हा त्या गुरूने आपल्या शिष्याला सांगितले की, इतकीच गरज ईश्‍वराची वाटते? आपल्याला जगण्यासाठी एका श्‍वासाची गरज आहे, तशीच गरज ईश्‍वराचीही आहे, असे जेव्हा तुला वाटेल, तेव्हा क्षणात तुला ईश्‍वराची प्राप्ती होईल. ज्याप्रमाणे आता जगण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावून, श्‍वास घेण्यासाठी तू प्रयत्न केलास तसाच प्रयत्न ईश्‍वरप्राप्तीसाठी तू लावलास तर तो सहज प्राप्त होईल, कारण ईश्‍वरप्राप्ती हे तुझे साध्य आहे. त्यासाठी नुसते पूजापाठ करून, अनुष्ठान करून किंवा पोथी वाचून तू ते साध्य करू शकणार नाहीस, तर त्याचा ध्यास असला पाहिजे.

जोपर्यंत तुमच्यात ईश्‍वराला प्राप्त करण्याची जिज्ञासा निर्माण होत नाही, ध्यास निर्माण होत नाही तोपर्यंत तुमच्यात आणि एका नास्तिकात काहीही फरक असत नाही. नास्तिक हा निष्कपट असतो तुम्ही तसेही असत नाही, कारण तुम्ही अस्तिक आहोत असे भासवत राहता. नास्तिक असण्याचा हा एक गुणच आहे. जो गुण तुम्हा आम्हात नाही.
आम्ही ईश्‍वराला मानतो, आहे असे मानतो; पण तो प्राप्त करण्यासाठी कधी प्रयत्न करत नाही. फक्त पूजापाठाचे अवडंबर माजवतो. त्यापेक्षा ईश्‍वर नाही, असे मानणारा अस्तिक कसलेच अवडंबर माजवत नाही, हे चांगले.

एखाद्या बंदिस्त खोलीत एक चोर राहतो आहे. त्याच्या शेजारच्याच खोलीत सोन्याने भरलेल्या राशी आहेत. त्या दोन्ही खोल्यांमधील भिंतही फारशी मजबूत नाही. हे चोराला जेव्हा समजेल तेव्हा त्याची झोप उडेल. हे सोनं मला कसे मिळवता येईल, याचा विचार करूनच त्याची चैन जाईल. त्याचे जगण्यातले लक्ष उडेल.
त्या चोराला ज्याप्रमाणे सोने हे सुखसंपत्तीचे सर्वस्व वाटते, तसेच आपल्याला ईश्‍वरप्राप्ती म्हणजे सर्वस्व वाटते. ते जर प्राप्त करायचे असेल, तर ती पातळ भिंत हटवण्याचा प्रयत्न करायला हवा ना. जेव्हा माणसाच्या मनात ईश्‍वर आहे, अशी भावना निर्माण होते तेव्हा तो ईश्‍वराला प्राप्त करण्याचे प्रयत्न करतो. इथूनच माणसाचा अध्यात्मिक प्रवास सुरू होतो. या प्रवासात तो पूजा पाठ, तीर्थयात्रा, अनुष्ठान अशी कर्म करत राहतो. पण हे करताना ईश्‍वराची प्राप्ती करण्याचा ध्यास असला पाहिजे. या ध्यासाने आत्म्याला आलेली मरगळ, मलिनता दूर होते आणि शुद्ध आत्मा परमात्म्याचे मिलन होते.

हा ईश्वरप्राप्तीचा जसा ध्यास असतो, तसा तो आपल्या कर्माशीही निगडीत असतो. कोणतेही काम पूर्ण करण्याची आपली इच्छा असेल, तरच ते पूर्ण होते. प्रबळ इच्छा, इच्छाशक्ती हे फार महत्त्वाचे आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर आपण असाध्य ते साध्यही करू शकतो. त्यासाठी ध्यास महत्त्वाचा असतो. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असे म्हणून चालत नाही. गाजराची पुंगी वाजली, तर वाजली नाही तर मोडून खाल्ली, असेच जर आपण प्रयत्न केले, तर काही साध्य होणार नाही. ध्यास महत्त्वाचा असतो. त्या ध्यासाचा आणि इच्छाशक्तीचा फार जवळचा संबंध असतो.
ओशो रजनीश एक उदाहरण नेहमी द्यायचे. तुम्ही अतिशय कठीण असे खडक पाहिले असतील की, जे दगडफोड्याला छन्नीनेही फुटत नाही; पण त्याच दगडाला भेगा पाडण्याचे काम एखादे छोटेसे रोपटे करते. काक विष्ठेतून पडलेले बीज त्या दगडात रूजते आणि ते नाजूक इवलेसे रोप त्या खडकाला भेगा पाडते. याचे कारण उर्ध्वपातीत होण्याची, वर जाण्याची त्या रोपट्याची इच्छा ही प्रबळ असते. त्या इच्छेवरच तर त्या रोपट्याचा वटवृक्ष बनतो, पिंपळाचे झाड उगवते. यालाच ध्यास म्हणतात. तो ध्यास निर्जीव अशा छन्नीत नसतो. छन्नी फक्त घाव घालत राहते. रोप प्रेमाने, ध्येयाने रूजते. त्याचा ध्यास निश्चित असतो, म्हणूनच कोणत्याही गोष्टीचा ध्यास महत्त्वाचा असतो.

बिटवीन द लाईन्स /प्रफुल्ल फडके
9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …