कंबर कसणे

कंबर कसणे, म्हणजे आपण एखाद्या कामाची सुरुवात करण्यासाठी पदर खोचून झोकून कामाला सुरुवात करणे असा घेतो आणि तो आहेही बरोबर; पण इथे आपण कंबर कसणार आहोत ती आपल्या कमरेला गुंडाळायला काही तरी हवे म्हणून. म्हणजे, थोडक्यात आपण कटिभूषणे किंवा कमरेवरची आभूषणे पारंपरिक काय आहेत, ते पाहणार आहोत.

कटीवर म्हणजे कमरेवर घालण्याचे अलंकार. कटिभूषणांचा प्राथमिक प्रकार म्हणजे कमरपट्टा. पुरुषांना शस्त्रे बाळगण्यासाठी आणि स्त्रियांना कपडे सावरण्यासाठी कमरपट्ट्यांचा उपयोग होई. कालांतराने कमरपट्ट्यांना अलंकार म्हणून महत्त्व प्राप्त झाले. रोमन सैनिक आपल्या गणवेशावर कमरपट्टा बांधीत व त्यात पैसे ठेवीत. यूरोपातील स्त्रियांही बटवे, पंखे, कात्र्या बाळगण्यासाठी कमरपट्ट्यांचा उपयोग करीत.

ग्रीसमधील इथाका बेटातील थडग्यात सोन्याच्या कटिभूषणात हायसिंथ फुले कोरलेली आढळली. गॉल म्हणजे प्राचीन फ्रान्स देश. तेथील कटिभूषणांत भारतीय कटिभूषणांप्रमाणे लोंबणारी पदके व साखळ्या लावीत असल्याचा पुरावा मिळतो. गॉलमधील फ्रँक व बंगर्डी भागातील थडग्यांमध्ये जडावाचे काम केलेली चांदीची व तांब्याची कटिभूषणे आढळली आहेत. पश्चिमी प्रबोधनकालात कटिभूषणे नक्षीदार असत व त्यांच्या मध्यभागी सिंहाचे किंवा एखाद्या प्राण्याचे तोंड कोरलेले असे, तर पूर्वेकडील सुमात्रा बेटातील चांदीच्या कटिभूषणांत मध्यभागी माशाच्या तोंडाचा फासा असे. आधुनिक काळात नॉर्वेतील लोकांच्या कटिभूषणांत मधोमध गोल कडे व त्याच्या दोन्ही बाजूस चौकोनात फुलांचे विविध नमुने आढळतात. ग्रीसमध्ये गेल्या शतकात विवाहित स्त्रिया चांदीची व तांब्याची कटिभूषणे घालीत.

प्राचीन काळापासून भारतात स्त्रिया व पुरुष दोघेही कटिभूषणे वापरीत. काही धार्मिक विधींमध्ये विशिष्ट प्रकारचे कटिबंध वापरण्याची पद्धत दिसते. मौंजीबंधनात बटूला तीन पदरी कटिबंध म्हणजे मेखला किंवा करगोटा बांधीत व त्याच्यात मागे व पुढे लंगोटी अडकवीत. पुढे त्याची जागा साखळीने घेतली. या साखळ्या चांदीच्या किंवा क्वचित सोन्याच्याही असत. यांनाच पुढे बारीक घागºया लावण्यात आल्या. या साखळ्यांना एक वा अनेक पदर असत. गरीब लोकांत सुताचे किंवा रेशमाचे रंगीत करगोटे वापरीत. स्त्रियांच्या कमरेभोवती चांदीचा किंवा सोन्याचा कमरपट्टा असे. तो पुढील भागी फाशाने बांधला जाई. श्रीमंत स्त्रियांच्या कमरपट्ट्यात रत्‍ने आणि मोतीही जडविलेले असत. अशा कटिबंधांना रसना, मेखला, कांची, कमरबंध, इ. नावे आहेत. अशा प्रकारची विविध कटिभूषणे भारतातील जुन्या शिल्पांत आढळतात.

एक पदरी कटिभूषणास कांची म्हणत, आठ पदरीस मेखला म्हणत व सोळा पदरीस रसना म्हणतात. भारतीय शिल्पांतील विविध कटिभूषणे नक्षीदार व आकर्षक आहेत. काही कटिभूषणांत खालच्या बाजूस घागºया व घंटिका असत व त्यांचा चालताना मंजुळ आवाज होत असे. त्यास पुष्कळदा मण्यांचे पायांपर्यंत लोंबणारे एक वा अनेक पदरही लावलेले असत. अलीकडील सोन्याच्या किंवा चांदीच्या कटिबंधांत हिरवा पाचू किंवा माणकाचा पैलूदार खडा बसविलेला आढळतो. कटिभूषणांची प्रथा आता फारशी आढळत नाही, तरी खेडेगावातील लोक विशेषत: स्त्रिया व मुली लग्‍नासारख्या महत्त्वाच्या समारंभात सोन्या-चांदीचे कमरपट्टे वापरताना दिसतात. लग्नसमारंभ, हळदी-कुंकू हे दागिन्यांची हौस पूर्ण करण्यासाठी निमित्त असते.

वीस-बावीस वर्षांपूर्वी मोबाइल, सेलफोन आले तेव्हा अनेकांनी आपला मोबाइल ठेवण्यासाठी कमरेच्या पँटच्या पट्यासाठी एक पाकीट तिथे बसवले होते. मोबाइलसाठी त्या काळात चाललेली ती कमरेच्या आभूषणाची फॅशन फार काळ टिकली नाही; पण कमरेचा वापर हा अनेक कारणांसाठी कसल्याचे दिसून येते. प्रत्येक काळात बदल होत गेले. म्यानातील तलवारीपासून मोबाइल ठेवण्याची जागा किती मोक्याची आहे, हे सांगण्यासाठीच आमचा विठोबा कमरेवर हात ठेवून उभा आहे, असे वाटते.

प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाइन्स

9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …