कोणत्याही देशाची प्रगती व विकास हा त्या देशातील औद्योगिक, तांत्रिक प्रगतीवर अवलंबून असतो. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी देशातील उद्योग, धंदे, व्यवसाय, औद्योगिकीकरण हे महत्त्वाचे आहे आणि या उद्योगधंद्यांसाठी कारखान्यांमध्ये, संस्थांमध्ये असणारे मनुष्यबळ म्हणजेच तेथील कर्मचारी, कामगार यांच्यावरच त्या उद्योगाचे, व्यवसायाचे भवितव्य व विकास अवलंबून आहे. त्यामुळे कामगार, कर्मचारी हा उद्योग, व्यवसायातील सर्वात महत्त्वाचा घटक समजला जातो आणि अशा महत्त्वाच्या घटकांसाठी सरकारने अनेक कायदे तयार केले आहेत. त्यांच्या हितासाठी सुरक्षेसाठी व सुविधेच्या दृष्टीने सरकारद्वारे अनेक कायदे तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी कर्मचारी राज्य विमा अधिनियम हा एक महत्त्वाचा कायदा आहे. सरकारद्वारे हा अधिनियम १९४८मध्ये तयार करण्यात आला. कर्मचारी वर्गाचे आजार, महिला कामगारांची प्रसूती, रोजगारसंबंधित दुर्घटनेमुळे तात्पुरती अथवा कायम स्वरूपात शारीरिक दुर्बलता आली असेल व त्यामुळे मजुरी अथवा अर्थार्जनाची क्षमता समाप्त झाली असेल, तसेच आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास कामगारांच्या हिताच्या व सुरक्षेच्या उद्देशाने हा अधिनियम लागू करण्यात आला आहे. कामगारांची सुरक्षा व हीत अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक घटनांमध्ये कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सामाजिक सुरक्षा देणारी ही योजना अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त आहे. या अधिनियमामध्ये कामगार व त्यांच्या अवलंबितांच्या देखभालीसाठी वैद्यकीय हमी देण्यात आली आहे. या अधिनियमाचा आधार घेऊन केंद्र सरकारने योजना प्रशासित करण्यासाठी राज्य कामगार विमा महामंडळाची स्थापना केली आहे. हा अधिनियम कर्मचारी राज्य विमा निगमद्वारे प्रशासित करण्यात आलेला आहे. कर्मचारी राज्य विमा अधिनियमांतर्गत उपलब्ध करण्यात येणारा लाभ नियोक्ता आणि कर्मचाºयांद्वारे केल्या गेलेल्या अंशदानाच्या माध्यमातून वित्तपोषित होतो. या अधिनियमांतर्गत नियोक्ता व कर्मचारी दोघेही आपापले योगदान देतात. श्रम आणि रोजगार कल्याण मंत्रालयाद्वारे कर्मचारी राज्य विमा अधिनियमांतर्गत अंशदानाचा दर निश्चित केला जातो. या योजनेच्या विस्ताराच्या हेतूने सरकारने जास्तीत जास्त लोकांना सामाजिक सुरक्षा कव्हरेज प्रदान करण्यासाठी नियोक्ता व कर्मचाºयांच्या विशेष नोंदणीचा कार्यक्रम सुरू केला आहे. अशा प्रकारे हा अधिनियम कर्मचारी व कामगारवर्गासाठी तयार करण्यात आलेल्या अधिनियमांपैकी एक महत्त्वाचा व उपयुक्त समजला जातो.
– अॅड. सोनल योगेश खेर्डेकर/कायद्याचे राज्य\\