कारवाई आवश्यक

 

शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एसटी कर्मचारी अचानक शरद पवारांच्या बंगल्याबाहेर पोहोचले. तिथे त्यांनी ‘शरद पवार, हाय हाय’ अशा घोषणा दिल्या, तसेच चप्पल आणि दगडफेक करण्यात आली. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. संपूर्ण महाराष्ट्राला लाज आणणारा आहे. त्याचप्रमाणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. एकूणच मुंबई पोलिसांबाबत राज्य सरकार अभिमान बाळगत होते. केंद्र सरकार ईडी, सीबीआय तपास करू लागले की, आमचे मुंबई पोलीस सक्षम आहेत, असे छाती ठोकपणे सांगत होते, पण हा अभिमानाचा बुरखा गळून पडेल, अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसून आली. याचे कारण आझाद मैदानापासून हिंसक वृत्तीने आंदोलक सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या बंगल्याच्या दिशेने जातात आणि त्याचा पोलिसांना थांगपत्ता नसावा हे अत्यंत खेदाचे आहे. अविश्वसनीय आहे.

आझाद मैदानापासून सिल्व्हर ओकपर्यंत जाण्यासाठी किमान २० मिनिटे तरी लागतील. आंदोलक पवारांच्या घराच्या दिशेने चालले आहेत हे माध्यमांना कळते, कॅमेरे सरसावतात, त्याचे थेट प्रक्षेपण सुरू होते, पण पोलिसांना हे समजत नाही, हे एकूणच संशयास्पद असे वाटते. गृहखाते, गुप्तचर यंत्रणा इतकी कशी काय गाफिल राहू शकते? या सगळ्याचीच चौकशी होणे आवश्यक आहे. एकूणच संपकरी चुकीच्या पद्धतीने वागत होते. त्याचा हा अतिरेक झाला होता. कोणीतरी त्यांची माथी भडकावतो आणि कसलाही विचार न करता हे संपकरी अशाप्रकारे कृत्य करतात हे अत्यंत घृणास्पद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडेच गृहखाते असताना त्यांना आपल्याच नेत्याचे रक्षण करणे अवघड होऊन बसते हे फार वाईट आहे.

खरंतर शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्याचे काहीच कारण नव्हते.त्यांचा काही संबंधही नव्हता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री बाजूला राहिले आणि थेट शरद पवारांच्या घरावर हल्ला होतो? खरंतर अशा प्रकारचा हल्ला कोणाच्याही घरावर होणे चुकीचे आहे. चर्चेतून मार्ग निघतो. पण या आंदोलकांना काही ऐकायचेच नाहीये. कसली चर्चाच करायची नाहीये, त्यामुळे तोडगा निघत नाही, ही वस्तुस्थिती आहे, पण त्यांची डोकी भडकवण्याचे काम करणाºयांवर कारवाई होणेही आवश्यक आहे.

आपण काय बोलतो, काय वागतो याचे भानही हे लोक गमावून बसले आहेत. पण यातून एकच झाले की, सर्वसामान्यांना, महाराष्ट्राला एसटी कर्मचाºयांबद्दल जी सहानुभूती होती ती या घटनेमुळे ते गमावून बसले आहेत.

गेल्या ५ महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षा असताना कसलीही चर्चा न करता कुणीतरी डोकी भडकावतो आणि अशाप्रकारे हल्ला करतो हे अत्यंत घृणास्पद असे कृत्य आहे. ही घटनाच अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. अशी प्रथा पडली तर ती चुकीची आहे. महाराष्ट्रात आज अनेक आंदोलने सुरू आहेत. विविध संघटनांची विविध आरक्षणाची आहेत, नोकºयांची आहेत. असे प्रत्येक आंदोलक जर अशाप्रकारे नेत्यांच्या घरात घुसू लागले तर कसे होईल? हा चांगला संदेश या घटनेने गेलेला नाही. खरंतर सरकारने एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत, पण ऐकायचेच नाही या हेतूने हा संप केला जात होता. विलिनीकरणामुळे जे फायदे मिळणार होते ते सरकारने सगळे देऊ केले असताना ही आदळआपट कशासाठी? विलिनीकरणच करायचे होते, तर साठ वर्षांपूर्वी हे महामंडळ निर्माणच का केले असते? वाटेल ती मागणी कशी काय केली जाते? स्वतंत्रपणे कारभार करण्यासाठी हे महामंडळ असताना त्याचे विलिनीकरण कशाला हवे आहे? अत्यंत चुकीच्या प्रकारे हे आंदोलन केले गेले. ते फसले आहे हे लक्षात आल्यावर वैफल्यग्रस्त मनोवृत्तीतून हा हल्ला केला. पण त्यामुळे सर्वांनी सहानुभूती गमावली आहे.

खरंतर कोणत्याही कर्मचाºयावर कारवाई नको, अशी सूचना हायकोर्टाने गुरुवारी केली होती. त्याप्रमाणे सरकारने सकारात्मक पावले उचलली होती. एसटी कर्मचाºयांनी २२ एप्रिलपर्यंत रूजू व्हावे, असेही कोर्टाने सांगितले होते. एसटी कर्मचाºयांनाही निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी मिळावी. बकरी आणि वाघाच्या लढाईत बकरीला वाचवणे गरजेचे आहे, असे सांगून हा तोडगा सुचवला होता. सरकारने त्याला मान्यता दिली होती. प्रत्येक कर्मचाºयाला ३०० रुपयेप्रमाणे एकूण ३० हजार रुपये कोविड भत्ता द्यावा, असेही सांगितले होते. तेही राज्य सरकारने मान्य केले होते. त्यानंतर याच कर्मचाºयांनी अगदी पेढे वाटून, भंडारा उधळून, गुलाल लावून आनंद साजरा केला होता. आमचा विजय झाला. सत्याचा विजय झाला. संविधान जिंकले असा डंका गुरुवारी पिटला आणि २४ तासांच्या आत त्यांची डोकी कशी काय फिरली? असे काय एकाएकी घडले की, त्यांनी हल्ला करण्याचा आततायी निर्णय घेतला? त्यामुळे पोलीस जरी गाफील राहिलेले असले, तरी हे एकाएकी घडलेले नाही. त्यामागच्या सूत्रधाराचा तपास झाला पाहिजे. कोणी डोकी भडकावली आणि हे कृत्य करण्यास भाग पाडले त्याचा तपास होणे गरजेचे आहे.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …