ईडीच्या रडारवर

बुधवारी भल्या पहाटे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यामुळे राज्यभर खळबळ माजली. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले, पण गेल्या काही वर्षांपासून ईडीची चौकशी, तिचा ससेमिरा अशी चर्चा नेहमीच होताना दिसते. अर्थात ईडीने पकडले, चौकशीसाठी ताब्यात घेतले म्हणजे ते दोषी आहेत, असा अर्थ होत नाही. एखाद्या महत्त्वाच्या प्रकरणात चौकशीसाठी तपास यंत्रणा कोणालाही ताब्यात घेऊ शकतात, कोणालाही बोलावू शकतात. याचा अर्थ ते दोषी किंवा चुकीच्या आहेत, असे कधीच होत नाही. जोपर्यंत चौकशीत काही महत्त्वाचे पुरावे हातात येत नाहीत, तोपर्यंत हे सगळे लोक सज्जन आणि प्रामाणिकच असतात. त्यामुळे लगेच त्यांच्यावर कसलाही शिक्का मारायची कोणी घाई करू नये. त्यांना वाईट ठरवण्याचा प्रयत्नही कोणी करू नये. म्हणूनच ईडीच्या रडारवर राज्यातले कोणते नेते येऊन गेले आहेत, यावर एक कटाक्ष टाकायला हवा.

महाराष्ट्रात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि राजकारण याचा मागच्या काही वर्षांत खूप जवळचा संबंध बघायला मिळाला आहे. त्यामुळे ईडीची चौकशी म्हणजे ते राजकारण आहे, असाच समज होतो. यामध्ये १४ मार्च २०१६ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना ईडीने पहिल्यांदा अटक केली. पैशांची अफरातफर, बेहिशेबी मालमत्ता याप्रकरणी महाराष्ट्रातल्या मोठ्या राजकीय नेत्याला ईडीकडून झालेली ती पहिलीच अटक होती. त्या काळात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर होते. दोन वर्षे भुजबळ जेलमध्ये होते. त्यानंतर भुजबळ यांना जामीन मंजूर झाला. छगन भुजबळ यांच्या अटकेमुळे ईडी चौकशीच्या चर्चेला राजकीय वर्तुळात नव्याने सुरुवात झाली. तेव्हापासून भाजपविरोधी बोलणा‍ºयांना ईडीची भीती दाखवली जाते, असे आरोप तत्कालीन विरोधी पक्षांकडून करण्यात आले. मागच्या ४ वर्षांत भाजपवर हा आरोप वारंवार करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर ईडी कार्ययालयाबाहेर ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असा फलक शिवसैनिकांकडून लावण्यात आला होता. त्यामुळे सगळे वातावरण ढवळून निघाले होते.

त्यानंतर राष्ट्रवादीचे आणखी एक नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीचा दणका बसला होता. यूपीए सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल ेकेंद्रीय हवाई उड्डाण मंत्री होते. २००८-०९च्या काळात परदेशी विमान कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी दीपक तलवार यांच्याशी संपर्कात होते. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असलेले काही हवाई मार्ग दीपक तलवार यांनी तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले. त्याबद्दल दीपक तलवार यांना २७२ कोटी रुपये मिळाले. यामुळे एअर इंडियाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. हे सर्व व्यवहार प्रफुल्ल पटेल केंद्रीय मंत्री असताना त्यांच्या काळात झाल्याचा आरोप ईडीने लावला होता. याचबरोबर आर्थिक परिस्थिती नसताना ७० हजार कोटी रुपयांची १११ विमानांची खरेदी, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलिनीकरण या प्रकरणाचा तपास ईडीकडून करण्यात येत होता. पण प्रफुल्ल पटेल यांनी संयमी भूमिका घेत चौकशीला सामोरे गेले.
आॅगस्ट २०१९ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली होती. दादरमध्ये ज्या जमिनीवर कोहिनूर स्क्वेअर टॉवर आहे, त्याठिकाणी कोहिनूर मिल क्रमांक ३ची इमारत उभी होती. बंद पडलेल्या मिलच्या जागेची विक्री करण्याची जबाबदारी नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनकडे असते. या मिलचा ताबा नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनकडे आल्यानंतर त्यांनी कोहिनूर मिलच्या ४ एकर जागेचा लिलाव केला. या लिलावात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राजन शिरोडकर यांची मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर आणि मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांची कोहिनूर सीटीएनएल यांनी एकत्रितपणे ४२१ कोटींची बोली लावून ही जागा विकत घेतली. यामध्ये आयएफएलएस या कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचा संशय ईडीला होता. त्याचा तपास ईडीने सुरू केला. २२ आॅगस्ट २०१९ ला याप्रकरणी राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. राज ठाकरे यांची तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी तपास यंत्रणांना सहकार्य करत कोणतीही आक्रमक भूमिका न घेता, विनाकारण टीका न करता संयमाने परिस्थिती हाताळली आणि तपास यंत्रणांना सहकार्य केले.

सप्टेंबर २०१९ मध्ये महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. १ जानेवारी २००७ ते २१ मार्च २०१७ या काळात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यामुळे सरकारी तिजोरीचे २५ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माजी संचालकांची ७० नावे आहेत. त्यापैकी ५० जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे. ही नोटीस शरद पवार यांना आल्यानंतर २७ सप्टेंबरला मी स्वत: ईडी कार्यालयात उपस्थित राहून ईडीच्या अधिका‍ºयांना माहिती देणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले. त्यामुळे ईडी अधिका‍ºयांनी असे न करता गरज असल्यास आम्ही स्वत: बोलवू अशी विनंती केली. त्यानंतर पवार यांना अद्याप चौकशीसाठी बोलावले नाही. त्यानंतर या प्रकरणातून सगळ्यांना क्लीन चीटही देण्यात आली.
लॉकडाऊनच्या काळात २४ नोव्हेंबर २०२० शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, त्याचे पुत्र विहंग सरनाईक आणि पुर्वेश सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापे मारले. त्यानंतर विहंग सरनाईक यांची ईडीने ५ तास चौकशी केली. टॉप ग्रुप सिक्युरिटीज एमएमआरडीएमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत ही चौकशी केली. या प्रकरणात सरनाईक यांचा व्यावसायिक भागीदार अमित चांदोले याला २५ नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. सरनाईक यांच्या वतीने चांदोले यांनी पैसे स्वीकारल्याचा आरोप आहे. १० डिसेंबरला प्रताप सरनाईक हे चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहिले. त्यांची ६ तास चौकशी करण्यात आली. सरनाईक यांनीही ईडीच्या चौकशीत सहकार्य केल्याचे दिसून आले.

भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांना गेल्यावर्षी ईडीचा दणका बसला. भोसरी एमआयडीसी जमीन खरेदीप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर २०१६ मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले. याप्रकरणी खडसे यांना डिसेंबर २०२० मध्ये ईडीने नोटीस बजावली. ३० डिसेंबरला खडसे यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते, पण त्यांना कोरोनाची लक्षणे दिसत असल्यामुळे खडसे उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना अनेकवेळा चौकशीला बोलावले गेले. ही चौकशी अजूनही चालूच आहे.
गेल्या वर्षभरात अनिल देशमुख कुटुंबीयांसह अनेकांना ईडीच्या नोटिसा आल्या. पण ईडीची प्रतिमा यामुळेच राजकीय नेत्यांच्या चौकशीची यंत्रणा अशी होताना दिसते आहे. तपास यंत्रणांनी कोणालाही तपासासाठी चौकशीला बोलावणे हे काही चुकीचे नाही. पण त्याचा जो गाजावाजा केला जात आहे. यामुळे विनाकारण अब्रूची लक्तरे काढण्याचे प्रकार होताना दिसत आहेत. विरोधकांकडून त्याचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता आहे. म्हणून यातील राजकारण बाहेर काढून खुशाल कोणाचीही चौकशी करावी आणि दूध का दूध, पानी का पानी करावे. ज्याप्रकारे चुपचाप नवाब मलिकांना ताब्यात घेतले, चौकशी सुरू झाली तशीच चुपचाप कोणाचीही चौकशी करावी, पण त्याचे मीडियापुढे होणारे प्रदर्शन टाळले तर नेत्यांना, सरकारला जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देता येईल.

– प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …