काय एक एक लोक पण असतात!

एक चांगल्या सुशिक्षित, सुसंस्कृत अशा मध्यमवयीन, मध्यमवर्गी, गृहिणी, आमच्या पाहण्यातल्या आहेत, त्यांना चहा पावडरचा दर आता कमी झालाय, हे कितीतरी वेळा सांगून झालाय, पण दर वेळी चहा पावडर आणताना उरलेले पैसे परत आणायला विसरतात. बिचारा म्हातारा दुकानदार ओ मॅडम, ओ मॅडम, करत जीने चढून धापा टाकत टाकत उरलेले पैसे द्यायला तिच्या घरापर्यंत येतो. त्याला उगीचच चहा घेता का? म्हणून विचारण्यापेक्षा दर वेळी उरलेले पैसे परत घेऊन ये ना! त्या बिचाºयाचे रोजचे श्रम तरी वाचतील.
दुसºया एक आजी आहेत, रोज नातीला सोडायला किंवा आणायला टॅक्सी करून जातात. ट्राफिक जाम असताना रस्त्यात फुकटचा चहा पिऊन फक्त सदा सुखी राहा म्हणून, चहा मोफत देणाºया टपरीवालीला तोंड भरून फुकटचा आशीर्वाद देऊन मोकळ्या होतात. मी रिक्षानी जाता -येताना रिक्षावाल्याला फुटपाथच्या बाजूबाजूने मुद्दाम रिक्षा घ्यायला सांगतो. ट्राफिकमध्ये अडकलो की आशाळभूत पणे इकडे तिकडे, कुठे चहाची टपरी दिसते का बघत राहतो. रिक्षा असल्यामुळे काच खाली करायची कटकट पण नसते. पण छे, कोणी चहावाला, माझ्याकडे बघेल तर शप्पथ, माझे आशीर्वाद त्याला नको असतील तर मी तरी काय करणार? मी नुसताच त्याच्या तोंडावरून हात फिरवून आशीर्वाद देईन असे नाही, अगदी त्याची पाठ सुद्धा थोपटीन, पण कोणाच्या नशिबातच नसेल माझे आशीर्वाद घेणे, तर मी तरी काय करणार? नको तर नको. त्याच नशीब.

एक आमच्या, नेहमी पाहण्यातल्या आजी आहेत. त्या भाजी घ्यायला जातात ना तेव्हा, त्यांच्या पाकिटातली, दर वेळी, दहाच रुपयांचीच नोट खाली‌ पडते, त्यांचा दिव्य लक्षणी, धडपड्या नातू दरवेळी त्यांच्याबरोबर असतोच, तो दरवेळी जमिनीवर सरपटत ती नोट, कपडे पुरते खराब करून काढतोच काढतो. रोज रोज दहा रुपये, एकाच शर्टाला साफ करायला लागत असणार की नाही? कशाला अशा लहान मुलांना बाजारात, बरोबर न्यायचे, पण सांगणार कोण. बरे चांगली पाचशेची नोट तरी कधी पडेल की नाही, तेही नाही! एकदाच काय तो साबणाचा मोठा कंटेनर आणता येईल, पण नातवाला बाजारात नेल्याच कौतुक!
तसेच एक आमच्या नेहमीच्या पाहण्यातले एक मोठे वयस्कर कलाकार आहेत, पण तरुणांनाही लाजवतील असा उत्साह त्यांच्या अंगी असतो. ते खरे म्हणजे एक‌ कलाकार, राजकीय पक्षाचे, प्रवक्ते वगैरे कोणीही नाहीत, तरीही रोज एक चॅनल सुंदरी त्यांचा बाईट घ्यायला सरळ त्यांच्या किचनमध्ये हजर होतेच होते आणि योगायोगाने बघा, नेमके ते वडे खात असतात. आजूबाजूला, पाव, ब्रेड वगैरे दिसत नाहीत, म्हणजे वडापाव नाही, नुसतेच वडे मटकावत असणार, रोज वडे खाऊनसुद्धा, कशी सडसडीत तब्येत आहे, यांव रे यांव.

तशीच एक सावळीशी लग्नाळू मुलगी आहे. ती‌ पण आमच्या नेहमीच्या बघण्यातली आहे, तिला गाण्याची सुद्धा आवड आहे, सुराला अजून तयारी करून घ्यायला हव्ये, पण आवाज चांगला आहे, वधू-वर सूचक मंडळात, वर संशोधनाला इतके वेळा जाते, तिने एकाच तरुणावर आपल लक्ष केंद्रित केले आहे. आज ना उद्या तिच्या गाण्यावर फिदा होऊन, तो तिला होकार देईल असे तिला का वाटते कोणास ठाऊक! पण कसले काय, तीथली साऊंड सिस्टीम असली थर्ड क्लास आहे ना, दरवेळी माईक मधेच बंद पडतो, मग दरवेळी, माईकवर चापट्या मारून, तो सुरू करावा लागतो. आता कोरोना बराच आटोक्यात आलाय, आता विवाह मुहूर्त सुरू होतील, परमेश्वराच्या चरणी एकच प्रार्थना, इलेक्ट्रिशीयनला बुद्धी दे, आणि विवाह मंडळाचा माईक दुरुस्त करून होवो. लग्नाला आपल्याला नाही बोलवले तरी हरकत नाही, पण तिचे हात एकदाचे पिवळे होओत.
काय पण एक एक लोक असतात ना? तुमच्या आहेत असे कोणी, रोजच्या पाहण्यातले लक्षवेधी लोक, मग तुमचे पण अनुभव, माझ्या अनुभवाना जोडाना. मजा येईल.

कां. दी. वल्ली

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …