ठळक बातम्या

कायम सेवाभावी वृत्ती बाळगणा‍ºया मॅडम!

‘उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका’ हा वाक्प्रचार कोणी ऐकला नसेल असे होणार नाही. साध्या भाषेत सांगायचे झाल्यास काहीही झाले, तरी हाती घेतलेले एखादे कार्य कधीही अर्धवट सोडता कामा नये. हाती घेतलेला वसा अर्धवट न टाकणारे मोजकेच असतात. एखाद्या व्रतस्थाप्रमाणे त्यांची मार्गक्रमणा होत असते. अगदी मनापासून ते कार्य करत असतात. अशाच सेवाभावी व्रतस्थ म्हणजे नेहा वाळींजकर मॅडम.

३१ जुलै २०२१ रोजी वाळींजकर मॅडम वरळी येथील मराठा हायस्कूल या शाळेतून सेवानिवृत्त झाल्या. त्या निवृत्त झाल्या असल्या, तरी ज्ञानदानाचे आणि संस्कारी पिढी घडवण्यासोबतच मुलांमधील कलागुण ओळखून ते फुलवणे अशा महत्त्वाच्या सेवाभावी कार्यातून मात्र त्या निवृत्ती पत्करणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ म्हणता येईल. मराठा हायस्कूल या शाळेत इतिहास हा विषय शिकवतानाच निरनिराळ्या सांस्कृतिक स्पर्धा, कार्यक्रम यात वेगवेगळ्या पातळीवर मराठा हायस्कूलचा ठसा ठळकपणे उमटवण्यात वाळींजकर मॅडम यांचा मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा आहे.
उत्कृष्ट निवेदिका असलेल्या मॅडम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना जे दाखले देतात त्यातून त्यांचा सखोल अभ्यास जाणवतो. बहुतेक वेळा निवेदकाचे काम हे मधला वेळ आपल्या निवेदनाने भरून काढणे इतकाच असतो. इतर कार्यक्रम सुरू असताना निवेदक अलिप्त असतात, पण मॅडम निवेदनासोबतच इतर कार्यक्रमांचाही आस्वाद घेतात, त्यात रंगून जातात आणि चेह‍ºयावरील हास्य आणि डोलावलेली मान त्या आस्वादाची पसंतीदर्शक खूणच असते. ही पसंतीनंतर निवेदनातूनही डोकावते. त्यामुळेच की काय त्याचे निवेदन विशेष खुलते.

विविध स्पर्धांसाठी त्या विद्यार्थ्यांची निवडच अशी करतात की, त्या स्पर्धात ते यशस्वी झालेच पाहिजेत जेणेकरून मराठा हायस्कूलचे नाव झळकत राहावे. विविध स्पर्धांत विद्यार्थ्यांनी मिळवलेली पारितोषिके ही त्यांच्या पारखी नजरेचीच साक्ष देतात. लोकनृत्य स्पर्धेत २१ वर्ष सातत्याने मिळवलेले राज्य, राष्ट्रीय पातळीवरील यश हे त्यांच्या यशस्वी कारकिर्दीतील मानाचे पान म्हणता येईल. पर्यावरण हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. प्रत्येक बाब ही पर्यावरणस्नेही असली पाहिजे, याकडे त्या कटाक्षाने पाहत. आषाढी एकादशीनिमित्त शाळेतून निघणारी दिंडी ही पर्यावरण दिंडी म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली निघत असे. या दिंडीदरम्यान रोपवाटप, विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कापडी पिशव्यांचे वाटप होत असे. रंगपंचमीला रासायनिक रंगाऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करा हा फक्त संदेश न देता ते नैसर्गिक रंग त्या प्रत्यक्षात मुलांकडून करून घेत असत. रक्षाबंधनादिवशी मुलांकडून राखी तयार करून घेऊन त्या शाळेच्या आवारातील वृक्षांना बांधायला लावून वृक्षसंरक्षणाचा आगळावेगळा संदेश देत असत.
माझी मुलगी तन्वी प्राथमिक विभागातून माध्यमिक विभागात प्रवेश करताच वाळींजकर मॅडमनी तिला हेरले आणि विविध स्पर्धांसाठी तयार केले. अर्थातच नंतर त्या स्पर्धात तन्वीने मॅडमच्या मार्गदर्शनाखाली यश मिळवले. तन्वीच्या पाठोपाठ सखीलाही त्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. शैक्षणिक प्रगती साधत असतानाच या स्पर्धांतील सहभाग आणि नंतर त्यात मिळत गेलेले यश यामुळे दोघींच्याही व्यक्तिमत्व विकासाची जडणघडण होत राहिली. अर्थातच यामागे वाळींजकर मॅडम यांनी दोघींवर दाखवलेला विश्वास आणि त्यांनी केलेले मार्गदर्शन महत्त्वाचे होते.

वाळींजकर मॅडम यांच्याबद्दल अजूनही बरेच काही लिहिता येईल, परंतु एक नक्की की, त्यांचा परिसस्पर्श लाभलेला प्रत्येक विद्यार्थी यशस्वी झालेला आहे आणि त्यामुळेच की काय विद्यार्थीदशा संपल्यानंतरही मॅडमच्या संपर्कात आहे. जन्मोजन्मीचे नाते असेच तर तयार होत असते. तन्वी व सखीसोबतच मीही त्यांच्या संपर्कात असतो तो या नातेसंबंधांमुळेच. हीच तर मॅडम यांची खरी कमाई आहे. मॅडम सेवानिवृत्त झाल्या असल्या, तरी त्यांची सेवाभावी वृत्ती कधीच निवृत्त होणार नाही. या सेवाभावी वृत्तीमुळेच त्या यापुढेही संस्काराच्या पैलूतून विद्यार्थीरूपी हिरे घडवत राहणार आहेत. त्यासाठी त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो ही सदिच्छा.
– दीपक गुंडये\

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …