उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात घेतले जाणारे उखाणे हे आपल्या संस्कृतीचे आणि काव्य, कला प्रतिभेला दिले जाणारे प्रोत्साहन आहे. या संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे चांगल्यापैकी काम हे झी मराठीवरच्या होम मिनिस्टरने केले. हमखास आदेश भावोजी उखाणा घ्यायला लावणार, म्हणून अनेक भगिनी तयारी करून, पाठ करून येतात आणि बºयाचवेळा ऐनवेळी फाफलतातही. विसरतात आणि हसे करून घेतात; पण आपण या संस्कृतीकडे लक्ष दिले पाहिजे.

उखाणा हा फक्त नाव घेण्यापुरताच नाही, तर अन्य प्रकारचाही असतो. म्हणजे, कोड्यातून, कूटप्रश्नातून, कथनातून व काव्यात्म पदबंधातून चटकदार, तसेच खेळकरपणे आपले म्हणणे मांडण्याचा लोकवाङ्मयातील अभिव्यक्ती प्रकार म्हणजे उखाणा असे म्हणतात. आपल्याकडे उखाण्यालाच आहणा, उमाना, कोहाळा असे अनेक प्रतिशब्द आहेत. त्याला संस्कृतमध्ये प्रहेलिका आणि हिंदीत पहेली असेही म्हणतात. कोडे किंवा कूटप्रश्न हा उखाण्याचा आणखी एक अर्थ आहे.

महाराष्ट्रातील वारली आणि आगरी जमातीत उखाण्यांना कलंगुडे असे म्हणतात. मध्यभारतातील छोटानागपूर प्रदेशातील खारियात उखाण्यांसाठी बुझबुझावली असा शब्द प्रचलित आहे. कर्नाटक राज्यांमध्ये उखाण्यासाठी ओडकथू, ओडगते तसेच आंध्र प्रदेशात विडीकथ हे शब्द प्रचलित आहेत. यावरून उखाण्यांचे स्वरूप हे कथानात्म असल्याचेही लक्षात येते.

पूर्वी पतीचे नाव घेणे सभ्यपणाचे मानले जात नव्हते. आजकाल आपण नाव घ्या म्हणतो; पण पूर्वी त्याला उखाणा असेच म्हणत असत. आजकाल पती-पत्नी एकमेकांना नावाने हाक मारतात. पण पूर्वी अहोजाहो, अगं तुगं असायचं. यात आपल्या पतीचे किंवा पत्नीचे नाव काय आहे, हे पण विसरून जात असावे कदाचित. त्यामुळे पाहुण्यांसमोर कोणाची कोण आहे, याची ओळख करून देण्यासाठी या उखाण्यांची निर्मिती झाली असावी.

उखाणे फक्त पतीचे नाव घेण्यासाठीच नाही, तर अन्य कारणांसाठीही वापरले जात असत. घरातील वयस्कर सदस्य लहान मुलांना अनेकदा कोड्यातून प्रश्न विचारतात. एखाद्या वस्तूचे बाह्यवर्णन हे रंगात्मक, प्रतिकात्मक आणि खुणदर्शक पद्धतीने करून संबंधित वस्तू कोणती? असे कोडे विचारणे ही बाब जास्त प्रचलित आहे. लहान मुलांच्या विचारशक्तीला चालना मिळावी या हेतूने हे उखाणे विचारले जातात. टोमणे वजा प्रश्नोत्तरातूनही उखाणे विचारले जातात. फुगडी, झिम्मा, झोके तसेच महिला विषयक खेळांमध्ये या उखाण्यांचा वापर होतो.

नाव घेण्याचा उखाणा महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि प्रचलित आहे. आपल्या प्रिय व्यक्तीचे नाव उच्चारल्याने त्याचे आयुष्य कमी होते, ही लोक समजूत समाजमनात रूढ आहे. पती-पत्नी परस्परांना नावाने हाक मारीत नाही, परंतु सण-उत्सव, विधीप्रसंगी पती-पत्नींनी परस्परांचे नाव घ्यावे असा संकेत आहे. महाराष्ट्रात लग्न, डोहाळ जेवण, बारसे, हळदी-कुंकू अशा प्रसंगी नावाचे उखाणे घेतले जातात. हे उखाणे काव्यात्मक पदबंधातून व्यक्त होतात. या काव्यात्मक पदबंधामध्ये दोन यमकबद्ध चरण असतात. दुसºया चरणात पूर्वार्धात नवºयाचे नाव घेऊन वेगळ्या अर्थाचे पद घेऊन उखाणा पूर्ण केला जातो.

याशिवाय कुटुंबातील विविध नात्यांमध्ये म्हणजे नणंद-भावजय, दीर-भावजय, व्याही-विहीण यांमध्ये थट्टामस्करी व्हावी, त्यातून नात्यामध्ये गोडवा निर्माण व्हावा, यासाठी कौटुंबिक कार्यक्रमामध्ये उखाणे घेतले जातात. हे उखाणे दीर्घ असतात. ग्रामीण भागात विहिणी विहिणी एकमेकींना अश्लील उखाणेही घालतात.

मांडवाच्या दारी गं पडलं टिपरं

…….विहिणीला पोर झालं झिपरं

ईवाय म्हणतो पोर कां हो झिपरं?

असुंद्या दादा रात्री निजाया गेली होती

तेव्हा नवºया आलं फेफरं

तेव्हा पोर झालं झिपरं.

सर्वसाधारणत: उखाण्यांची भाषा खेळकर व चटकदार असते. प्राचीन काळापासून लोकसंस्कृतीमध्ये रूढ असणारी उखाण्यांची परंपरा आजही समाजजीवनात प्रचलित आहे. उखाण्यांमध्ये वापरले जाणारे काव्यबंध, प्रतिमा तसेच कथनरूपे याबाबीतही समकालीन संदर्भ रुजू लागले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात पूर्वी लग्नातला रुखवत नाचवत नेताना उखाणे घेत जाण्याची प्रथा होती. यात वधू आणि वर यांच्याकडच्या बायका परस्परांवर कुरघोडी करणारे, नवरा, नवरी, करवली, सासू, विहिण यांच्या कुरापती काढणारे उखाणेही घेत. नंतर त्यांतून भांडणे पण होत असत. एखादी करवली जाड असेल, तर तिला हमखास उखाणा पडायचा, ‘आला आला रखवत, रुखवतात ठेवला आयना…. मुलाकडची करवली… बोगद्यात माईना..’ अशा तºहेचे उखाणे घेऊन लग्न कार्यात धमाल येत असे.

प्रफुल्ल फडके/संस्कृती

9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

मनाला निर्बंध :  अग्रलेख

  कोरोना गेला, आपण कोव्हिडमुक्त झालो, सगळे निर्बंध उठले, या भ्रमात सगळे जण अत्यंत गाफीलपणे …