नर्मदा किनारी सुंदरसे गाव वसले होते. निसर्ग सौंदर्याने गाव सुरेख दिसत होते. तेथे शंकर दयाळ नावाचा शेतकरी आपली पत्नी उमादेवीसह राहत होता. हे दोघेही धार्मिक वृत्तीचे होते. शंकर दयाळ आपल्या शेतातून गव्हाचे पीक घेत असे. त्यातील बराचसा हिस्सा गरीबांना वाटत असे. त्यामुळे त्याची सेवा, परोपकारी वृत्ती सर्वत्र पसरली होती.
शंकर दयाळने आपले सारे आयुष्य परमेश्वराला समर्पित केले होते. तो सुख-दु:खाची प्रत्येक घटना परमेश्वराची इच्छा समजत असे. त्याला आठ वर्षांचा मुलगा होता. त्याचे नाव कल्याण होते. तोसुद्धा आई-वडिलांप्रमाणे धार्मिक होता. तो दररोज नर्मदा नदीत स्नान करी. त्यानंतर परमेश्वराची पूजा करून आई-वडिलांची सेवा करीत असे.
एकेदिवशी कल्याण सूर्योदयापूर्वी स्नानासाठी नर्मदेवर गेला आणि कमरे भर पाण्यात उभा राहिला. अचानक मगरीने त्याचा पाय पकडला. तेव्हा त्याची आई उमादेवी किनाºयावर पूजा करत होती. तिने कल्याणची किंकाळी ऐकली आणि त्याच क्षणी तिने मुलाला वाचवण्यासाठी नदीत उडी मारली, परंतु कल्याण दिसलाच नाही.
शंकर दयाळ घरी परमेश्वराची पूजा करीत होता, तेव्हा त्याला मगरीने कल्याणला पकडले, असा समाचार मिळाला, परंतु त्याने पूजा थांबवली नाही. शंकर दयाळने पत्नीचे सांत्वन केले व परमेश्वराच्या भक्तीत रममाण झाला.
काही दिवसांनंतर राज्यात दुष्काळ पडला. पशु-पक्षी भुकेने व्याकूळ होऊन तडफडून मेले. दुष्काळामुळे शेतात धान्य उगवले नाही. गावकरी नाईलाजाने गाव सोडू लागले. शंकर दयाळने आपल्या पत्नीसह गाव सोडले. चालत चालत नर्मदा किनाºयापासून दूर गेले. रात्र झाल्यामुळे एका झाडाच्या खाली बसले. अतिश्रमामुळे ते दमले होते आणि त्यामुळे त्यांना लगेच झोप लागली.
अचानक झाडाच्या बिळातून काळा सर्प बाहेर आला. त्याने उमादेवीला दंश केला. काही क्षणात ती परमेश्वराचे नाव घेता घेता थंड पडली. पत्नीचा मृत्यू झाल्याचे पाहून शंकर दयाळ याच्या तोंडून शब्द आले- ‘जशी परमेश्वराची इच्छा!’
शंकर दयाळने तुळशीचे पान पत्नीच्या देहावर ठेवले. नर्मदेचे पाणी तिच्या अंगावर शिंपडले आणि तिचा देह प्रवाहात सोडला. त्याने काही वेळाने पुन्हा परमेश्वराची आराधना सुरू केली, त्यात तल्लीन झाला. त्याने परमेश्वराला प्रार्थना केली, ‘परमेश्वरा, मी एकटा राहून आपली सेवा करू शकणार नाही. तुम्ही मला आपल्या चरणापाशी घ्या.’ म्हणता म्हणता शंकरचे शरीर थंड पडले. येथे त्याच्या पत्नीचे शरीर नर्मदेच्या पाण्यात वाहत होते. एका झाडाच्या फांदीला तिचे शरीर अडकले. हे साधूने पाहिले आणि स्नान करता करता थांबला. साधू बाबा नाथ संप्रदायाचा होता. त्याचा शिष्यगणही मोठा होता. साधूने उमादेवीला पाण्यातून बाहेर काढून किनाºयावर आणले आणि मंत्र शक्तीच्या बळावर सर्पाचे विष काढले. त्या क्षणी उमादेवी उठून बसली.
साधू बाबाने दिव्यदृष्टीच्या बळावर उमादेवीला सांगितले, ‘तुझे पती परमेश्वराची प्रार्थना करत वैकुंठाला गेले.’ हे ऐकून उमादेवीच्या तोंडून शब्द निघाले, ‘परमेश्वराने जे केले ते ठीक केले.’ त्यानंतर ती साधू महाराज यांना म्हणाली, ‘मी आता एकटी राहिली आहे मला सतमार्ग सांगा.’
साधू बाबा महाराजांनी डोळे बंद केले. म्हणता म्हणता त्यांच्या हातात एकतारी आली आणि ते म्हणाले, ‘उमा बेटी, आजपासून ही एकतारी तुझी साथीदार आहे. एकतारी वाजवून भजन म्हणत जा. लोकांना भक्तिमार्गाने प्रेरित कर.’
उमादेवी अनेक वर्षे भजने गात गावोगावी फिरत राहिली. गात गात ती एकदा नवीन राज्यात पोहोचली. त्या राज्यात उत्सव साजरा होत होता. राजधानी फुलांनी सजली होती, प्रत्येक घरात दीप जळत होते. भजन म्हणत म्हणत राजमहालाच्या दारी उमादेवी आली, तेव्हा तिला समजले की, राजा संन्यास घेऊन आपल्या मुलाचा राज्याभिषेक करणार आहे.
उमादेवीचा सुरेल आवाज ऐकून लोक मंत्रमुग्ध होत होते. येथे राजकुमारनेही हा सुरेल आवाज ऐकला आणि तो राजमहालाच्या दारात आला. एक संन्यासी हातात एकतारी घेऊन गाताना त्याने पाहिले. तो मंत्रमुग्ध झाला आणि संन्यासिनीच्या चरणावर पडला. सारे जण अवाक् होऊन पाहात होते. राजकुमारचा तोंडून शब्द आले, ‘आई तू!’
सारी प्रजा हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाली. राजकुमाराने संन्यासिनीला म्हटले, आई, मी तुझा कल्याण आहे. जेव्हा मगरीने नर्मदा नदीच्या पाण्यात माझा पाय पकडून मला आत नेले, तेव्हा मी परमेश्वराची प्रार्थना केली- मला मगरीच्या तावडीतून मुक्त कर. त्यानंतर प्रवाहाबरोबर मी फार दूरवर पोचलो आणि मगरीच्या तावडीतून माझी सुटका झाली. तेथे राजा चंद्रसेन नौकाविहार करीत होते. त्यांनी मला पाहिले आणि पाण्यातून बाहेर काढून नौकेत बसवले.
या राजाला पुत्र नव्हता. त्यांनी मला चांगले संस्कार दिले, पुत्रप्रेमाने मला जवळ घेतले. मोठा झाल्यावर विवाह करून दिला आणि आज महाराज संन्यास घेऊन माझा राज्याभिषेक करीत आहेत. आई, मी आता राजा होणार आहे आणि तू राजमाता होऊन याच महालात राहा. त्यावर उमादेवी म्हणाली, ‘मुला, आता मी नदीकिनारी झोपडीत राहूनच माझे उर्वरित आयुष्य काढेन. परमेश्वर भक्तीशिवाय मला काहीही नको. मुलाला आणि सुनेला आशीर्वाद देऊन उमादेवी तेथून निघून गेली.’
– करुणा ढापरे/कथासागर
80078 70384\\