एखाद्या इंग्रजी शब्दाचा चुकीचा उच्चार पूर्वी कोणी केला, तर पुण्या-मुंबईतील लोक त्या माणसाची पूर्वी अक्कल काढायचे. खेडवळ आहे, घाटवळ आहे, अडाणी आहे, शिक्षणाचा दर्जा इथेपर्यंत त्याची लायकी काढली जात होती, पण आता तसेच उच्चार गेली काही वर्ष अधिकृतपणे केले जात आहेत. त्यावर कोणीही आक्षेप घेत नाही, नावे ठेवत नाही, तर उलट त्याचे अनुकरण करून ते चुकीचे उच्चार प्रचलित केले जात आहेत. म्हणूनच प्रश्न पडतो की, इंग्रजी भाषेत उच्चार शास्त्राचे काही नियम नाहीत का?, इंग्रजी भाषेचे अभ्यासक यावर भाष्य करत नाहीत का?, आक्षेप का घेत नाहीत?, एकही इंग्रजी भाषातज्ज्ञ, प्राध्यापक यावर जाहीरपणे का बोलत नाही, असा प्रश्न पडतो.
असे खूप शब्द आहेत, जे गेल्या काही वर्षांत बदलले आहेत, त्याचे उच्चार बदलले आहेत, पण त्यातील फक्त दोनच शब्दांवर मी इथे लिहिणार आहे. कारण हे शब्द सातत्याने वापरले जात आहेत. त्यापैकी पहिला शब्द आहे तो म्हणजे ‘डायरेक्टर’. अमूक एका चित्रपटाचा डायरेक्टर तमूक एक आहे. या बँकेचे डायरेक्टर बॉडीत तमूक एक व्यक्ती आहे. नाटकाचे डायरेक्शन जबरदस्त आहे. अशी वाक्य पूर्वी आपण बोलायचो, ऐकायचो. पण आजकाल टिव्हीवर किंवा कुठल्याही मुलाखतीत अभिनेते, दिग्दर्शक बोलताना या चित्रपटाचे डिरेक्शन मी केले, तमूक एका चित्रपटाचा डिरेक्टर तो आहे, आमच्या डिरेक्टरने सांगितल्याप्रमाणे मी काम केले, असे बोलले जाते.
स्पेलिंग एकच असून, डायरेक्टरचा डिरेक्टर कधी झाला कळलाच नाही. हा उच्चार बदलण्यासाठी कोणी पुढाकार घेतला?, दहा-वीस वर्षांपूर्वी असा उच्चार कोणी केला असता, तर त्याला खेडवळ, अडाणी संबोधले असते, पण आता प्रतिथयश आणि नामांकित लोक आपल्या भाषणातून मुलाखतीतून डिरेक्टर, डिरेक्शन असे शब्दोच्चार करताना दिसतात. या उच्चार शास्त्राच्या नियमावर कोणी बोलणार आहे की नाही?, मराठी भाषेत शब्दोच्चार आणि लिहिण्याला, त्यातील काना मात्रेलाही इतके महत्त्व आहे की, इकडचा काना तिकडे किंवा तिकडची मात्रा इकडे झाली तर अनर्थ घडतो. ‘दिन’ या शब्दात वेलांटी चुकून जरी दीर्घ किंवा दुसरी दिली, तर दिवसाचे दारिद्र्यात रूपांतर होते. त्यामुळे अचूक शब्दच भाषेचे महत्त्व वाढवत असतात. असे असताना आंतरराष्ट्रीय भाषा असलेल्या इंग्रजीचे उच्चार सोयीस्कर कसे बदलले जातात?
असाच एक गेल्या काही वर्षांत उच्चाराने बदललेला शब्द म्हणजे ‘फायनल’. गेल्या काही वर्षांत फायनलला फिनाले म्हणायचे फॅड आले आहे. ग्रँड फिनाले. फायनलचे फिनाले कोणी केले?, आम्ही फिनालेपर्यंत पोहोचलो. आम्ही फिनालेला जिंकणार आहोत. फिनाले हा अंतिम स्पर्धेचा शब्द आजकाल रूढ झालेला आहे, पण हाच उच्चार काही वर्षांपूर्वी कोणी केला असता, तर तो खेडवळ ठरला असता. मग आता खेडवळ पद्धतीने स्पेलिंगप्रमाणे उच्चार करण्याची प्रथा सुरू झाली, तर भविष्यात फिनिक्सचा उच्चार काय असेल?, सायकॉलॉजीचा उच्चार काय असेल?
इंग्रजी भाषेत ‘सी’चा उच्चार स आणि क अशा दोन्ही अक्षरांसाठी केला जातो. मग सर्कसचे कर्कस होणार का?, सर्क्युलरचे कर्क्युलर होणार का? नाईट, टाईट, राईट या शब्दांमध्ये ‘जी’ सायलेंट आहे. असे सायलेंट अक्षरांचे शब्द इंग्रजीत खूप आहेत. ते असायलेंट होणार का?कोणीतरी भाषा तज्ज्ञाने यावर आक्षेप घेतला पाहिजे. बोलले पाहिजे. सेलिब्रेटींकडून असे शब्द उच्चारले गेल्यामुळे शाळेत बालपणापासून व्याकरणातील नियमांनुसार केले जाणारे उच्चार बाजूला करून सेलिब्रेटींचे अनुकरण केले जात आहे. त्यातून हे डिरेक्टर, फिनाले असे शब्द रूढ होताना दिसत आहेत. त्यावर इंग्रजी विषयाच्या अभ्यासकांनी, विद्यापीठातील या विषयावर अभ्यास करणाºयांनी बोलले पाहिजे. चुकीच्या प्रथा असतील तर त्यावर आक्षेप घेऊन असा उच्चार करता येणार नाही, असे सांगितले पाहिजे किंवा त्याला अधिकृत मान्यता दिली पाहिजे. पण काहीतरी उच्चार शास्त्राचे नियम असले पाहिजेत. शाळेत शिकायचे डायरेक्ट इनडायरेक्टचे व्याकरण आणि नंतर ते डिरेक्ट इनडिरेक्ट म्हणून बाहेर पडायचे. त्यामुळे शिक्षकांनी चुकीचे शिकवले असा संदेश यातून जात आहे. यासाठी इंग्रजी भाषेच्या अभ्यासकांनी यावर आपले आक्षेप नोंदवले पाहिजेत.
प्रत्येक भाषेचे असे वैशिष्ट्य असते. त्याचे शास्त्र असते. त्याचे व्याकरण असते, पण इंग्रजी भाषेबाबत फार पूर्वीपासून अमेरिकन इंग्रजी आणि ब्रिटीश इंग्रजी यांच्यात वेगळेपण दिसते. फक्त लिपी म्हणून अल्फाबेट वापरली जातात आणि सोयीने उच्चार केला जात असेल, तर ती भाषा नेमकी कोणती?, आपल्याकडे देवनागरी अक्षरांचा वापर मराठी, हिंदी, संस्कृत या भाषांसाठी केला जातो, पण त्या तिन्ही भाषा स्वतंत्र आहेत. फक्त अक्षर म्हणून त्यांचा वापर होतो. म्हणूनच इंग्रजी अक्षरांचा अल्फाबेटचा वापर करून आपण नेमकी कोणती भाषा बोलत आहोत हे स्पष्ट होणे आवश्यक आहे.
– प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055\\
One comment
Pingback: Taurus Tracker