ठळक बातम्या

कोंबडीचे पिल्लू

ही घटना मी प्रत्यक्ष अनुभवली आहे, ती संक्षिप्त रूपात मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
एकदा दोन कोंबड्यांना अंडी उबवण्यासाठी वेगळे करून दहा अंड्यांची सोय करून दिली. पुढे एकवीस दिवसांनी अंड्यातून पिल्ले जन्माला आली; पण अघटित घडले, त्यातील एक कोंबडी अचानक सहा दिवसांनी मरण पावली. तिची पिल्ले पोरकी झाली.

दुसºया कोंबडीने मेलेल्या कोंबडीच्या पिल्लांना आपल्या पंखाखाली घेण्यास नकार दिला, त्यामुळे अनाथ पिल्लांना स्वत:चा बचाव करण्यासाठी समूहात राहून व कठीण प्रसंगी आडोसा पाहून लपण्याशिवाय पर्याय उरला नाही. मला वाटले व माझे ठाम मत झाले की, आता या पिल्लांना आईचे संरक्षण मिळणार नाही, म्हणजे त्यांची जगण्याची व पूर्णवाढ होण्याची शक्यता नसल्यासारखीच आहे.
पुढे काही दिवसांनी जसजशी पिल्ले मोठी होत होती, त्यांचे आकारमान वाढू लागल्याने, कोंबडीला सर्वांना धोक्याच्या क्षणी पंखाखाली घेणे कठीण होऊ लागले आणि इथेच शिकारी पक्षी व प्राण्यांना, त्यातील जे पिल्लू इतरांपेक्षा कमजोर होते ते भक्ष्य म्हणून मिळत गेले. या समस्येमुळे आईच्या पंखाखालची पिल्ले दिवसागणिक कमी होऊ लागली. पुढील काही दिवसांनी तर कोंबडीच्या पंखाखाली वाढणारी दोनच पिल्ले उरली, जी कुठूनही धोका वाटल्यास, धावत येऊन पंखाखाली मावू शकत होती व कोंबडी त्यांना वाचविण्यासाठी पंख पसरत होती.

जी कोंबडी पिल्लांना अनाथ करून गेली तिची काही पिल्ले सुरुवातीला संरक्षण न मिळाल्याने शिकार झाली; पण त्यातल्यात्यात जी सुदृढ होती ती पिल्ले मात्र परिस्थितीशी झगडण्यात यशस्वी झाली. एकतर त्या पिल्लांना कसलेच संरक्षण नसल्याने, जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. या गीतामधील ओळीप्रमाणे त्यांची स्थिती निर्माण झाली.
अनाथ पिल्ले शक्यतो एकत्र राहत असत, जर धोका खूपच मोठा वाटल्यास, त्यांना झुडपात, पालापाचोळ्यात, एखाद्या वस्तूच्या खाली, गाडीखाली जाण्याची सवय झाली व ती सवय खूप अंगवळणी पडली. दहा पिल्लांपैकी तब्बल पाच पिल्ले कठीण परिस्थितीशी झगडून आत्मनिर्भर बनली. त्याच्या उलट मायेच्या उबदार पंखाखाली सतत राहणारी केवळ दोनच पिल्लांची पूर्ण वाढ होऊ शकली.

यातून एक बोध नक्कीच मिळाला, जी पिल्ले सतत आईच्या छत्रछायेखाली असतात त्यांची परिस्थितीशी झगडून, जीवंत राहण्याची क्षमता फारच कमी असते. मुळात त्यांना स्वत:ला वाचविण्यासाठी इतर पर्याय आपल्या आसपास आहेत, हेच समजत नाही, तशी त्यांची मानसिकताच बनत नाही. कोणत्याही धोक्याच्या क्षणी त्यांना केवळ आईच दिसते, जर त्या क्षणी आई दूर असल्यास व आईपर्यंत पोहोचण्याची शक्यता नसल्यास, अशी पिल्ले थिजून जातात व सहज शिकार बनतात.
या उलट अनाथ पिल्ले आईचे संरक्षण नाही हे माहीत असल्याने, चंट बनतात, आसपासच्या परिस्थितीशी स्वत:ला सामावून घेत, उपलब्ध साधन सामुग्रीला स्वत:चा बचाव करण्यासाठी उपयोगात आणतात.

माणूस तरी यात काय वेगळा आहे!
अतिसंरक्षण केलेल्या मुलांना, शिक्षकांनी थोडी जरी शाळेत शिक्षा केली, तर पाल्य भांडायला शाळेत जातात. त्यांना कोणतेही मैदानी खेळ खेळण्यास मज्जाव केला जातो, शाळेत पालक शिक्षकांना भेटून हे सांगतात की, मूल खेळताना पडले, तर त्याला खरचटले, लागले तर शिक्षक जबाबदार राहतील. शिक्षक अशा मुलांना जाणीवपूर्वक मैदानातून दूर ठेवतात.

अतिसंरक्षित मुले अपयश पचवू शकत नाहीत, त्यांचे मनोरुग्ण होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यांना धोक्याच्या प्रसंगात चाणाक्षपणे विचार करून निर्णय घेणे जमतच नाही, कारण त्यांना तशी सवय आई-वडिलांनी लावलेलीच नसते.
आमच्या लहानपणी जर शिक्षकांनी शिक्षा केली, तर घरी सांगत नसत. शाळेत मार खाल्लेला असतोच, घरी सांगितले तर, आई कान पिळायची व वडील आपला हात साफ करून घेत. कुणीही पालक शिक्षकांनी का मारले व का शिक्षा दिली हे विचारायला जात नसत. जीवनाची लढाई याचमुळे लढण्याचे बळ मिळाले, अपयश पचवणे, त्यातून नवीन मार्ग काढून स्वत:ला स्थापित करणे शक्य झाले.

आज याच कारणाने सैन्यात व पोलीस दलात बहुतांशी मुले ही ग्रामीण भागातील भर्ती होतात. आज आॅलम्पिकमध्ये पदक मिळवणारे खेळाडू ग्रामीण भागातील आहेत, तसेच बरेचदा आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत, जे लहानपणापासून आत्मनिर्भर बनण्याकडे वाटचाल करत असल्याने, जागतिक स्पर्धेत न डगमगता खंबीरपणे लढवय्ये म्हणून प्रस्थापित होत आहेत.
विजय लिमये/9326040204\\

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …